Sunday, 2 June 2013

क्रश्

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
 हेल्लू डोक्ट कशे हाये टुमी ? ! हा माजा पयला मेल हाये

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
हाय त्वरा बेटा कशी आहेस तू? तुझा पहिला-वहिला इ मेल मिळाला…सगळ्या 'टायपों' सकट  :) खूप गोड!
डोन्ट वरी प्रॅक्टिस चालू ठेव!

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
हाय डॉक्टर! कालच मी नवीन हेअर कट केला! फोटो अ‍ॅटॅच केलाय. हो अ‍ॅटॅचमेण्ट पण शिकलेय मी आता!
कशी दिसते सांगा?
आणि हो शुन्य टायपोज हां :)

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
व्हॉट कॅन आय से बच्चू ? यु आर फास्ट रनर अ‍ॅन्ड इव्हन फास्टर लर्नर!
फोटो आवडला… कपाळावरच्या झिपऱ्या मस्तच!
सकाळी पळायला जातेस का?

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
डॉक पळायला जातेच… बाय ऑल मीन्स!
काल मार्था आणि अबलख बरोबर शर्यत लावली होती. मी जिंकले हे सांगायला नकोच.
हरल्यावर दोघांची तोंडं घोड्यासारखी लांब झाली होती…  हाहाहाहा!
आणि माझं खि खी हसणं तर जले पे सुहागा!

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
तू सुधारणार नाहीस, इकडे भारतात एवढंसं बाळ असल्यापासून मस्ती करायचीस :)
आणि वेडूबाई 'जले पे नमक' म्हणायचंय का तुला? 'जले पे नमक' आणि 'सोने पे सुहागा' असतं कळलं?
असो… गेल्या वीक एण्डला मुंबई गोवा रोडवर कोलाडला रिव्हर राफ्टिंगला गेलो होतो त्याचे फोटो पाठवतोय.

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
डॉक, कसले हॅन्डसम दिसताय तुम्ही फोटोत.
तुम्ही अजून सिंगलच आहात ना? देवाचीच कृपा :) विंक विंक

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
गुड नाईट हॅन्डसम... स्वीट ड्रीम्स… मिस मी!

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
तुम्ही रिप्लाय का नाही करत आहात?
मला रांचवर व्हिजीट करायला कधी येणार आहात?
मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचय… काहीतरी अमेझिंग…
पण इश्श मला बाई लाज वाटते ^_^

From Twara@Texas_Research_Centre.org.us:

तुम्ही रिप्लाय का नाही करत आहात?
आय हेट यु ….
पण तरी पण आय लव्ह यु!
पण आय हेट यु मोअर फॉर नॉट रिप्लायिंग :* :^* hugs n kisses !

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
संयमा, 
तुझा फोन का लागत नाहीये? च्यायला मेजर गडबड झालीये इथे. त्वरा चक्क माझ्या प्रेमात पडलीय!
माणसांच्या मेंदूतल्या ग्लायल सेल्स घोड्यांच्या मेंदूत इंजेक्ट करून त्यांना बुद्धिमत्ता आणि 'स्व' ची जाणिव देण्याचा आपला पहिलावहिला प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी झालाय.   
आपल्या भारतीय + अमेरिकन जॉइन्ट व्हेन्चर टीमनं सहा महिन्यांपूर्वी हे ऑपरेशन केलं तेव्हा इतके याहूम रिझल्ट्स येतील असं मलाही वाटलं नव्हतं.  
त्वरा रोज झपाझप नव-नवीन गोष्टी शिकतेय… 
रांचवर तिच्यासाठी खास टेली-मेट्री  वापरून गवताचा साधारण बास्केट-बॉल कोर्ट च्या आकाराचा की बोर्ड सुद्धा बनवला गेलाय. 
साधारण २ * २  फुटाची एक-एक "की"; आणि दोनदा टापा आपटल्या की "की स्ट्रोक"!  
समोर सिनेमाच्या पडद्याएवढा मॉनिटर. तो वापरून ती मला रोज मेल करते. 
पण ते जाऊ दे… मुख्य लोचा म्हणजे तिच्या डोक्यातील लिम्बिक भागात गडबड झालीये बहुधा. 
आणि त्यामुळे ती चक्क माणसात आदर्श जोडीदार शोधू लागलीये. 
माझी तर ज्याम फाटलीय! दोन दिवस तिला रिप्लाय करायचं पण डेअरिंग होत नाहीये!  

From Dr_Sayyam@Institute_Of_Animal_Psychology.org.in:
अर्णब,
थोडं थंड घे… इतकं काही पॅनिक व्हायची गरज नाहीये रे! 
एक तर तूच भारतात  त्वरावर हे ऑपरेशन केलंस आणि तिला कॉन्शसनेस ('स्व ' ची जाणिव) दिलीस. 
म्हणजे एका अर्थी तू तिचा "कर्ता" च आहेस.  
आपण अमेरिकन्सना कबूल केल्याप्रमाणे ऑपरेशन नंतरची दोन-तीन वर्षं ती ऑब्झर्वेशन्ससाठी तिकडे रांच वर राहील पण तिच्या जन्मापासून ओळखणारा, तिच्या घराला, भारताला जोडणारा दुवा तूच आहेस. 
सो तुझ्याविषयी तिला जिव्हाळा वाटणं साहजिक आहे रे.


दुसरं म्हणजे  त्वरा आता २ वर्षाची आहे म्हणजे घोड्यांच्या मानाने टीन-एजरच. 
या वयात पोरं होतात थोडी ओढाळ आणि आत्ताचे टीन-एजर्स तर काय दोन दोन मिन्टाला "आय लव्ह यु" बोलतात आणि "हेट यु" तर दर १० सेकंदांना :)

थोडक्यात काय तर तू म्हातारा झालायास हाहाहाहाहा!

ता. क. 
माझा एक क्लिप्टोमॅनिअ‍ॅक लॅब्रॅडॉर पेशंट आहे; त्यानंच माझा फोन ढापून नेला होता म्हणून लागला नसेल. 
उद्यापासून लागेल… त्याची मालकिण परत आणून देणाराय  :)


From Twara@Texas_Research_Centre.org.us:
डॉक,
आता आणि नाही थांबू शकत मी… तुम्हाला सांगितलंच पाहिजे… मला बोलता येत असतं तर फोनच केला असता!
आज काहीतरी झालंय… कसं  सांगू… शी मला बाई लाज वाटते ^_^

अबलखने मला आज किस केलं!

म्हणजे आम्ही सकाळी रेस लावली होती आणि त्यानं चक्क मला हरवलं… मग आम्ही दोघं मस्ती करत खिंकाळत होतो, 
तो मला ढुश्या देत होता आणि अचानक ते झालं :)
त्याच्या मोठ्ठाल्या पाणीदार डोळ्यांत हरवत चाललेय मी डॉक!
आय अ‍ॅम इन लव्ह विथ अबलख!
त्याचा सेन्स ऑफ ह्युमर पण खूप मस्त आहे… किस करून वर मला म्हणतो कसा, "स्ट्रेट फ्रॉम दि हॉर्सेस माऊथ"!
खि खि खि खि!!-नील आर्ते

क्रश्