Saturday 25 June 2011

गणपती बाप्पा मोरया


 १० जूलै शुक्रवार रात्रीचे १० 
पुणे स्टेशन शिवनेरी बस-स्टॅन्ड 
पावसाची संतत धार सकाळपासून लागलेली 
मुंबईहून येणाऱ्या बसेस रस्त्यातच अडकलेल्या आणि लोकं पार ७ वाजल्यापासून ताटकळलेली 

 बहुतेक सगळा क्राउड आय टी वाला..शिवनेरीचे लॉयल प्रवासी ! वीक एंड असल्याने टी शर्टस , थ्री फोर्थ , जीन्स चे नाना प्रकार. दोन गोष्टी मात्र कॉमन:  लॅपटॉप-बॅग आणि चेहऱ्यावर तीन तास साकळलेला प्रचंड कंटाळा.
एस. टी. कंट्रोलर मामांना सगळ्यांची दया येते आणि ते सर्व शिवनेरी भक्तांपुढे नामी पर्याय ठेवतात :
"आज काय शिवनेरी सुटणार नायत..पायजे तर आपण एक एशिआड बस सोडू , ज्या रिझर्वेशनवाल्यांना जायचंय त्यांचं तिकीट एशिआड साठी बदली करून देऊ, ज्यांना जायचे नाही त्यांना तिकिटाचे पैसे दोन दिवसांनी परत मिळतील . बोला !"

 सगळे बिच्चारे आई / बाबा / मुलं / नवरा / बॉयफ्रेंड / बायको / गर्लफ्रेंड च्या आठवणीत ताटकळलेले. पण शिवनेरी च्या एसीची ऐसपैस सीटची सवय झालेली , थोडासा संभावितपणा अंगात मुरलेला . काय करावं ?
थोडी चल-बिचल होते . आणि बहुतेक सगळेजण निर्णय घेतात एशिआड तर एशिआड घरी तर पोचू . 

 १० मिनटात समोरची एशिआड बस झपाझप भरली. जास्तच हाय फाय नाकं किंचित मुरडली पण ईलाज नव्हता.बस आता दोन मिनटात निघणार ...

आणि त्याच्या डोक्यात किडा वळवळला.मुंबईतल कॉलनी-चाळ ग्रूप मधलं त्याचं रक्त सळसळले , 'ओरडावं एकदा बस सुटताना ? मज्जा येईल! पण एरवी ट्रेकला ग्रुपमध्ये असताना गोष्ट वेगळी . तेव्हा सगळ्यांना अपेक्षित असतं आणि हमखास प्रतिसाद मिळतो.पण इकडे तर सगळे आधीच विवंचनेत त्यात हाय फाय ...ओरडलो आणि कोणीच साथ दिली नाही तर याहूम पोपट होईल.' त्याच्यातला कॉर्पोरेट आय टी वाला चरकला .

 तेवढ्यात बस घरघरत सुरूच झाली. ड्रायवरने मिनिटभर इंजिन गरम केलं. इकडे त्याचा जीव वर खाली ...ओरडू की नको ? घ्यावी रिस्क ?? मारावी उडी ??? काय फरक पडतो पोपट झाला तर ? आपल्याला तर आनंद होतोय ना घरी चालल्याचा , मग का ठेवायचा तो दाबून ? पण यातले काही चेहर तर दर शुक्रवारचे ठरलेले , एक तर त्याच्या खास आवडीचा , 'पोपट झाला तर पुढच्या शुक्रवारी लाज वाटणार ' त्याची तडफड चालू होती...

खड्ड-खाट ड्रायवरने पहिला गिअर टाकला ,बस दमात पुढे झेपावली आणि त्याची सगळी तडफड शांत झाली !
तो खच्चून ओरडला "गणपती बाप्पा " ..क्षण भर कोणालाच काही कळलं नाही आणि मग आख्खी बस ओरडली :

"मोरया " !!!

त्याच्या छातीत आनंद सरसरला आणि तो खुशीत ओला रस्ता बघू लागला 


-नील आर्ते


Saturday 18 June 2011

एपिफनी

ती आली आणि म्हणाली ,
"तू काहीच कामाचा नाहीस , संस्कृत 'कामाचा' सुद्धा 
इतकी वर्ष झाली मुंबईत एक घर घेऊ शकला नाहीस ...
डान्स सुद्धा चुकीचा करतोस आणि गीझर बंद करत नाहीस!!!"

खूप वाईट वाटलं त्याला ते ऐकून,
तीन दिवस तो भेलकांडत राहिला, 
दादर platform नं. ३ वरील दारुड्यासारखा,

आणि एका लख्ख सकाळी त्याला कळलं:
"कामाचा" असला-नसला तरी तो एक नम्बरचा किसर होता,
घर पुण्यातही घेऊ शकतो,
आणि डान्स आला नाही तरी धमाल करता येतेच म्युझिकवर 
..........
गीझर मात्र आता तो आठवणीने बंद करतो , लाईट गेले असले तरीसुद्धा!!!

-नील आर्ते

Sunday 12 June 2011

मूव्ह ऑन

जुन्याच जखमा जुनेच घाव 
तीच तडफड नवीन नाव

जुनेच चोर जुनेच साव
जुनीच आमिषे नवीन हाव 

जुनेच खडक जुन्याच नद्या
जुनाच काल नवीन उद्या 

जुनाच पडाव जुनाच थांबा 
जुनेच कलम नवीन आंबा 

जुनीच मैफिल जुने घराणे 
जुनीच वीणा नवे तराणे

जुनाच देह जुनाच स्पर्श 
जुनीच भूक नवाच हर्ष

जुनेच हसणे जुनेच रडणे 
जुनेच प्रेम नवीन पडणे   

-नील आर्ते

Saturday 11 June 2011

लूक अलाईक्स

च्यायला तुम्ही नोटीस केलंय ?

युवराज सिंघ अभिषेक बच्चन सारखा दिसतो (जरा जास्त चमको )
झरीन खान कत्रिना सारखी (पण जास्त रसरशीत ),
असीन एव्हा लोंगोरिया सारखी (जरा यंगर)

तुम्ही कोणासारखे दिसता :)???

-नील