Friday, 15 May 2015

का?

 तमाम सोसायट्यांतले यच्चयावत "नेपाळी थापा" गाड्या धुतल्यावर गाडीचा एक आणि फक्त एकच व्हायपर उभारून ठेवतात… ते का?
हा गाडी धुणाऱ्यांच्या 'ब्रेद्रन'चा काही सिक्रेट कोड असतो का?
असेल तर कोणासाठी? दुसर्या 'फेलो' थापांसाठी? गाडीच्या धन्यासाठी?? की खुद्द गाडीसाठी???
सकाळच्या उन्हात स्वच्छ चमचमणारी एकच व्हायपर उगारलेली गाडी भारी गोड दिसते हे बरीक खरं!

 सगळ्या '*सागर' किंवा '*ली' किंवा तत्सम उडुपी हॉटेलांत मसाला डोसा मागवल्यावर आतल्या भाजीत एकच बटाटा हेsss प्रचण्ड असतो… ते का?
बाकीचे सगळे तुकडे विनम्रपणे छान छोटुले असतात मग हा एकच लॉर्ड फॉकलंड का असतो?
का सगळ्या शेट्टी हॉटेलवाल्यांना एक बटाटा अज्रस्त्र ठेवायची शपथ घ्यावी लागते?

 झाडून सगळ्या सुंदर मुलींचा एकतरी जीभ उजवीकडे(च) तिरकी बाहेर काढलेला वेडगळ सेल्फी असतो… ते का?
म्हणजे देवानी दिलेला चांगला-बरा चेहेरा वेडा-वाकडा करावा असं माणसाला का वाटत असेल?
तशा त्या खरोखर छान नाही दिसत… हे त्यांना कोणतरी 'माईका लाल' सांगू शकेल का?
की त्यांचाही इलाज नसतो? आणि सगळी पोरं बीअर ढोसून झोपली असताना हळूच झालेल्या पोरींच्या वैश्विक मीटिंगमधला ठराव त्यांना पाळावाच लागतो?… जीवाच्या कराराने??

अडनीड वळण - समोर ट्रक - उजव्या बाजूला एस टी - डावीकडे घसटी मारणारा बाईकवाला…
अशा वेळी आपल्याला अचानक ठ्यांश्कन शिंक येते… क्षणभर डोळे ही मिटतात… 
पण डोळे उघडल्यावर सगळे तसेच असतात… सुखरूप!
कितीही विचित्र वेळी शिंक आली तरी फ्लो तसाच चालू राहतो… सेफ… उबदार… ते का? आणि कसं??
जणू डोळे मिटल्याच्या त्या क्षणापुरते  रस्ता आणि बाकी सगळे 'डायवर' आपल्याला अलगद सांभाळून घेतात.
शरीर धर्माची मजबुरी जाणवून त्या क्षणापुरतं युनिव्हर्स आपल्याला वाचवायचा कट करतं का?

सोड ना बे येवढा विचार करायचं आपलं काम नाय:
मस्त धुवट गाडी बिनधास्त चालवावी आणि मसाला डोसा चेपत तिरकी जीभ वाले सेल्फी लाईक करावेत…
To each his own!

 -नील आर्ते