त्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते "अलिबाबा चाळीस चोर"...
लहानपणी बघितलेलं...
गिरगावच्या साहित्यसंघात...
सुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.
बहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.
खास करून गुहेतला खजिना:
त्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...
त्यांचं ते पिवळं गारूड अस्संच!
माझ्या सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडून डावीकडे वळलं की भस्सकन NH4 हायवेच लागतो.
त्याच्या किंचित आधी हा हँडसम उभा असतो आजकाल...
बाजूच्या रखरखटावर पिवळाई शिंपडत.
त्याला रास असती तर ती लिओ असणार असं मला उगीचच वाटतं.
आणि नाव असतं तर: ईशान अवस्थी.
पेशा असता तर: प्रोफेसर.
आणि हा राजबिंडा प्रोफेसर आख्ख्या वर्गानी बंक मारला तरी तत्व म्हणून रिकाम्या क्लासरूमला शिकवेल असंही वाटत राहतं.
आठवत रहातात मग असे स्वमग्न आत्मे इथं तिथं पाहिलेले...
आपल्याच मस्तीत आतल्या डोहात बुड्या मारणारे...
बाहेरल्या जगाला एफ. ओ. देत भरभर आनंद सांडणारे.
ती मित्राच्या हळदीला 'वाजले की बारा'वर बेभान नाचणारी स्थूल बाई आठवते... जिचा नवरा अस्वस्थ चुळबुळ करत होता...
ती गोरेगाव स्टेशनावर पाहिलेली कानातल्या हेडफोन्सबरोबर मोठ्ठ्यानं 'शेप ऑफ यु' गाणारी मुलगी आठवते... जिच्या सावळ्या गालांवर मुंबईचा घाम ओघळत होता.
'व्हिप्लाश'च्या शेवटच्या सीनमधला जीव खाऊन ड्रम्स वाजवणारा अँड्र्यू आठवतो... जेव्हा तो ओरडतो, "आय'ल क्यू यु इन!"
हा बहावाही एक दिवशी खच्चून ओरडणार नक्कीच ते पिवळं सुख मावेनासं होऊन...
मी वाट बघतोय!
-नील आर्ते