Wednesday 7 November 2012

"लेडी इन द वॉटर"...च्या निमित्ताने

खरं तर एक पॉलीसी म्हणून मी सिनेमावर लिहीत नसतो!
म्हणजे कसं आहे माहितीये का कि एका मंगळसूत्र चोराला पब्लिकने पकडलं!
ओके म्हणजे त्याचा गुन्हा निर्विवाद!
पण आधीच लोक त्याला एवढा एक्स्पर्टली मारत असतात की आपण काय मारायचं यार? ते रीडण्डन्टच होणार ना?
तसंच काहीतरी,
म्हणजे गणेशदादा मतकरी, मयंक शेखर, करण अंशुमान, आपले हेरंबराव ओक वगैरे
वगैरे इतकं झकास, मनापासून (आणि बऱ्याचदा डिट्टो आपल्याच मनातलंसुद्धा) शिणुमावर लिहित असतात की आपण का कष्ट घ्या?

पण आज अगदीच रहावत नाहीये:

एक तर हे वेडसर एच. बी. ओ. + स्टामू वाले शुक्रवार-शनिवार रात्री महाटुकार सिनेमे लावतात पण वीक-डे ला रात्री मात्र  ** जळवायला ढासू सिनेमे.

अशीच मंगळवारी रात्री साडेअकराची वेळ...डबेवाल्या मावशीनी डब्यात खिमा दिलेला, नन्तर एक आक्खं फाईव स्टार चेपलेलं...पुणूल्यात थंडीची चाहूल लागलेली...म्हणजे एकंदरीत डोळे खजुराहोच्या हॉटीन्सारखे अर्धोन्मिलीत वगैरे झालेले.

आणि इतक्यात "लेडी इन द वॉटर" चालू झाला!

पहिलाच थोडासा आपल्या वारली पेंटिंग्जसारखा अ‍ॅनिमेटेड इन्ट्रो आवडून गेला.
आणि अडकलोच ना राव!

म्हणजे कसं माहितीये का...एका मिक्सर मध्ये जी एंच्या मिथककथा, बटाट्याची चाळ, विनोदकुमार शुक्ल आणि अर्थातच एम. नाईट. घ्यावा आणि दोनदा फुर्र करावं.
मग जे काही तयार होईल ते कोणताही पूर्वग्रह न घेता बघत बसावं.

खर तर जगभरात क्रिटिक्सनी फुल परतलेला या सिनेमाला...चाललासुद्धा नाही फारसा.
पण मला मात्र समहाऊ जमला!

पॉल जियामत्तीचा खिन्न पण सालस सोसायटीचा हरकाम्या,
फिलाडेल्फिया अपार्टमेन्ट मधले एकसे एक नग चाळकरी, (त्यातही चायनीज चंट पोरगी आणि तिची सर्किट आई टू गुड!)
आणि अर्थातच श्यामलनचे पेटंट रेड हेरीन्ग्स.

डोळ्यांवरची झोप आवरून बघावासा वाटणारा सिनेमा म्हणजे चांगलाच...माझ्यापुरता तरी!
मग भले रिव्ह्यूज काहीही असोत!

(ता. क. दुसर्या दिवशी ऑफिसला १ वाजता उगवलो...खिक्क :) !!!)

-नील आर्ते







Tuesday 6 November 2012

गर्ल-टॉक

शी बाई, पतियाळा, सेमी-पतियाळा, मॅजेन्टा, वांगी-कलर, तुळशी-बाग, लक्ष्मी-रोड, चकल्यांच तयार पीठ.....

अकाउन्ट्स डिपार्ट्मेन्ट्च्या "अबव्ह ३५ + ऑल महिला वर्ग" क्युबिकल्स मधून असले रॅन्डम शब्द आज सकाळपासून माझ्या कानांवर आदळतायत...
आणि शर्टाच्या आतल्या बनियनच्या आतल्या केसाळ छातीच्या आतल्या बरगड्यांच्या आतल्या कॉलेस्टरॉलच्या आतल्या ह्र्दयाच्या आत-आत खोल कुठे तरी छान  वाटतंय.

Diwali is in the air :)

-नील आर्ते