Saturday 31 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ८)

अल्फाजनी मला हळूSSSच पायाने ढोसलं.

"पासवर्ड: नदियां२५०४", अल्फाज बोलला...

बस अगदी समोर आली टॅक्सीच्या...
हायबीम लाइटने पाठच्या दोघांचेही डोळे दिपले क्षणभर...

त्याचक्षणी अल्फाजने बारुआची बंदूक वळवली आणि अंजाला गोळी घातली...
सायलेन्सरचा दबका आवाज झाला आणि अंजानी मान टाकली,
पण बारुआची बंदुकीवरची पकड घट्ट होती...
आता बारुआ आणि अल्फाजची बंदुकीसाठी झटापट चालू झाली,
तेव्हढ्यात माझीही ट्यूब पेटली आणि मीही अल्फाजच्या मदतीला गेलो...

बारुआनी आम्ही दोघं त्याला भारी पडणार हे ओळखून टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि बाहेर उडी मारली...
जरा लांब कोपऱ्यात बारुआची पांढरी फॉर्च्युनर उभी होती तिच्या ड्रायव्हरने गडबड पाहून गाडी चालू केली.
आमच्या टॅक्सीवर गोळ्या तडतडल्या आणि अल्फाजनी सुद्धा वॉंवकन टॅक्सी चालू केली.
अल्फाजनं रप्पकन राईट मारला.
आरशात मला बारुआ फॉर्चुनरमध्ये बसताना दिसला आणि फॉर्च्युनर शिकारी कुत्र्यासारखी आमच्या मागे लागली.
समोरचा रस्ता मेट्रोच्या कामासाठी बंद केला होता आणि डावीकडे उंच फूटपाथ होता...
गाडी चढली नसती त्याच्यावर पण अल्फाजनी थाड्कन पत्रा मरून एक मेट्रोचा जाड पत्रा खाली पाडला आणि तिरक्या पडलेल्या पत्र्यावरून गाडी रोंरावत फूटपाथवर चढवली.
फॉर्च्युनर तिकडे झक मारत रिव्हर्स घेत होती.
अल्फाजनं थोड्या अंतरावर कडक मातीचा फूटपाथला चिकटलेला एक उतार हेरला आणि गाडी त्याच्यावरून सर्व्हिसरोडवर उतरवली. आता आम्ही हायवेला लागलो की सुटलो...
तेव्हढ्यात अल्फाजनी काच्चकन् ब्रेक मारला...

क्रमश:

Wednesday 28 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ७)

मार्शलची गाडी जस्ट वळणापलीकडे असल्याने त्याला आम्ही दिसणार नव्हतो आणि बाकी सामसूमच होती.
"बारुआ भडवे तूच असणार मला वाटलंच होतं..."
अल्फाज चिडून बोलला.
त्या बारुआनं अल्फाजच्या कानावर हलकेच दस्ता मारला आणि अल्फाजच्या कानशीलातून बारीक रक्ताचा ओघळ यायला लागला.
बारुआ आणि त्याच्या साथीदारानी आम्हाला ढकलत ढकलत टॅक्सीकडे नेलं आणि आत बसवलं:

अल्फाज ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला मला कोंबला
पाठच्या सीटवर बारुआ आमच्यावर पिस्तूल रोखून बसला आणि त्याच्या साथीदारानं झटपट काम चालू केलं:
ड्रायव्हर सीटच्या पाठच्या चोरकप्प्यातून एक छोटासा *रासबेरी पाय* सारखा दिसणारा प्रोसेसर काढला.

"बॉस रूट पासवर्ड लागेल", तो म्हणाला.

"चल सांग लवकर नाहीतर तुझ्या या निष्पाप गोंडस पॅसेंजरला ठोकावं लागेल मला... काल तुझी सॉरी आय मीन आपली सगळी टीम ठोकली तसं.", बारूआनी पिस्तूल माझ्याकडे रोखलं.
मला 'शू'ची भावना व्हायला लागली होती... जोरात.

"त्याला जाऊ दे बारुआ, त्याचा काही संबंध नाही याच्यात, पासवर्ड देतो मी तुला"

"संबंध नाही कसा? तू त्यालापण वापरून घेतलास आज ते सांगितलंस का? एनीवेज त्याला सोडू आपण पासवर्ड दे."

"बॉस दोन पासवर्ड आहेत इनफॅक्ट...
प्रोसेसर क्लीन रिबूट झाल्यावर फॉरमॅटिंगच्या आधी दुसरा पासवर्ड मागेल पण पाच मिनटं लागतील त्याला."

"ठीक आहे अंजा, मग पाच मिनटं थांबू दे पॅसेंजरला, दुसरा पासवर्ड द्यायच्या आधी सोडूया त्याला प्रॉमिस!
अल्फाज मियाँ सांगा पहिला पासवर्ड पटापट"

"राखी१२०४" अल्फाज उत्तरला, आणि बारुआ खदखदून हसायला लागला.

Sunday 25 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ६)

आम्ही मार्शलचं बिल देऊन पंक्चरवाल्याकडे आलो.
पंक्चर निघालंच होतं...
पंक्चरवाला पैसे घेऊन पुन्हा पांघरूण ओढून एका मिनटात गुडुप्प झोपून गेला...

आम्ही गाडीजवळ आलो... आणि अचानक अल्फाजच्या मानेजवळ एक शेंदरी दिवा लुकलुकला.

"चल जायला हवं लवकर गाडीत...
मी टॅक्सीशी फक्त एक तास डिस्कनेक्टेड राहू शकतो.. बॅकअप बॅटरीवर.
माझ्या हायब्रीड मेंदूचं चार्जिंग फक्त गाडीतूनच होऊ शकतं किंवा आमच्या बेस सेंटरच्या स्पेशल चार्जरमधून."
आणि ऑलरेडी ४५ मिनटं बॅकअपवर आहे मी.

"आणि एक तासापेक्षा जास्त डिस्कनेक्टेड राहिलास तर?"

"मग मात्र माझा मेंदू पॉवर सेव्हिंग मोडमध्ये जाईल:
पुढचा अर्धा तास मला दिसायचं बंद होईल, कारण आपली ऑप्टिक्स फंक्शन्स खूप जास्त बॅटरी खातात...
मी जवळ जवळ कोमात जाईन...
आणि त्यानंतरही नाही जोडलं चार्जरला तर मात्र खेळ खल्लास!
पण तशीही आजची शेवटची रात्र आहे ही सगळी कन्स्ट्रेन्ट्स सांभाळायची...
कारण आम्हाला हवा होता तो सगळा डेटा आता मिळालाय आणि माझा मेंदू आणि गाडीचा प्रोसेसर दोन्ही हायेस्ट परफॉर्मन्सला पोचलेयत... थँक्स टू यू !
शिवाय हा सगळा आर्टिफिशियल जुगाड सस्टेनेबल नाहीये...
पीक परफॉर्मन्स अचिव्ह झाला की २४ तासांनंतर माझ्या ब्रेनसेल्स प्रचंड वेगानी नष्ट होतील... आणि तसाही मी मरेनच.
सो... तूला सोडलं की नॅशनल पार्क जवळच्या कुठल्यातरी निवांत रस्त्यावर टॅक्सी लावून स्वतःला अनप्लग करेन, आणि झोपून जाईन शांतपणे कायमचा!
पण माझं एक शेवटचं काम करशील?
माझा क्लाउड ड्राईव्हचा पासवर्ड इलॉन मस्कपर्यंत पोचवायची व्यवस्था करशील?
मीच केलं असतं खरं तर पण मला त्यानं ब्लॉक करून टाकलंय आमच्या भांडणानंतर."

मला काही कळेना,
"मीच का पण? तुझी ती टीम कुठे गेली?"
मी गोंधळून विचारलं.

"मी सांगतो ते", पाठून आवाज आला...
आणि आमच्या दोघांच्याही पाठीत कोल्टच्या गारेगार नळ्या घुसल्या.

क्रमश:

Thursday 22 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ५)

अल्फाजनी चुकचुकत गाडी स्लो केली. 
नशीबानं समोरच एक ऑल-नाईट पंक्चरवाला होता.
अल्फाजनं परत त्याच्या मानेभोवतीच्या सगळ्या वायर्स काढल्या... (एकूण चार वायर्स होत्या मी मोजल्या.) 
आणि मग गाडी पंक्चरवाल्याकडे नेली. 
गुरगुटून मस्त झोपला होता तो, त्याला हलवून उठवला आम्ही. 
टायरमध्ये खिळा घुसला होता. 
पंक्चरवाला कामाला लागला...  

"चल भाई बुर्जी खाऊया, मार्शल अल्टिमेट बुर्जी बनवतो"
मला एकीकडे कधी एकदा घरी पोचतो असं झालेलं पण पंक्चर काढणं भाग होतं.
शिवाय वळणापलीकडच्या बुर्जीचा घमघमता वास इथपर्यंत येत होता.

Sunday 18 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ४)

ड्रायव्हर माझ्याकडे मान वळवून थोडा हसला त्यानं मानेच्या त्या जोडलेल्या वायरींवर टॉवेल टाकला आणि गाडी चालू केली.

"हे सगळं क्काय आहे?", मला रहावेना.

तो परत विचित्र हसला आणि म्हणाला,

"हॅलो, आय ऍम अल्फाज टायरवाला!"

"क्काय!", मी तीन ताड उडालोच.

आम्हा आयटीवाल्यांचा देव होता 'अल्फाज टायरवाला' एके काळी.

जॉब्स, झुकरबर्ग, लायनस टॉर्वल्ड, इलॉन मस्क या सगळ्यांच्या बरोबरीला झपाट्याने येणारं भारतीय नाव होतं ते काही वर्षांपूर्वी.
प्रचंड गरीबीतून झालेलं त्याचं शिक्षण, मुंबईत टॅक्सी चालवून प्रचन्ड धडपड करून त्यानं कॉम्प सायन्समध्ये केलेलं मास्टर्स...
आणि मग कमावलेलं प्रचंड यश...अमाप पैसा
त्याचं ते कार पार्किंगचं तुफान पॉप्युलर ऍप...
ड्रायव्हिंगचे इंटरॅक्टिव्ह गेम्स...
मशीन लर्निंग वरचे टेड-टॉक्स...
सगळं झपाट्याने आठवत गेलं मला.
येस्स अल्फाजच होता तो, आत्ता माझी ट्यूब पेटली.
त्याच्या आत्ताच्या खप्पड चेहेऱ्यामुळे आणि पांढऱ्या केसांमुळे ओळखू येत नव्हता तो.

मी पुन्हा एकदा नीट बघितलं.

Saturday 17 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ३)

ड्रायव्हर तोपर्यंत बाइकवाल्याकडे पोचला होता.
बाइकवाला आधी निपचित वाटला... पण हळूहळू उठून उभा राहीला.
फारसं लागलं नव्हतं त्याला फक्त शॉक बसला होता.
जाड जीन्स घसपटून फाटली होती आणि थोडंसं खरचटलं होतं.
डोक्याचं कलिंगड फुटण्यापासून अर्थातच वाचलं होतं आमच्या ड्रायव्हरच्या कृपेने.
ड्रायव्हरनं त्याला एकदा चेक केलं वरपासून खालपर्यंत.
"ठीक है तू?"
"अं... अं... हा!", बाइकवाला उत्तरला. अजूनही थोडा सदम्यातच होता तो.

ती अशी टोळासारखी बाईकवर बसत... वॉंव वॉंव करत हेलकावे देत गाडी चालवणारी 'बंटाय' पोरं असतात ना,
तस्साच होता तो.
तोंडावर मुरुमं... साळींदरासारखे कापलेले केस आणि कडक्या.
बाइकलाही फारसं काही झालेलं नव्हतं.
फक्त लेफ्टचा इंडिकेटर तुटला होता.
आम्ही त्याला बाईक उभी करायला मदत केली.
बाईक दोन किक मध्ये चालूही झाली.
               
 बाइकवाला अजूनही सदम्यातच होता.
  "थ... थ... थॅंक्यू भाईजान", तो चाचरत बोलला...  

आणि आमच्या डायव्हरनं त्याची कॉलर पकडली,

Thursday 15 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग २)

इतक्यात आमच्या टॅक्सीवाल्याने खालील तीन गोष्टी केल्या:
१. गाडीला हलकासा गचका दिला आणि गाडी चक्क फ्लायओव्हरच्या बुटक्या डिव्हायडर वरून रॉंग साईडला नेली. (कशी काय कोण जाणे)
२. कचाकच ब्रेक मारत गाडीचा स्पीड कमी केला.
३. आडवी होऊन स्ट्रायकरसारखी सुसाट येणाऱ्या बाईकच्या पुढच्या टायरला हलका प्रेमळ डिच्चू दिला.

त्याने खालील तीन गोष्टी झाल्या:
१.रस्त्याच्या कठड्याकडे झपाट्याने घसरणारी बाईक उलटी फिरली.
२. तिचा घसरण्याचा वेग थोडा कमी झाला.
३. आणि बाईक स्वाराचं हेल्मेटविरहीत डोकं कठड्यापासून दोन इंचांवर थांबलं... न फुटता.


काहीसं असं:


आमच्या टॅक्सीवाल्यानं टॅक्सी थोडी पुढे थांबवली आणि रिअर व्ह्यू मिरर मधनं मागे बघितलं.
बाईकवाला निपचित पडला होता.
तीन चार गाड्या अशाच निर्लज्जपणे पाणी उडवत पुढे पास झाल्या. 

टॅक्सीवाल्याची कसलीतरी घालमेल चालू होती... 
इंजिन चालू होतं... 
गाडी न्यूट्रलवर... 
त्यानं माझ्याकडे बघितलं... 
फर्स्ट गिअर टाकला...  
परत बाइकवाल्याकडे बघितलं... 
निपचित. 

परत त्यानं शिवी हासडत न्यूट्रल टाकला... 
हँडब्रेक खेचला... आणि म्हणाला,
"आपको ये दिखना नही था लेकिन उस येडेकी हालत देखने पडेंगी"'

त्यानं हळूच मानेभोवतीचा फडका काढला... 
त्याच्या मानेतून चार प्लग सीटच्या हेडरेस्टमध्ये गेलेले होते. 
थोडेसे गाडीच्या स्पार्कप्लगसारखे दिसत होते ते... 
त्यानं एक एक प्लग उपसून काढला आणि मान मोकळी करत तो गाडीतून खाली उतरला. 
मी थिजून त्याच्या मानेतल्या चार रक्ताळलेल्या भोकांकडे बघत राहिलो...
आणि पाठोपाठ खाली उतरलो.

क्रमश:

Tuesday 13 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग १)

मी प्रचंड विनोदी हातवारे करत टॅक्सी थांबवली आणि पाऊस चुकवत आत घुसलो.
"भाय पासमे ही जानेका हय... स्टेशन."
मला गणेश मतकरीच्या कथेतलं वाक्य आठवलं,

'मुंबईच्या टॅक्सी रिक्षावाल्यांशी बोलताना तुमच्या आवाजातच काहीतरी असं असावं लागतं की नाही म्हणण्याची त्यांची हिंमतच होऊ नये.'... 
माझ्याकडे तरी तो आवाज नव्हता...
मग मी जगातली सगळी करुणा एकवटून ड्रायव्हरकडे बघितलं आणि "प्ली SSS झ" म्हटलं...
आणि फारशी आशा न बाळगता परत खाली उतरायची तयारी केली.
ओय!... पण चमत्कार झाला!
ड्रायव्हरनं चक्क मीटर टाकला...
मग गिअर टाकला...
आणि मला एक छानसं स्माईल दिलं.
येय!
चला अर्धी लढाई जिंकली आता शेवटची विरार ट्रेन जायच्या आत स्टेशनला पोचलो की जितं मया!

"थोडा मुष्कील है साब तीन मिनटमें स्टेशन पहुचना लेकिन ट्राय करेंगे इन्शाल्ला",
ड्रायव्हर मनातलं वाचल्यासारखं बोलला... आणि त्यानं स्पीड वाढवला...