Tuesday, 26 November 2013

झगार्ड १:

सुळक्याच्या तिसऱ्या लेजवर ते दोघं जेमतेम अ‍ॅन्कर होऊन उभे होते.
कसं वाटतंय? धनुषनं विचारलं.
'ऑसम', अभ्यंग उत्तरला पण कोरड्या पडलेल्या घशामुळे त्याचा आवाज थोडा चिरकलाच.

 'ओके शेवटचा पॅच हार्डली तीस फुटांचा आहे. ओव्हरहॅन्ग थोडासा तुझ्या अंगावर येईल पण तुला जुमार आहे त्यामुळे काळजी नको. वरती बंकू आहेच. ही  गोळी घेऊन टाक.', धनुषनं सोनेरी कॅप्सुल त्याच्या  हातावर ठेवली. 'एक वीस मिनिटांत तुझं झगार्ड येईल आणि ते साधारण तासभर टिकून राहील तो पर्यंत मी वर येईनच मग आपण रॅपल डाऊन करू. ठीकाय??

अभ्यंगनं गोळी गिळून टाकली. धनुषनं अभ्यंगचं अ‍ॅन्कर आणि जुमार चेक केल आणि त्याच्या पाठीवर हलकिशी थाप मारत तो म्हणाला, 'चल सुट'!

 अभ्यंगनं क्लाईम्बिंग चालू केलं. रॉकमध्ये तसे 'होल्ड' भरपूर होते. धनुष किंवा बंकू सारख्या क्लाईम्बिंग मधल्या किड्यांना "डांग्या" सुळका तसा सोपाच होता. पण अभ्यंग तसा नवखाच, त्याचं हृदय थाडथाड उडत होतं…सुळका सोपा होता पण एक्स्पोज भारी होता. बेसपासून तीनशे फूट तरी असावा तो.
खाली खोल हिवाळ्यातली पिवळी पडलेली कुरणं आणि चरणाऱ्या गायी दिसत होत्या.
भण्ण वारा आणि हाताला भिडणारा तो काळा कातळ…अचानक त्या काळ्या काळ्या सह्याद्रीच्या दगडूबद्दल त्याला माया दाटून आली आणि त्यानं बाहेर आलेल्या एका टेंगुळाचं  चक्क चुंबन घेतलं!
जुमार सरकवत अभ्यंग कष्टाने हाइट गेन करत होता. शेवटच्या ओव्हरहॅन्गला त्याची चांगलीच फाटली. घसा कोssssरडा पडला होता. हाता पायात पेटके येत होते… झालं शेवटचा ओपन-बुक सारखा दिसणारा रॉक पॅच पार केला की दहा फुटांवर समिट!
अभ्यंगनं एक मूव्ह घेऊन 'ओपन बुक' पार केलं, 'धनुषला आवडली असती ही मूव्ह!' तो स्वत:वरच खुशारला!
कडेवर दोन्ही तळवे रोवून त्यानं शरीर वर खेचलं… आधी डावा पाय मग उजवा पाय… तो शिखरावर पोचला होता! त्याचे पाय शिलाई-मशीन सारखे थडथडत होते… समीsssssट तो खुष होऊन ओरडला!
त्यानं चहुबाजूंना नजर टाकली… बंकू बाजूला बसून लिमलेटची गोळी चोखत होता. त्यानं थम्स अपची खूण अभ्यंगकडे फेकली. अभ्यंगनं त्याला उलटा फ्लाइंग-किस फेकला आणि तो दोन्ही पाय फाकवून अकिम्बो पोझिशन मध्ये उभा राहिला. अशा पोझ मध्ये आपण सुहास शिरवळकरांच्या 'दारा बुलंद' सारखे वाटतो असं त्याला उगीचच वाटायचं!

 त्यानं वेस्ट पाउच मधून ती सोनेरी कॅप्सुल काढली आणि पाण्याबरोबर गिळून टाकली. मग हलकेच चहुबाजूंना नजर टाकली… भण्ण वारा चालूच होता. चहूकडे जांभळे डोंगर निश्चल उभे होते. बाजूच्या दरीत एक गिधाड आपल्याच नादात घिरट्या घालत होतं… हिवाळ्यातल्या दुपारी ३ वाजता असते तशी सगळ्या उन्हावर एक धुरकट झिलई आली होती… आणि तो डोंगराचा, गवताचा, घाणेरीचा वेडावणारा गंध गच्च भरून राहिला होता…"याचसाठी केला होता अट्टाहास"!
त्याचं मन हळूहळू निवत गेलं… शां sssss त शांत झाला तो. आणि त्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला. 
 बंकूनं त्याला सावधपणे बसतं केलं आणि घड्याळाकडे नजर टाकली, तासभर तरी अभ्यंग असाच राहणार होता. 



क्रमश:

2 comments:

  1. This looks like something else but this is something different than that!
    Let it come fast... :)

    ReplyDelete