Monday 1 January 2018

दीपक मामा (भाग ३)

त्याचे असे अनेक स्ट्रॉंग फंडे त्या तीन महिन्यांतला तुटक वीकेण्ड्सना मी शिकलो.
हा अजून एक,
"निखिल, रस्त्यावरचे सगळेच्या सग SSS ळे... म्हणजे गाडीवाले, चालणारी लोकं, पोरं-टोरं, गायी-गुरं वेडे आहेत आणि तू एकटाच शहाणा आहेस असंच समजून गाडी चालवायची.  
वेड्या माणसाचा काय भरोसा नसतो, तो कुठेही कधीही काहीही करू शकतो.  
संभाळून घ्यायचंय तुलाच हे लक्षात ठेव."
थोडक्यात काय तर रस्त्यावर कधीही काहीही गृहीत धरायचं नाही,
हे त्याचे स्टुडन्ट्स शिकतातच.

किंवा हा...   
पेट्रोल (म्हणजे ऍक्सिलरेटर लक्षात ठेवा :)) फक्त आणि फक्त उजव्या पायाच्या अंगठ्यानीच द्यायचं ."
हे  पण  खूप  भारी  आहे!
पूर्ण पाय दाबून धश्चोट गाडी चालवण्यापेक्षा असं अंगठ्यानी पेट्रोल देण्याने आपला वेगावर अधिक चांगला आणि ग्रॅन्युलर कंट्रोल राहतो.

किंवा हा...   
निखिल, तुझी कार मेन रोड क्रॉस करत असेल तर एकतर थांबायचं ... 
किंवा गाड्या पुरेशा लांब असतील तर झप्पकन निघून जायचं ... 
चलबिचल केलीस तर बाजूने येणाऱ्या गाड्या तूला चिरडू SSS न टाकतील !!
इथे मामा 'चिरडून' हा शब्द एक्झॅक्टली 'रायगडाला जेव्हा जाग येते' मधल्या शिवाजी महाराजांसारखा ठासून बोलतो.
ते साहजिकच आहे म्हणा,
मराठी माणूस तोही गिरगावातला असल्यामुळे नाटकाचा किडा अर्थातच त्याच्यात आहे.
त्याचा 'तरुण तुर्क...' (त्वष्टा कासार ज्ञाती हौशी नाटक मंडळ) मधला 'प्रोफेसर बारटक्के' बघितलाय मी.
अप्रतिम करतो तो.

बरं पण एवढी सगळी धमाल करून मी ड्रायव्हिंग शिकलो का?
खरं तर नाही विशेष... पण ती दीपक मामाची चूक नव्हेच.
असं तीन महिने दर वीकेण्डला जाऊन ड्रायव्हिंग शिकणं म्हणजे...
दर दहा मिनीटांनी पाच सेकंद मेक-आउट करून 'गॅजमची अपेक्षा करण्यासारखं आहे
पण तेव्हा मात्र ऑन पेपर भारी वाटला होता हा प्लॅन...
असो... त्याचं एवढं काही विशेष नाही, नंतर पुण्यातच पंधरा दिवस क्लास लावून रप्पारप गाडी चालायला शिकलोच मी.
पण सिव्हिलाइझ्ड ड्रायव्हिंगचा ऍटिट्यूड मात्र मामानेच दिला.

शिवाय सरत्या हिवाळ्यातल्या रविवारच्या त्या गिरगाव, धोबी तलाव, मरीन लाईन्सच्या प्रसन्न सकाळी...
त्या राहतीलच कायम... आठवणीत.

अजूनही सकाळी गाडी काढताना मी आधी घोकतो,
'रस्त्यावरचे सगळे वेडे  आहेत ... आपणच एकटे शहाणे आहोत '
मग ऍक्सीलरेटर... चुकलो... 'पेट्रोल' वर फक्त आणि फक्त अंगठ्याने हलकेच तिरका दाब देतो...
नाईलाजाने निरोप द्याव्या लागणाऱ्या मित्रासारखा हळूहळू क्लच सोडतो...
आणि ट्रॅफिकच्या रणधुमाळीत घुसतो...
गाडी बंद न पाडता :)


----------------------------------------------------- समाप्त ------------------------------------------------------
-नील आर्ते  









  

2 comments: