Thursday 14 November 2019

(देह-फुलं: ६) बोटं

क टाईम होता जेव्हा मला स्पर्श नको-नकोसा वाटायचा... कोणाचाच... कसलाही.
शाळेत तर मला नावच पडलं होतं, "अंगचोर" म्हणून.
सातवी आठवीतली मुलं त्यातही मुली प्रचंड क्रूर असतात, त्यांना चिडवायला खूप आवडतं...

माझ्या पाठच्या बाकांवरूनही खुसफुसते आवाज यायचे,
अंगचोर, ए टच मी नॉट, ए विअर्डो...
आणि माझे डोळे पाण्याने डबडबायचे.
पण आधी मी अशी अजिबातच नव्हते खरं तर.
आई म्हणायची भारी खेळकर पिल्लू होते मी.
कोणालाही धावत जाऊन बिलगायची मी आणि खुदुखुदू हसायची.

पण बहुतेक मी दहा वर्षाची असताना कधीतरी ते चालू झालं.
मी एकटी किचनमध्ये जाऊन घटाघटा पाणी पीत होते आणि अचानक माझ्या मानेवर बोटं रेंगसली.
कर्र-कर्र आवाज करत धारदार नखं माझ्या बॉयकट मानेवरून हळूहळू खाली उतरली... पाठीच्या पहिल्या मणक्यापर्यंत.
असं दोन तीनदा वर खाली झालं... फार नाही पाच-एक सेकंद.
आणि खरंतर पहिल्यांदा मला भीतीपण नाही वाटली.
उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाठीवर मेजर घामोळी आली होती...
सो ती करकरीत नखं फिरताना खाज शमल्यासारखं झालं... बरंही वाटलं...
मी हसत पाठी बघितलं...  तिथे कोणीच नव्हतं.
फक्त तिन्हीसांजेचं अंधारत चाललेलं किचन... आमचा जुनाट रागीट घुम्या फ्रीज आणि पोटाचा तुकडा काढलेलं ओट्यावरचं लालभडक कलिंगड...
मी किंचाळत बाहेर आले एव्हढंच आठवतंय मला...

आणि मग ते चालू झालं.

बरोब्बर दहा बोटं अवचित कधीही माझ्या मानेवर फिरायची.
ते सुद्धा अगदी वरचेवर नव्हे.
कधी कधी तर दोन-तीन महिन्यांच्या गॅपनीसुद्धा.
खरं तर त्या कोणत्यातरी काळोख्या अज्ञातातून आलेल्या नख्यांनी मला जखम कधीच नाही केली.
पण भीती वाटायचीच.
कोणाचाच स्पर्श नको वाटू लागला मला त्या लुब्र्या बोटांमुळे.
माझी हसा-खेळायची अलवार वर्षं कुढत काढली मी त्या बोटांमुळे.

पण एकेदिवशी...

मी पिक्चर बघत होते.
अनुष्का शर्माचा "एन-एच १०".
डाव्या उजव्या बाजूच्या दोन्ही सीट्ससुद्धा मीच घेतल्या होत्या अर्थात.
हो कोणाचा टच नको व्हायला.

माझा क्रश होती अनुष्का म्हणजे...
त्यातला सीन आहे ना ती त्या खाप गुंडांना चुकवून भिंत क्लाइम्ब करून जाते.
आणि वरून ओरडते फ SSS क यु!!!
नेमकं तेव्हाच त्या बोटांनी खरवडलं मानेवर.
...
...
...
चुकलंच त्यांचं...

तो अनुष्काचा ब्राव्हाडो बघून मला कसा कोण जाणे पण चेव आला आणि मी गप्पकन दोन्ही हात पाठी नेऊन ती बोटं पकडली.
रंगेहात पकडले गेल्यावर एक क्षण ती बोटंही बावचळली  आणि स्तब्ध झाली क्षणभरच.
पण मग मात्र त्यांची निकराची वळवळ चालू झाली माझ्या हातात.
मी मात्र इतक्या वर्षांचा राग काढत दात ओठ खाऊन "एम-सी बी-सी" शिव्या पुटपुटत त्यांना माझ्या बोटांत आवळून धरलं.
जणू पडद्यावरची चवताळलेली अनुष्का माझ्यात शिरली होती.
मिनिटभर आमची झटापट चालू राहिली...
मी तर आज शेंडी तुटो व पारंबी तुटो अशा आवेशात होते...
आणि अचानक त्या हात-रहीत बोटांनी तह केला.
पुढच्या दहा सेकंदांत ती बोटं वळवळायची थांबली... स्तब्ध झाली.
आणि प्रत्येक बोटानी - माझ्या प्रत्येक बोटाला हलकेच ढुशी दिली.
जणू त्यांना समझोता करायचा होता... एकत्र नांदायचं होतं!
...
...


रात्री मी पिक्चर बघून घरी आले आणि डॅडूला घट्ट मिठी मारली, मम्मीचे गाल ओढले...
कित्येक वर्षांनी...
ते दोघं तर आनंदानी कपडे फाडायचेच बाकी होते.
...
...

आता त्या बोटांना मी कंट्रोल करायला शिकलेय...
त्यांना चक्क मी काही कन्स्ट्रक्टीव्ह गोष्टी शिकवल्या...
उदाहरणार्थ गिटार...
कॉलेजमध्ये अपकमिंग गिटारीस्ट म्हणून नाव व्हायला लागलंय माझं.
माझा कॉन्फिडन्सही परत आलाय.
चक्क रॉकस्टार बनायचा मार्गावर आहे मी...
मोठ्ठे मोठ्ठे लूज फ्लॅनेलचे शर्ट्स, आणि फाटक्या जीन्स माझी सिग्नेचर स्टाईल होत चाललीय कॉलेज फेस्ट्स मधली.
कसंय ना एक्स्ट्रा लांब बाह्या असल्या की मला "माझी" बोटं वापरता येतात बिन्धास गिटारवर कोणालाही न दिसता (;)

जिमी पेज, एरीक क्लॅप्टन, स्लॅश, हेन्ड्रिक्स, हेटफील्ड काय काय म्हणायला लागलीयत पोरं-पोरी मला.

काल एक नवीनच मैत्रीण झालीय मीरा म्हणून...
माझ्या गिटार रीफ्सच्या प्रचंड प्रेमात आहे. माझ्या बोटांत जादू आहे म्हणतेय.
आज रात्री भेटतोय आम्ही तिच्याकडे.
रम पीत-पीत लेड-झेपलीन ऐकायचा प्लॅन आहे.
पुढे बघूया, व्हेअर दी नाईट टेक्स अस...

कदाचित लेड झेपचं "स्टेअर वे टू हेवन" चालू असेल...
कदाचित "रम्स-अप" नाकात झिणझिण्या, जिभेत गोडवा, घशात गरमी आणि मनात कांड आणत असेल.
कदाचित मिणमिणत्या कँडल्समध्ये तिचे कोनॅकच्या रंगाचे डोळे चमकत असतील.
कदाचित माझ्या मेन्स (हो मला मुलांचे पर्फ्युमच आवडतात) पर्फ्युमचा वास घ्यायला ती माझ्या मानेजवळ येईल.
कदाचित मी तिचा नवीन ब्राऊन लेदरचा बेल्ट बघायला तिच्या पोटाजवळ जाईन.
कदाचित मी तिथेच थांबेन.
कदाचित बेल्टचं पॉलिश हुंगेन.
कदाचित मी तिचं गोलसर पोट निरखून बघेन.
कदाचित तिच्या बेल्टचं चमचमणारं पितळी बक्कल निघतं का मी जस्ट म्हणजे जस्ट चेक करेन.
कदाचित ती मला छातीवर गुब्ब दाबून घेईल.
कदाचित माझे हात खाली सरकतील.
कदाचित ती माझे जाडसर कुरळे केस हुंगेल.
कदाचित मी कँडल्स पाडून अंधार करेन...
कदाचित ती कण्हल्यासारखी हसेल.
आणि मग "माझी" जादूगार बोटं कर्र्कन बाहेर येतील आणि तिला "स्वर्गाच्या पायऱ्यांवर" नेतील... कदाचित!     


-नील आर्ते

निखिल क्षिरसागर याच्या कथेचे स्वैर रूपांतर.
मूळ कथेची लिंक: the fingering


1 comment: