Friday, 14 January 2022

मांजा (sober)

संक्रांतीपूर्वी एक आठवडा:
कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता.
'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज.
नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात.
तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि क्लासची वेळ झाल्यामुळे तो कल्टी मारायच्या तयारीत होता.
मन्या मात्र फुल्ल फॉर्ममध्ये होता. तसा तो नेहमीच असायचा.
लागोपाठ चार पतंगी कापल्या होत्या त्यानं.
चार तोळे कडक खरवाल्या बदामी मांजाची पूर्ण फिरकी बदवून आकाशात इवलूसा ठिपका दिसत होता त्याचा पतंग.
पूर्ण स्थिर, गुम्म... घारी-बिरींनापण पाठी टाकून वर वर चालला होता त्याचा दुरंगा.

बाकी तीन-चार छोटी पोरं इकडे तिकडे लुडबुडत होती.
सुमितनं तर चक्क प्लास्टिकच्या पिशवीला दोरी बांधून तीच उडवायची ट्राय चालवली होती.
सिध्धूनी घरच्या घरीच लोकसत्ताचा हीराच्या काड्या लावून पतंग बनवलेला.
पण तो काय नीट जमला नव्हता. कठड्यावरच ठाप खाऊन परत परत सिध्धूच्या तोंडावरच येत होता तो.
पिनाकनं मात्र छान छोट्याश्या फिरकीला मांजा गुंडाळला होता.
आईच्या मागे लागून छोटूशी पतंगपण आणली होती.
खूप म्हणजे खूप आवडायची त्याला पतंग. या सगळ्या दादा लोकांसारखीच आकाशात उंच पतंग बदवून काटाकाटी करायचं त्याचं आवडतं स्वप्न होतं.
मागे एकदा तपेलीदादानं बदलेली पतंग पिनूच्या हातात दिली होती थोडावेळ, तेव्हा खूप मस्त वाटलेलं त्याला.
दूरवर गेलेली पतंग जवळजवळ आकाशाला टेकलेली... इतक्याजवळ की पतंगीवर मेसेज लिहिला तर तो बाबांपर्यंत पोचेल बहुतेक.
आणि तो मांजा... अस्सा वाऱ्यानं वाकडा झालेला... स्टाईलमध्ये.
मागच्या वर्षी बाबा होते तेव्हा तो, आई आणि बाबा त्या जंगल सफारीला गेले होते.
तिकडचा जंगलातला रोडसुद्धा असाच होता... ऐटबाज वाकडा... त्याची आठवण झाली त्याला.
पतंग तिकडे लांबवर असली तरी मांजा त्याची बोटं ओढत होता...
पॅंटला धरून हळूहळू खेचणाऱ्या माऊच्या पिल्लासारखा वाटलेला त्याला तो मांजा...
हातातून सोडूच नये असं वाटलेला... पण तेवढ्यात त्याला पाठीमागे काहीतरी टोचलेलं...
बघतो तर मन्यादादा त्याला एकदम पाठी चिकटून उभा असलेला...
आणि विचित्र हसत असलेला... पण मग नारळदादा मन्यादादाला ओरडलेला.
 
पण त्या दिवसानंतर पिनू मन्यापासून जरा लांबच राह्यचा.   
आत्ताही तो थोडं अंतर राखूनच होता.
पतंग काय विशेष उडत नव्हती त्याची खरंतर... पण तो आपला प्रामाणिकपणे सगळ्या दादा लोकांचं बघून पतंगीला टिचक्या देत होत्या.

इतक्यात वरती आकाशात दिलावरचा कौवा सरसरत आला आणि मन्या तरारला.
दिलावर म्हणजे मन्याचा एक नंबर रायव्हल. प्रेरणावरून दोघांमध्ये ठसन चालू होती.
मन्यानं कावळ्यासारखा एक डोळा समोरच्या खिडकीत वळवला.
दळवींची प्रेरणा चहा पीत खिडकीतच उभी होती... बेस्ट चान्स... इम्प्रेशन मारायचा.
त्यानं आपली पतंग किंचित उतरवून दिलावरच्या पतंगीवर क्रॉस टाकली आणि तो रापराप घसटी मारायला लागला.
दिलावर सुद्धा तिकडून घसटायला लागला.
प्रेरणापण वरच बघत होती.
'च्यायची दिल्याची पतंग लटकवून दोन्ही पतंगी उतरवून दाखवायच्या प्रेरू डार्लिंगला.'
मन्या तापला.

पिनाक थोडं बाजूला धडपडत होताच...
इतक्यात एक रँडम वाऱ्याचा झोत आला आणि त्याची पतंग मन्याला क्रॉस पडली...
अगदी हातभर अंतरावर...
पिनाक थोडा गडबडला आणि त्यानं पतंग खेचली... आणि...
मन्याचा मांजा सपकन तुटला!

मन्याला क्षणभर काही कळलंच नाही... की गॅलरीत प्रेरणा खदाखदा का हसतेय ते...
मग त्याला उं SSS च आकाशात गुल झालेली पतंग दिसली... आणि त्याची तार सटकली.
त्यानं भांबावलेल्या पिनाकच्या फाडकन एक कानफटात मारली, "चुत्या साला. मध्ये मध्ये आपली #$ घालतोय."
तो पिनाकला अजून मारणार होता पण तपेली आणि नारळनी त्याला पकडला.

पिनाकच्या डोळ्यासमोर अंधारल्यासारखं होत होतं...
फुटणारं रडू आवरत त्यानं पतंग घेतली आणि तो खाली आला.
त्यानं कुलूप काढून दार उघडलं. आई ऑफिसमधून यायला अजून दोन तास तरी होते.
वाटीत खाऊ काढून ठेवला होता तिनं... पण त्याचा गाल दुखत होता आणि मूडही नव्हता.
त्यानं पतंग-फिरकी टी.व्ही.खाली ठेवली आणि त्याला एकदम आठवलं,
'डांगूल'ला खाणं द्यायचं विसरूनच गेला होता तो.
त्यानं फ्रीजमधून डेअरी-मिल्कचा छोटासा तुकडा काढला आणि तो गॅलरीतल्या तुळशीजवळ आला.
त्यानं हलकेच हाक मारली आणि आणि कुंडीतून गांडुळासारखा दिसणारा सोनेरी-हिरवट रंगाचा डांगूल सरसरत बाहेर आला.
त्यानं प्रेमानं पिनूच्या हाताला हलकेच दंश केला आणि त्याच्या हातातलं चॉकलेट मटामटा खाल्लं.
डांगूल पिनूचा बेस्ट फ्रेंड होता. सगळं सगळं सांगायचा तो डांगूलला.जेव्हा बाबा होते मागच्या वर्षी तेव्हा तो, आई आणि बाबा जंगल सफारीला गेले होते... खूप मजा आली होती.
जीपच्या ड्रायव्हर काकांनी त्यांना जंगलाच्या एकदम आत नेलं होतं.
तिकडे म्हणे एलियन्सचं प्लेन क्रॅश झालं होतं असं सगळे म्हणत होते...
पण बाबा म्हणत होते की ती अफवा होती कारण त्यांना एलियन्सचं प्लेन किंवा एलियन्स काहीच दिसलं नाही.
त्यांची जीप मात्र पंक्चर झाली... आणि तिकडेच दगडाखाली पिनाकला डांगूल दिसला होता.
मुंग्या लागलेला... अर्धमेला.
पिनूनं त्याला वॉटरबॅगेतलं पाणी पाजलं आणि कोणाचं लक्ष नाही असं बघून हळूच वॉटरबॅगेत घालून घरी आणलेलं, आणि कुंडीत लपवून ठेवलेलं.

डांगूलला तो सगळं सांगायचा आणि  डांगूलही त्याच्याशी बोलायचा पण तोंडाने नाही तर त्याच्या वळवळत्या शरीराची अक्षरं करत:
"हा य पि नू मु ड ऑ फ?" 

आता मात्र पिनूला रडं आवरलं नाही आणि त्यानं गच्चीवरची सगळी गोष्ट डांगूलला भडाभडा सांगितली...
मन्यादादा पाठून त्याला चिकटायचा ते सुध्दा.

डांगूल आधी काहीच बोलला नाही फक्त थरथरत राहीला...
आणि मग पटापटा अक्षरांची वेटोळी करायला लागला:
"ए क आ ठ व डा   
म  ला  बा  री  क  व्हा य ला  ला  गे  ल 
आ  णि  लां  ब     खु  प  लां  ब 
प ण  नु स तं  चॉ क ले ट  खा ऊ न  चा ल णा र  ना ही 
तु झं थो डं सं  र क्त  प्या वं  ला गे ल 
अ ग दी  थो डं 
चा ले ल  ?
आ णि  आ ई ला  सां गू  न को स "

तसंही पिनू आईला सांगणार नव्हताच,
तिनं रानमांजरीसारखा ओरबाडला असता मन्याला पण मग त्याचं पतंग उडवणं बंद झालं असतं.

पिनूनं मान डोलावली आणि डांगूल त्याच्या बोटाला खुषीत लुचला.

संक्रांतीची संध्याकाळ:
आख्ख आकाश पतंगींनी भरलं होतं.
लाल, हिरव्या, जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या पतंगी...
आणि त्यांचे बा SSS रिक दिसणारे मांजे...
बदामी, घासलेटी, तारवाला, साखळीछाप मांजे... अगदी फुलपुडीचे दोरेसुद्धा.

नारळला कोणी आज सुखाने फक्त पतंग उडवू देणार नव्हतंच, त्याने नाईलाजाने दोन पतंगी कापल्या होत्या.
तपेलीच्या दोन ऑलरेडी 'कायपो छे' झाल्या होत्या आणि तो तिसरीची कणी बांधायला बसला होता.
आणि मन्या...
मन्यानी सात पतंगी कापल्या होत्या... नॉट आऊट... त्यात दिलावरच्या दोन.
खिडकीतून प्रेरणानं त्याला चक्क अंगठा आणि पहिल्या बोटाचा गोल दाखवून लाईन दिली होती.
पतंगीसारखाच मन्या हवेत होता...

आणि गच्चीत पिनाक आला.

हातात भला मोठा ढेल पतंग... गुलाबी रंगाचा...  मध्ये निळाशार चांद.
आणि रक्तासारखी लाल लांबलचक शेपूट.
भर्र वाऱ्यात फुरफुरणारा पतंग... शर्यतीच्या घोड्यासारखा.
आणि दुसऱ्या हातात फिरकी... पूर्ण भरलेली... हिरवट सोनेरी मांजाने.

माहित नाही का पण सगळे अगदी गप्प झाले होते. 
पिनू इकडेतिकडे न बघता सरळ मन्याच्या विरुद्ध बाजूला गेला आणि त्याने पतंग कठड्यावरून खाली सोडली. पुढच्या क्षणाला त्याची पतंग वर झेपावली... त्याच्या पुढच्या क्षणाला ती सरसर जायला लागली. 
फिरकीतून सटासट मांजा सुटत होता आणि पतंग वर... अजून वर. 
निळा चांद गुलाबी रंगात मिसळला. 
लांबवर छोटूसा ठिपका दिसायला लागला वळवळणाऱ्या शेपटीसकट... विजयी शुक्रजंतूसारखा. 

दिलावरनं त्याच्या गच्चीतून नवा शिकाऊ बकरा हेरला आणि पतंग पिनूच्या पतंगीवर टाकली. 
तो सपासप घसटी मारायला लागला... 
आणि... आणि... त्याचीच पतंग कटली. 
दिलावर कपाळावर हात मारत फिरकी गुंडाळायला लागला. 
पिनू खुषीत हसला आणि शांत झालेल्या गच्चीवर पुन्हा आनंदी कल्ला झाला. 
मन्या सोडून सगळेच पिनूच्या नावानं ओरडत होते,
"सही छोट्टे!" "हक् है तेरेको जिनेका!" "हय पिनू!" "भाई शिकला पोरगा पतंग!"

पिनूनं मिस्कील हसत त्याची पतंग तपेलीच्या पतंगीवर टाकली आणि हलकेच घसटी मारली... 
तपेलीचा दुरंगा गुल्ल झाला.  
पण तो खाली जायच्या आतच त्यानं दुरंगा वरच्यावर आपल्या मांजावर लटकावला आणि हळूहळू खाली उतरवत तपेलीच्या हातात दिला. 
तपेलीनं आधी आ वासला आणि मग कौतुकानं पिनूच्या पाठीत धपाटा घातला. 

आता त्याचा मांजा सरसरत नारळच्या पतंगीकडे चालला होता,
पण पिनू हळूच काहीतरी मांजाजवळ जाऊन पुटपुटला आणि डांगूलनं नारळच्या पतंगीखालून हळूच स्वतःला सोडवला आणि त्याला एकटा सोडला. 

मग डांगूल वळला मन्याकडे     
   
उंचच उंच आकाशात दोनच पतंगी होत्या आता.
मन्या आणि पिनाक...
मन्याची जास्तच उंच उडत होती कारण तपेलीची पतंग लटकावण्याच्या नादात पिनूनं आपली पतंग बरीच उतरवली होती.
पण त्यानं हलकेच टिचकी दिली आणि पिनूची पतंग सपसप आकाशात चढू लागली.
मिनिटभरात ती मन्याच्या पतंगीला भिडली.
मन्या चवताळला.
त्यानं घसटी मारायला चालू केली सपासप दोन्ही हातांनी.
पिनू मात्र ढील देत होता अजून अजून.
मन्यानं तोंडात शिवी पुटपुटत फायनल हिसका मारला...
डांगूलनं आपले अणुरेणू फिरवत सूक्ष्म अणकुचीदार दात बाहेर काढले आणि चावा मारला.
बरोब्बर मन्याच्या कण्णीखाली.
दुसऱ्याच क्षणी मन्याची पतंग गुल्ल!

मन्या क्षणभर बघत राह्यला आणि मग दात ओठ खात पिनाकच्या दिशेनी सरकला...
पण थबकला.
गच्चीवरच्या मावळत्या उन्हात पिनाकचे डोळे वेगळेच चमकत होते.
आणि हातात तो बारीक धारदार मांजा... लवलवणारा.
का कोणास ठाऊक पण मन्याला धीर झाला नाही पिनूवर हात उचलायचा.
तो हळूहळू पाठी झाला.
त्याचे कान शरमेनी गरम झाले होते... सगळा उत्साह गळलेला...
तो खांदे पाडून परत फिरला...

इतक्यात...

त्याच्या पायात मांजाचं वेटोळं बसलं आणि तो भिरकावला गेला...
आधी कठड्याकडे आणि मग खाली... खूप खाली.

----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते


No comments:

Post a Comment