Thursday 14 September 2023

बॉम्ब देम

मी ब्लेन्डर्स प्राईडचा एक हलका सिप मारला, चार बॉईल्ड चणे तोंडात टाकले आणि गंमतीत सभोवार नजर टाकली,

मला आमच्या वांद्रे पूर्वच्या उजाला किंवा खरंतर उपनगरातल्या कोणत्याही मध्यममार्गी बारमधील शनिवार संध्याकाळ फारच आवडते. 

एक वेगळीच व्हाइब असते शनवारी आणि वीकेण्ड असूनही ती मजा शुक्रवारी किंवा रविवारी रात्री नसतेच नसते. 

रविवार तर पुढच्या खूनी मंडेच्या चाहुलीने थोडा डागाळलेलाच असतो.

आणि शुक्रवारसुद्धा आधीच्या पाच दिवसांच्या धबडग्यातून पुरेसा फ्री झालेला नसतो. 

पण शनवार रात्र मात्र छान असते... परफेक्ट... २८ च्या पुष्ट बाईसारखी!

मला ड्रिंक्सचं एवढं काही तूफान आकर्षणही नाहीये मी उजालामध्ये ही शनवार रात्रीची आनंदी गर्दी बघायला येतो खरंतर. 

बहुतेक सगळेजण तावातावानी बोलत असतात. काही सुम्मसुद्धा असतात. 

मध्येच ओळखीच्या टेबलावर जाऊन हात मिळवतात, पाठीत थापा मारतात. 

सिगारेट्स, ओल्ड मॉंक, चिकन चिली आणि आनंदाचा एक संमिश्र वास भरून राह्यलेला असतो आख्ख्या बारमध्ये. 

फार छान वाटतं मला हे सगळं. 

लॉलीपॉपसारखं मनातल्या मनात चोखत राहतो मी हा माहौल. 

आख्ख्या विश्वातल्या पुरुषजातीचा एकच मॅस्क्युलाइन गोळा बनलाय आणि त्याचा मी एक छोटासा आनंदी कण झालोय असं काही बाही वाटत राहतं मला. 

त्या खुशीतच मी अजून एक मोठ्ठा सिप मारला. 

पण थांबा! वरचं ते मॅस्क्युलाइन गोळ्याचं वाक्य खोडावं लागेल मला बहुतेक. 

अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूच्या टेबलावर चक्क एक मुलगी बसलीय. 

आता अर्थातच मुंबईसारख्या कॉस्मो ठिकाणी क्वार्टर बारमध्ये पोरगी दिसणं दुर्मिळ असलं तरी अब्रह्मण्यम किंवा अशक्य नक्कीच नाही... 

पण मग आधी का नोटीस झाली नाही ही?

माझा दुसरा छोटा चालू होता आणि मी तसाही स्लो ड्रिंकर आहे. 

आधीच तुम्हाला सांगीतल्याप्रमाणे माहौलसाठी पितो मी. 

ती लोकांची गडबड बडबड मचमच, चकली आणि शेझवान सॉस, 

ती शेट्टी बारमधली राखाडी योकची उकडलेली अंडी. 

"ही अशी योकची ग्रे शेड फक्त शेट्टी बारमध्येच दिसते. कशी कोण जाणे?"

च्यायला माझ्या मनातलंच वाक्य ती पोरगी मोठ्ठ्यानं बोलत होती? मी थोडा अचंबलो. 

पण प्रतिक्षिप्त क्रियेनी माझ्या तोंडून निघून गेलं,

"हो ना घरी बॉईल केलेला योक पिवळा असतो."

"असेल आहार असोसिएशनचं काहीतरी ट्रेड सिक्रेट", ती हलकेच हसत बोलली. 

ती बाजूच्या टेबलावर अर्धवट काटकोनात वळून माझ्याशी बोलत होती. 

मी तिला थोडं नीट बघितलं आणि मला दोन गोष्टीत सट्टकन आठवल्या,

एक: अनंत सामंतांच्या टॅप देम कथेतल्या मिसेस तारकुंडे 

आणि 

दोन: प्री-डेस्टिनेशन मूव्हीमधली जॉन / जेन