Thursday 14 September 2023

बॉम्ब देम

मी ब्लेन्डर्स प्राईडचा एक हलका सिप मारला, चार बॉईल्ड चणे तोंडात टाकले आणि गंमतीत सभोवार नजर टाकली,

मला आमच्या वांद्रे पूर्वच्या उजाला किंवा खरंतर उपनगरातल्या कोणत्याही मध्यममार्गी बारमधील शनिवार संध्याकाळ फारच आवडते. 

एक वेगळीच व्हाइब असते शनवारी आणि वीकेण्ड असूनही ती मजा शुक्रवारी किंवा रविवारी रात्री नसतेच नसते. 

रविवार तर पुढच्या खूनी मंडेच्या चाहुलीने थोडा डागाळलेलाच असतो.

आणि शुक्रवारसुद्धा आधीच्या पाच दिवसांच्या धबडग्यातून पुरेसा फ्री झालेला नसतो. 

पण शनवार रात्र मात्र छान असते... परफेक्ट... २८ च्या पुष्ट बाईसारखी!

मला ड्रिंक्सचं एवढं काही तूफान आकर्षणही नाहीये मी उजालामध्ये ही शनवार रात्रीची आनंदी गर्दी बघायला येतो खरंतर. 

बहुतेक सगळेजण तावातावानी बोलत असतात. काही सुम्मसुद्धा असतात. 

मध्येच ओळखीच्या टेबलावर जाऊन हात मिळवतात, पाठीत थापा मारतात. 

सिगारेट्स, ओल्ड मॉंक, चिकन चिली आणि आनंदाचा एक संमिश्र वास भरून राह्यलेला असतो आख्ख्या बारमध्ये. 

फार छान वाटतं मला हे सगळं. 

लॉलीपॉपसारखं मनातल्या मनात चोखत राहतो मी हा माहौल. 

आख्ख्या विश्वातल्या पुरुषजातीचा एकच मॅस्क्युलाइन गोळा बनलाय आणि त्याचा मी एक छोटासा आनंदी कण झालोय असं काही बाही वाटत राहतं मला. 

त्या खुशीतच मी अजून एक मोठ्ठा सिप मारला. 

पण थांबा! वरचं ते मॅस्क्युलाइन गोळ्याचं वाक्य खोडावं लागेल मला बहुतेक. 

अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूच्या टेबलावर चक्क एक मुलगी बसलीय. 

आता अर्थातच मुंबईसारख्या कॉस्मो ठिकाणी क्वार्टर बारमध्ये पोरगी दिसणं दुर्मिळ असलं तरी अब्रह्मण्यम किंवा अशक्य नक्कीच नाही... 

पण मग आधी का नोटीस झाली नाही ही?

माझा दुसरा छोटा चालू होता आणि मी तसाही स्लो ड्रिंकर आहे. 

आधीच तुम्हाला सांगीतल्याप्रमाणे माहौलसाठी पितो मी. 

ती लोकांची गडबड बडबड मचमच, चकली आणि शेझवान सॉस, 

ती शेट्टी बारमधली राखाडी योकची उकडलेली अंडी. 

"ही अशी योकची ग्रे शेड फक्त शेट्टी बारमध्येच दिसते. कशी कोण जाणे?"

च्यायला माझ्या मनातलंच वाक्य ती पोरगी मोठ्ठ्यानं बोलत होती? मी थोडा अचंबलो. 

पण प्रतिक्षिप्त क्रियेनी माझ्या तोंडून निघून गेलं,

"हो ना घरी बॉईल केलेला योक पिवळा असतो."

"असेल आहार असोसिएशनचं काहीतरी ट्रेड सिक्रेट", ती हलकेच हसत बोलली. 

ती बाजूच्या टेबलावर अर्धवट काटकोनात वळून माझ्याशी बोलत होती. 

मी तिला थोडं नीट बघितलं आणि मला दोन गोष्टीत सट्टकन आठवल्या,

एक: अनंत सामंतांच्या टॅप देम कथेतल्या मिसेस तारकुंडे 

आणि 

दोन: प्री-डेस्टिनेशन मूव्हीमधली जॉन / जेन

 

हिनंही तसाच झाराचा मेन्स ब्लेझर, शर्ट आणि पॅन्ट घातली होती. 

डोळ्यांवर मोठ्ठा गोल चष्मा, केस अस्ताव्यस्त बॉयकट कुरळे पण तिच्यात एक अनकन्वेन्शनल गोडवा होता. 

एका गीकी अँगलने तिला सेक्सीही म्हणता आलं असतं कदाचित. 

"अनंत सामंत आवडते लेखक आहेत का तुझे?",

माझ्या टेबलावर "एम टी आयवा मारू" पडलं होतं. 

शनिवारी संध्याकाळी पार्ल्याच्या टिळक मंदिरातून पुस्तक बदलायचं,

मग वांद्रयाच्या हनुमान मंदिरातली देखणी, बांधीव, रागीट आणि म्हणूनच सेन्शुअस वाटणारी सहा फूटी मारुतीची मूर्ती कौतुकानं बघायची, प्रसाद घ्यायचा, 

आणि मग उजालात बसायचं हा माझा गेली कित्येक वर्षं ठरून गेलेला शनवारचा फिक्स कार्यक्रम होता. 

"हो सामंतांच्या एका कथेतल्या मिसेस तारकुंड्यांसारखाच गेटअप आहे तुझा. 

आवडते असले तरी फारसं नाही वाचलंय त्यांचं मी खरं तर. काही कथा आणि 'अविरत' वाचलंय आणि 'ऑक्टोबर एण्ड'. अविरत अफलातून आहे पहिले पाहिले पण शेवटाकडे काहीही होत जातं."

मी ताडताड बोलत गेलो आणि मला छान वाटत होतं. 

"हम्म शेवट वेगळा आहे थोडा पण मला आवडलं अविरत. 

त्याच्याही पुढेच जाऊन मी तर म्हणेन की प्रत्येक चांगल्या लेखकाला रादर कलाकाराला हक्क आहे वाईट कलाकृती बनवायचा. 

एकामागोमाग एक न चुकता फक्त चांगल्या परफेक्ट कलाकृती बनवणं कसं शक्य आहे यार?"

मी म्हटलं, "म्हणजे राम गोपाल वर्माच्या शोलेसारखं?"

आणि आम्ही दोघांनी खदखदून हसत एकमेकांना टाळ्या दिल्या. 

"पण खरं तर सत्यानंतर असे अनंत वाईट पिक्चर त्याला माफ आहेत", ती मनापासून म्हणाली. 

ती मग सरळ माझ्याच टेबलावर शिफ्ट झाली आणि आमच्या गप्पा रंगात गेल्या... 

रामू, ब्लॅक मिररचे एपिसोड्स, थ्री बिलबोर्डस्..., शिरवळकर, धारप, मेघना पेठे, लेड झेपलीन नी काय काय. 

आम्ही तावातावाने कौतुक करत, शिव्या घालत, भांडत गप्पा मारत राह्यलो. 

ती मस्त तब्येतीत तिचं रम आणि आणि थम्स-अप पीत होती. 

मीही गप्पांच्या नादात नेहमीच्या कोट्याच्या बराच पुढे गेलो पण छान बझ् आलेला. 

असा काय तुफान टाईट वगैरे झालेला नव्हतो. 

बारमधला कोलाहल आता बॅकग्राऊंडला गेल्यासारखा झालेला. 

आतून छान हलकं वाटायला लागलेलं आणि समोर बसलेली ती जन्मजन्मांतरीचा मित्र असल्यासारखी पुरषी स्त्री किंवा स्त्रैण पुरुष. 

काहीही ठीकच खरं तर. 

पण मला पुन्हा प्री-डेस्टिनेशन आठवला आणि मी तिला हलकेच विचारलं,

"प्री-डेस्टिनेशन बघितलायस?"

माझ्या आवाजाला कधीच न ऐकलेला एक मखमली खर्ज आलेला. मलाच आवडला तो. 

>>>>

स्पॉयलर ऍलर्ट:

प्रिय वाचक खालील परिच्छेद प्री-डेस्टिनेशन ह्या अप्रतिम मूव्हीविषयी स्पॉयलर आहे. 

जर तुम्ही प्री-डेस्टिनेशन बघितला नसेल तर आणि बघणार असाल (आणि हा ब्रिलियंट मूव्ही जरूर बघा)

तर किमान मूव्ही बघण्याआधी हाय-लाईट केलेली वाक्ये वाचू नका. 

>>>>

ती खुद्कन हसली आणि म्हणाली, 

"ऑफकोर्स बघितलाय पण का रे?

आपण दोघंही एकच व्यक्ती आहोत वगैरे वाटलं की काय तुला?"

मी गंमतीत खांदे उडवले. मला खरं तर एकदाच उडवायचे होते. 

पण मला फार मजा वाटली म्हणून मी आणखी दोनदा उडवले. 

बझ् अजून अजून मजेशीर वाटायला लागलेला... जय ब्लेंडर्स प्राईड!

"व्हाय नॉट?", मी म्हणालो,

"तू जेन मी जॉन किंवा तू जॉन मी बारटेंडर ही ही ही"



तिनं मायेनं माझ्या गालावर थोपटलं. 

साय-फायचा मोठ्ठा फॅन आहेस ना तू?

"खूप मोठ्ठा", मी पुन्हा हात हवेत उडवले एकदा, दोनदा आणखी दोनदा. 

किंचित डुलत होतो मी. 

"प्री-डेस्टिनेशन तर नाही पण कदाचित दुसरी एखादी सायफाय चालू असेल इथे आत्ता. 

काय म्हणतोस?", तिनं डोळे मिचकावत विचारलं. 

"सांग सांग मला मी खरंच फॅन आहे", माझा उत्साह फसफसायला लागला होता. 

तिचे डोळे लुकलुकायला लागले होते. 

मला पुन्हा मिसेस तारकुंडेंची आठवण झाली. 

समज मी तुला सांगितलं की मी एक मानवी बॉम्ब आहे तर?

मला हसायचं नव्हतं पण मी हसलो फिस्सकन. 

"हसतोस काय येड्या? 

तुला नाही वाटत कधी साफ फुटून जावं असं?

व्हाट्सऍप वरचा आंधळा चुत्यापा बघून?

एक एक सणांचं आठवडाभर आंबोण लावणारया सिरियल्स बघून?

फेसबुकवरच्या मठ्ठ पोस्ट्स वाचून,

अन्न अजिबात न खाता, चावता, हात लावता, वास घेता फक्त इन्स्टावर फोटो टाकणारे लोक बघून तिळपापड नाही होत तुझा?

परातभर मटण आणि एक एक रोटी एका घासात बकासुरासारखे गबागबा खाणारे व्हिडीओज बघून मळमळत नाही तुला?

प्लास्टिकच्या किंवा खऱ्या बंदूका घेऊन पोज देणाऱ्या सांडांचे आणि 

एका बाजूला केस सोडून डोळे रोखून क्रीपी बघत रहाणाऱ्या पुरंध्र्यांचे व्हिडीओज बघून जीव नाही द्यावासा वाटत तुला?

काय बोलायचं, काय घालायचं, काय खायचं, काय लिहायचं, कपाळी कुंकू रेखायचं की नाही, कोणा नेत्याची थट्टा करायची की नाही, कुण्णाकुण्णाच्या भावना न दुखावता कसं लिहायचं? वाचायचं??

हे प्रश्न पडून डोकं नाही दुखत तुझं?

ह्या ना त्या कारणानी चवताळलेल्या उन्मादी जमावाकडून आपण ठेचले जाऊ ह्या भीतीनी जीव घाबरा नाही होत तुझा?

फूटपाथवर बिंधास बाईक घालणारे आपण, 

बाजूला बसलेल्या गरत्या बाईची पर्वा न करता घाण घाण शिव्या देत गप्पा मारणारे आपण,

रस्त्याच्या कडेला मुतणारे आपण,

अर्वाच्य बोलत माथी भडकवणारे नेते पण आपणच. 

लेबर पळून जाऊ नये म्हणून त्यांना कुत्र्यागत साखळीने बांधणारे आपण. 

आणि अश्राप पोरींवर पाशवी बलात्कार करणारे पण आपणच.",

तिचा आवाज चढल्यासारखा झालेला,

डोळे चष्म्यात गरागरा फिरत होते. 

अधिकाधिक मिसेस तारकुंड्यांसारखी दिसायला लागली होती ती. 

आजूबाजूची पब्लिकही आमच्याकडे आता उत्सुकतेनं बघायला लागली होती. 

तिनं सगळ्यांकडे दात विचकत एक चिअर्स केलं, बॉटम्स अप मारला आणि चेहेऱ्यावर विचित्र हसू थापत वेटरला रिपीट सांगितला. 

लोकही परत आपापल्या ग्लासांकडे वळले. 

माझी मान मी एकदा हलवली आणि ती हलतच राह्यली चार-पाचदा,

"बॉम्ब म्हणजे काय हलवा वाटला काय तुला?

की गेलं डी मार्टमध्ये किंवा हार्डवेअरच्या दुकानात आणि आणलं साहित्य"

"पण साहित्य हवंयच कशाला? 

तू ऐकत नाहीयेस मी सांगितलेलं.

मी बोलले ना की "मी"च एक जिवंत बॉम्ब आहे. मी म्हणजे माझं शरीर. 

माझ्याभोवती आर डी एक्सच्या विटा नाहीयेत किंवा डायनामाईटच्या कांड्या किंवा एखादा रिमोटली ऑपरेटेड डिटोनेटर

सगळी स्फोटक रसायनं माझ्या शरीराच्या आतच आहेत"

मी बधिरपणे ऐकत राहिलो. 

"वर्षानुवर्षं एंडोक्रिनॉलॉजीची तुफान यशस्वी प्रॅक्टिस केलेल्या मला हे अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नव्हतं. 

बॉम्ब म्हणजे बेसिकली काय तर कार्बनी संयुगांचं मिश्रण आणि त्यांचा स्फोट घडवणारा ट्रिगर. 

गेली वर्षभर पाहिजे तेच डाएट, आणि पाहीजे तीच हार्मोन्सची इंजेक्शन्स घेऊन मी माझ्या आख्ख्या शरीरालाच एक स्फोटक रसायनांचा बॉम्ब केलाय. 

जो मी कुठेही जाऊन उडवू शकते. 

जस्ट इमॅजिन, कोणालाच संशय नाही, कुठल्या सिक्युरिटी चेकमध्ये पकडायची भीती नाही. 

कुठल्याही हव्या त्या मठ्ठ पार्टीत, किंवा एखाद्या माजोरड्याच्या सभेत किंवा सगळे डेसिबल्स तोडणाऱ्या एखाद्या मिरवणुकीत जावं आणि ... बूम्!"

माझा बझ् हळूहळू उतरल्यासारखा झालेला,

"पण एकाच स्फोटात तर तू ही मरून जाशील ना मग?"

"मग काय झालं? आमची मोठ्ठी कम्युनिटी आहेय. "एंडोक्रिनॉलॉजिस्ट्स फॉर वर्ल्ड पीस" नावाची. 

माझ्यासारखे कित्येकजण ह्या क्षणी फिरतायत आणि कित्येक जण पाठी तयार होतायत. नेटवर थोडं खोलवर खरवडलंस की आमच्या ग्रुपचा डिस्कोर्स आणि स्लॅक मिळेल तुला पण आमचं सांकेतिक संभाषण तुला काही कळणार नाही ती गोष्ट सोड"

"पण तू मला का सांगतेयस सगळं?", 

मला आता उलटी होणार असं वाटायला लागलेलं. 

"कारण तू महाराष्ट्राच्या नंबर एकच्या दैनिकाचा उपसंपादक आहेस. 

आता वेळ आलीये आमचं अस्तित्व जाहीर करायची. 

तू लोकांना सांग आमचं लक्ष आहे जगभर. तुम्ही फालतू चुत्यापे केलेत तर एखादी बारकीशी शिक्षा देत राहू आम्ही अधूनमधून." 

"फकिंग डिल्युजनल, काहीही बाता मारतेयस तू."

तिनं नॉन कमिटल खांदे उडवले, "असेन किंवा नसेनही!"  

"पण समजा एक क्षण हे सगळं खरं आहे असं धरून चाललं तरीही ट्रिगर? त्याचं काय??", मला विचारल्यावाचून रहावेना.  

"मी तुला सांगितलं ना, माझं शरीर आणि त्यातली जैविक रसायनं हाच एक बॉम्ब आहे. सो ट्रिगर एखाद्या रसायनाची पातळी वर किंवा खाली जाणं हाच आहे. उदाहरणार्थ ऍड्रेनलीन किंवा डोपामाईन किंवा ब्लड शुगर लेव्हल"

"म्हणजे थोडंसं जेसन स्टेथमच्या क्रँकसारखं", मी पुटपुटलो. 

"एक्झॅक्टली!", तिनं माझी इच्छा नसतानाही माझा हात ओढून मला टाळी दिली. 

"तसे आम्ही बरेच ट्रिगर बनवलेयत. 

शिंक येणं: घातली तपकीर नाकात... बूम्!

रडायला येणं: बघितला एखादा सॅड मूव्ही... बूम्! 

ऑरगॅजम: सुखाच्या टोकावर असताना... बूम्!"

"तुझा ट्रिगर काय आहे?", मी चाचरत विचारलं. 

ती खुद्कन हसली, एकाच वेळी गोड आणि भयभीषण दिसत होती ती,

"एनी गेसेस?" 

तिनं माझ्या ग्लासाला ग्लास भिडवत जोरात किण्ण आवाज केला. 

गपकन् बॉटम्स अप केला आणि,

धावत बारबाहेर जाऊन रस्त्यानी चाललेल्या सगळे डेसिबल्स तोडणाऱ्या मिरवणुकीत घुसून ती अचकट विचकट नाचायला लागली. 

---------------------------------------------- समाप्त ----------------------------------------------

टीप:

माझे अतिशय आवडते लेखक अनंत सामंत यांच्या "टॅप देम" कथेला हे स्वैर ओमाज आहे. 


 





















  

No comments:

Post a Comment