Saturday 6 April 2024

पुस्तक परिचय: घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा

ह्या पुस्तकाविषयी बोलायचं तर आधी थोडं लेखक आशिष महाबळविषयी बोलावं लागेल. 

आणि आशिषविषयी बोलायचं तर आधी थोडं आमच्या साय-फाय कट्ट्याविषयी. 

तर ह्या साय-फाय कट्ट्यावर मराठीतले बरेच हौशी आणि अनुभवी विज्ञानकथा लेखक मंथली चॅलेंजेस वर हिरहिरीने कथा लिहितात. 

एकमेकांच्या आणि जगातील उत्कृष्ट सायन्स फिक्शन्सविषयी चर्चा करतात वगैरे. 

आशिषची आणि माझी ओळख आणि मैत्री तिथलीच. 

आता गंमत काय आहे ना की कोणत्याही जोड शब्दात बसणारी माणसं किंवा कलाकृती ह्या शब्दाच्या अल्यापल्याड ५०-५० टक्के विभागलेल्या कधीच नसतात. 

(उदाहरणार्थ सोशिओ-पॉलिटिकल,  ट्रॅजी-कॉमिक वगैरे)

ती नेहेमीच एका सायडीला जास्त किंवा बहुतेकदा बरंच जास्त वजन टाकून असतात. 

तसंच साय-फायचं ही. 

साय-फाय मला नेहेमीच एखाद्या छान कॉकटेल ड्रिंकसारखी वाटत आलीये.

म्हणजे कॉकटेलमध्ये कसं अल्कोहोल असतं आणि बाकी सरबत, सजावट वगैरे...
आता 'विज्ञान-कथे'तलं विज्ञान म्हणजे अल्कोहोल समजा आणि बाकी "काल्पनिक,
सामाजिक संदर्भ" वगैरे नॉन अल्कोहोलिक भाग.
आणि मजा काय आहे माहितीये का कॉकटेलसारखीच सायफायची सुद्धा "अल्कोहोलच्या"
बदलत्या प्रमाणानुसार असंख्य लोभस रूपं आहेत :)

हेच रूपक पुढे रेटायचं झालं तर घोस्ट रायटर मधील बहुतेक कथा कडक स्कॉच ऑन द रॉक्स सारख्या म्हणता येतील. 
काही थोडंसच थम्स-अप असलेल्या रम सारख्या 
आणि थोड्या काही लॉन्ग आयलंड आईस्ड टी वगैरेसारख्या 

थोडक्यात त्या हार्ड कोअर सायन्स फिक्शन्स आहेत. 
(संग्रहाच्या प्रस्तावनेतही ज्येष्ठ साय-फाय लेखक निरंजन घाटे सरांनी ते निरीक्षण नोंदवलंय. त्यांची प्रस्तावनाही छान) 

हे वर्क होतं का? कथा वाचायला मजा येते का? तर ह्याचं उत्तर बहुतांशी हो असं आहे. 

गणित किंवा लॉजिकमधील काही प्रमेयं घेऊन त्या अंगाने रचलेल्या काही कथा फारच बहारदार आहेत.  
त्या वाचताना वाचक म्हणून आपल्याला एखादं कोडं सोडवल्या किंवा शिकल्याचा एक्स्ट्रा बोनस मिळतो 

पाचवीला पुजलेला प्रश्न, रक्त तबकड्या, तेथे पाहिजे जातीचे ह्या काही तशा कथा.   

पाचवीला पुजलेला प्रश्न ही माझी संग्रहातली सगळ्यात आवडती कथा. 
स्वछंद बोहेमियन शैली पण अजिबात न हलणारी भूमिती,  ग्रीक मायथॉलॉजी,  आणि गालात जीभ घोळवत केलेला खुसखूशीत विनोद ह्यांचं फारच बहारदार मिश्रण जमून आलाय इथे.

एकंदरीतच ही सगळी बऱ्याच कथांची बलस्थानं आहेत. 

पुराण आणि विज्ञानकथेची गाठ घालणं हा प्रकार रिस्कीच. 
ती रिस्क आशिष उचलतो ती कधी वर्क होते कधी नाही होत.
उदाहरणार्थ:
वर्क होते: शोध बिंबाचा 
वर्क नाही होत: कृष्णलीला, कूपमंडूक 
पण वर्क होणं न होणं हे वाचनीयतेबाबत.    
त्याची दिशा मात्र कधीच चुकीच्या छद्म-विज्ञानी दिशेनी (उदाहरणार्थ आम्ही पुष्पक विमान, क्वांटम मेकॅनिक्स, रिलेटिव्हिटी हे सगळं आधीच बनवलं होतं :( वगैरे ) जात नाही. 
त्याबद्दल ब्राव्हो. 

अर्थात आशिष स्वतः: प्रचंड ब्रिलियंट खगोलशास्त्रज्ञ आहे त्यामुळे ही विज्ञानातील नैतिकता त्याच्याकडून अपेक्षितच,
मशीन लर्निंग, डेटा सायन्स ह्या गोष्टी आत्ताशा हॅपनिंग झाल्यायत पण त्याच्या कैक वर्षं आधीपासून तो त्या कोळून प्यायलाय, त्याचं जागतिक स्तरावर काम आहे ह्या क्षेत्रात. 
आणि हे उतरतं त्याच्या अमरेंद्र आणि युवराज ह्या आर्मचेअर डेटा - डिटेक्टिव्ह जोडगोळीत. 
डेटा सायन्स, क्रिप्टोग्राफी इत्यादी वापरून ते रोचक गूढं सोडवतात. 

बेबी एलिफन्ट वॉक्स, नाऊ यू सी मी, मन तर सवय ह्या त्या जोडगोळीच्या कथा. 
बेबी एलिफन्ट वॉक्स मध्ये ह्या जोडगोळीचं शेरलॉक वॉटसन स्टाईल डेब्यू होतं. 
आणि त्यांची Whilte Elephant Detective Agency स्थापन होते. 
WEDA ही अजून एक गालात जीभ घोळवत केलेली आद्याक्षरांची गंमत.
एकूणातच स्टार ट्रेक, पोकेमॉन आणि आशिषच्या इतर आवडत्या साहित्या / गेम्स बद्दलची ईस्टर एग्ज ठिकठिकाणी येतात. 
आशीषनेच मनोगतात म्हटल्याप्रमाणे ती समजली नाही तरी काही बाधा येत नाही पण ती समजली तर कदाचित थोडा जास्तच आनंद मिळेल. 
शिवाय प्रत्येक कथेच्या सुरवातीची जागतिक कीर्तीच्या साय फाय लेखकांची अवतरणं खास.   

अंतर्ध्वनी ही कोणत्याच कॅटेगरीत न बसणारी साधी सरळ नितांत सुंदर कथा मला व्यक्तीश: फार आवडते. 
पुनरागमनाय च ही छान. 

आता काही तक्रारी:

बरेचदा प्रमेयं सुलभ करण्यासाठी आशिष खास प्रयत्न करतो वाचकांना समजतील अशा सिच्युएशन्स वापरतो हे छानच. 
तरीही काहीवेळा काही तपशील वाचकांना क्लिष्ट वाटून बिचकवू शकतो. 
आशिषसारख्या कै. हॉकींग आणि इतर जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या "मेधावी" (फक कधीपासून हा शब्द मला वापरायचा होता :) )  माणसाला काही गोष्टी ऑब्व्हियस वाटतील. तरीही आम्हा "पामर" वाचकांसाठी त्याने काही कथांचं आणखी "पामरायझेशन" करावं ही विनंती. 

तसेच काही कथा ह्या आशिषच्या आवडत्या बोर्ड गेम्सचा पॅशन, आवडते पाश्चात्य लेखक, एखादी वैज्ञानिक संकल्पना ह्या विषयीचा नुसताच राईट अप वाटतात. 
त्या कुठे जातायत हे मला तरी नीट कळलं नाही.  
उदा: ये रे माझ्या मागल्या ही कथा, संग्रहातील शेवटच्या तीन कथा वगैरे. 

पण एकंदरीत आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही स्कॉलर असा वा नसा डोक्याला चालना देणाऱ्या गोष्टी आपल्याला माणूस म्हणून पुढेच नेतात. 
आणि आशिषचा कथासंग्रह ते काम नक्कीच वाचनीयरित्या करतो. 



 
 




  

          

 

No comments:

Post a Comment