Thursday, 26 February 2015

श्रीमान योगी

तीन-चार दिवस "ब्रोक" फिरत होतो.
पैसे लागलेही नाहीत फारसे म्हणा… सोडेक्सो कूपनं आणि कार्डावरच किल्ला लढवत राहिलो.
शेवटी आत्ता रात्री मुहूर्त लागला आणि ए. टी. एम मध्ये गेलो…  

आत सिक्युरिटीवाले मामा मस्त "श्रीमान योगी" वाचत बसलेले!

उगीचच छान वाटलं!
सिक्युरिटीची नोकरी धरली तर पुस्तकांचा बॅकलॉग पुरा करता येईल असंही वाटून गेलं. 
त्या मामांचा थोडा हेवा सुद्धा… अर्थात "जावे त्याच्या वंशा" वगैरे आहेच!

म्हातारपणी जागरणवाला जॉब का करावा लागत असेल त्यांना? प्रॉब्लेम्स असतील?? घर चालवायला???
की,
मस्त रिटायर्ड होऊन, पोरं-बाळं वगैरे सेटल करून, टाइमपास म्हणून करत असतील ते?
तसंच असावं… तसंच असू दे!

एनी-वेज आज रात्री मस्त पुस्तकाचा ठोकळा वाचतायत ना… खुश दिसतायत… उद्याचं उद्या च्या मारी!
आपण पण घरी जाउन रस्किन बॉन्डचा ठोकळा वाचायचा… कित्ती दिवस तसाच पडलाय… उद्याचं उद्या च्या मारी! 

-नील आर्ते



Monday, 29 December 2014

मॉडर्न उखाणे: २

-----------------------------------
ज्ञानोबाची राइड मी झाले रे रक्त-बम्बाळ… 
तुझ्या 'पिंकी' बाळाला बायो जरा सम्भाळ!  
-----------------------------------

हे काय?
(कमेंट-मध्ये उत्तर द्या)


Thursday, 25 December 2014

मॉडर्न उखाणे: १

------------------------------
समोरीया पळती माणके लाल लाल…
उजवीला सोन-गोळे करून येती चाल! 
------------------------------
हे काय?
(कमेंट-मध्ये उत्तर द्या)

Sunday, 14 December 2014

घरनामा १: सत्यमेव जयते झिरपताना

 तो धावत धावत ऑफिसवर पोचला… १:४०!…२ वाजता लंचची वेळ त्यात आज दिवाळीआधीचा शनिवार म्हणजे बहुतेक हाफ डे.

 समोरच एक क्लार्क बसली होती… नवीनच लग्न झालं असावं: लख्ख कुंकू, हातात भरलेला चूडा… दात किंचित बाहेर डोकावणारे… पण त्याला तिचे डोळे नाही आवडले… थोडे बिलंदर होते ते. 

बाजूलाच एक शांत ऋजू माणूस बसला होता, समोर पाटी होती 'हेडक्लार्क अडफळे' म्हणून… 

धाड-धाड पायऱ्या चढून लागलेला दम शांत करत त्यानं विचारलं, "नवीन घर घेतल्यावर म्युन्सिपालिटीचा टॅक्स माझ्या नावावर ट्रान्स्फर करायचाय… तो इथेच होईल ना?"

"हो हो" ती क्लार्क उत्तरली, "पण सोसायटीची एन. ओ. सी., जुन्या मालकाचे डिटेल्स, सेल अ‍ॅग्रीमेन्ट्ची कॉपी, भरलेला फॉर्म… आणलंय का सगळं?"

"येस्स", त्यानं संगतवार लावलेली कागदांची चळत तिच्याकडे दिली.

तिनं सराईतपणे पेपर्स चाळले, "अच्छा आपटे!…"
अहो मॅडम, आपटे नव्हे आ - ट - पे! "आस्तिक आटपे"
"ओह मला वाटलं आपटे" ती हसत म्हणाली!
त्यानं मनातल्या मनात तिचं नाव नु. ल. झा. ठेवून टाकलं: नुक्तंच ग्न झालेली.
"ठीक आहे प्रॉपर्टी टॅक्स आणि ट्रान्स्फर फी आत्ता भरून टाका टोटल ३६१० रुपये!"
त्यानं तत्परतेनं एक्झॅक्ट चेंज काढून पुढे सरकवली आणि रिसीट घेता घेता विचारलं, "किती दिवस लागतील साधारण मॅडम?"
हेडक्लार्क अडफळे तेव्हढ्यात काही कामासाठी बाहेर गेले होते… नु.ल.झा.नं लुकलुकणारे डोळे बारीक केले, माफक मिशीवरनं ओलसर जीभ फिरवली:
"तसं तर एक महिना लागतो पण साहेबांच्या चहा-पाण्याचं बघा जरा… आज ऑफिस बंद व्हायच्या आत करून टाकू तुमचं काम!"

Sunday, 2 November 2014

"नि इदिया!" च्या निमित्ताने

एक पोस्ट वाचून आपल्याला खूप काही भसाभसा लिहावसं वाटणं हे मस्तच!
म्हणजे हा त्या पहिल्या मुळ पोस्टचा विजयच तेव्हा माझ्या मैत्रिणीची मुळ पोस्ट इथे वाचा
http://shabd-pat.blogspot.in/2014/11/blog-post_2.html
म्हणजे मी भसाभसा लिहायला मोकळा:

तर…
'हे काहीतरी घडणार' च्या मागे होणारी घरंगळ वगैरे एकदम पटेश पण मी कुठे तरी एक गोष्ट वाचली होती.

म्हणजे एका माणसाला कोणतरी सांगत की नर्मदेच्या सुक्या पात्रात हटकून परिस आहे…शोधला की मिळतोच.
तर हा आपला चालू होतो लोखंडाचा तुकडा घेऊन:
उचल गोटा… लाव लोखंडाला … नाय झालं सोनं… दे फेकून.
'व्हाइल-लूप' मध्ये चालू राहतं हे दिवस-महिने-वर्षं.
माणूस आपला शोधतोय-शोधतोय कणाकणाने फ्रस्ट्रेट होत.
शेवटी त्याची हटते आणि तो नाद सोडून द्यायचा ठरवतो …
पात्रातून बाहेर निघताना सहज लोखंडावर नजर टाकतो तर तो तुकडा केव्हाच सोन्याचा होऊन गेलेला असतो!

ह्यातून मी इतकच घेतलं की मोठे इव्हेंट्स वगैरे ठीकाय पण त्यांना जास्त भाव नाय द्यायचा…
म्हणजे स्वत:चं मोठ्ठ घर वगैरे मस्त पण कधी कधी स्वच्छ दाढी केल्यावर पण तितकच मस्त वाटतं…

Monday, 13 October 2014

नळी-बाव


गोष्ट "ऐकण्यासाठीइथे क्लिक करा
----------------------------------------



टणाच्या रश्श्याचा घमघमाट सुटला होता… दोन दोन पेग व्हिस्कीनं अरुकाका, एस. के., आणि पुनीत तिघांच्याही पोटात आग लागली होती!
तेव्हढ्यात मम्मीनी ताटंच घेतली.
चौघंही टेबलावर बसले.

स्टीलची चकचकीत ताटं… चकचकीत वाट्या… कांदा-टॉमॅटो-दह्याची कोशिंबीर… गरमागरम मऊसूत चपात्या… वाटीतला वाफाळता लालभडक मटणाचा रस्सा… आणि खास पुनीतसाठीच्या वाटीत मोठ्ठा नळीचा तुकडा!

पुनीत खुशारला, "मम्म्या आय लव्ह यू!"
त्यानं तीन चार किसेस हवेत फेकले आणि नळी गरम गरम असतानाच चोखली.
आतला बोन-मॅरोचा घसघशीत गोळा बक्कन त्याच्या तोंडात गेला!
किंचित तुपकट… उबदार… गुलगुलीत राखाडी-पांढऱ्या रंगाचा तो ऐवज पुनीतच्या घशातून खाली उतरला आणि त्यानं सुखानं डोळेच मिटले!

मम्मीना प्रेमाचं भरतं आलं, "माझं लेकरू गं ते पाय मोडून बसलंय बिचारं… खा बाळा खा… हाडात शक्ती यायला पाह्यजे लवकर लवकर… माझं पोर ते… ही मेली दळिद्री लोकं कुठेपण फुटपाथवर झोपतात आणि आम्हाला त्रा…"

एस. कें. नी त्यांच्या मांडीला हळूच चिमटा काढला तेव्हा कुठे त्या गप्प झाल्या.

"काय मग अरुशेठ कोणता नवीन प्रोजेक्ट चाललाय सध्या?" त्यांनी सफाईनं विषय बदलला.

आवडीचा विषय निघाल्यावर अरुकाका तरारला, "अरे सध्या आम्ही मायक्रॉइड्सवर काम करतोय!"

"मायक्रॉइड्स म्हणजे?"

"सांगतो… नॅनो-बॉट्स ऐकलेयत ना तुम्ही? म्हणजे सूक्ष्म यंत्रमानव!"

"नॅनो कार माहितीये माला", पुनीत फिदीफिदी हसला… "त्या दिवशी गाडी ठोकली तेव्हा एक नॅनो पण चेपली… ओय ओय"… एस. कें. नी त्याच्या धडक्या पायावर टेबलाखालून जोरात पाय मारला!

"अरू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस… अहो तुमच्या पोराला अजून पेग देऊ नका आता, लगेच टाईट होतो तो… तू बोल पुढे!"

"तर आम्ही थोडा वेगळा विचार केला: नॅनो बॉट्स पूर्णपणे यांत्रिक असतात पण त्यांच्यात काही जैविक गुणधर्म आणता आले तर?"
उदाहरणार्थ मुंग्या किंवा वाळवी किंवा मधमाश्यांइतकी कार्यक्षमता आणि बुद्धिमत्ता!
ह्या मठ्ठ सूक्ष्म यंत्रांना चांगला मेंदू आणि थोडाफार कॉन्शस देता आला तर?
… म्हणजे मानवाएवढा नाही पण एखाद्या मुंगीएवढा?"

Saturday, 6 September 2014

आख्तुंग ६ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर बरोब्बर १५ वर्षांनी: १८ नोव्हेंबर २०२८ 
अंकुश शिर्केचा चाळीसावा वाढदिवस 
वरळीची ओशन व्ह्यू बिल्डींग: 
अंकुश तिच्याशी लिफ्टमध्येच खेळायला लागला होता पण सिक्युरिटी कॅमेराकडे बोट दाखवून तिनं त्याला थोपवलं होतं.  

ते दोघं अंकुशच्या तिसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आले. 

समोरचा व्ह्यू बघून तिनं टूण्णकन उडीच मारली!
मोठ्ठ्या फ्रेंच विन्डो मधून दिसणारा अफाट समुद्र… दुपारच्या उन्हात चांदी वितळवल्यासारखा दिसत होता.
किंचित डावीकडे सी-लिंक वरून इटुकल्या गाड्या चालल्या होत्या. 
आणखी डावीकडे महालक्ष्मी आणि समोरच माहीम-वांद्र्याची स्कायलाईन! 

"दोनच मिनटं दे मला जान आत जाऊन फ्रेश होऊन येते मी आणि गिफ्ट मी आल्याशिवाय उघडू नकोस"

महुआनी आठवणीने पर्स आणि फोन बरोबर घेतला. 
'हो उगीच अंकुशने उघडायला नको'

अंकुश आरामात सोफ्यावर पाय ताणून बसला, या वरळीच्या फ्लॅटवर तो सुद्धा बऱ्याच दिवसांनी आला होता . 
समोर जुने पेपर पडले होते. पहिल्याच पानावर दादा शिर्केचा फोटो होता. महिन्याभरापुर्वीची त्याच्या हत्येची बातमी मोठ्ठ्या अक्षरात होती. आणि गोळी लागण्यापूर्वीचा दादाचा शेवटचा फोटो… प्रचारसभेत तलवार घेतानाचा. 

अंकुशला दादाच्या आठवणीनी थोडं वाईट वाटलं… आणि थोडी भीतीसुद्धा!
बरं आपण नव्हतो सभेत नायतर आपला पण गेम होता!!
त्यानं उगीच एक नजर खिडकीवर टाकली. 
'ह्या फ्लॅटवर बरंय 'सी-साईट'चा असल्यामुळं समोरून कोण गोळी मारणार नाय 
पन दादाचे शत्रू कमी नव्हते. उगीच आपल्यालापण गोळी बसण्यापेक्षा दुबईत गायब झालेलं बेष्ट!'
त्यानं सहजच परत त्या प्रचारसभेच्या फोटो कडे नजर टाकली. एक मुलगी दादाला तलवार देत होती… तिनं अगदी शालीनपणेवगैरे मान खाली घातल्याने तिचं तोंड दिसत नव्हतं. 
पण अचानक त्याच्या लक्षात आलं: 
तिच्या हातावर गोंदलेले  तीन मासे अस्पष्टपणे दिसत होते.