१० जूलै शुक्रवार रात्रीचे १०
पुणे स्टेशन शिवनेरी बस-स्टॅन्ड
पावसाची संतत धार सकाळपासून लागलेली
मुंबईहून येणाऱ्या बसेस रस्त्यातच अडकलेल्या आणि लोकं पार ७ वाजल्यापासून ताटकळलेली
बहुतेक सगळा क्राउड आय टी वाला..शिवनेरीचे लॉयल प्रवासी ! वीक एंड असल्याने टी शर्टस , थ्री फोर्थ , जीन्स चे नाना प्रकार. दोन गोष्टी मात्र कॉमन: लॅपटॉप-बॅग आणि चेहऱ्यावर तीन तास साकळलेला प्रचंड कंटाळा.
एस. टी. कंट्रोलर मामांना सगळ्यांची दया येते आणि ते सर्व शिवनेरी भक्तांपुढे नामी पर्याय ठेवतात :
"आज काय शिवनेरी सुटणार नायत..पायजे तर आपण एक एशिआड बस सोडू , ज्या रिझर्वेशनवाल्यांना जायचंय त्यांचं तिकीट एशिआड साठी बदली करून देऊ, ज्यांना जायचे नाही त्यांना तिकिटाचे पैसे दोन दिवसांनी परत मिळतील . बोला !"
सगळे बिच्चारे आई / बाबा / मुलं / नवरा / बॉयफ्रेंड / बायको / गर्लफ्रेंड च्या आठवणीत ताटकळलेले. पण शिवनेरी च्या एसीची ऐसपैस सीटची सवय झालेली , थोडासा संभावितपणा अंगात मुरलेला . काय करावं ?
थोडी चल-बिचल होते . आणि बहुतेक सगळेजण निर्णय घेतात एशिआड तर एशिआड घरी तर पोचू .
१० मिनटात समोरची एशिआड बस झपाझप भरली. जास्तच हाय फाय नाकं किंचित मुरडली पण ईलाज नव्हता.बस आता दोन मिनटात निघणार ...
आणि त्याच्या डोक्यात किडा वळवळला.मुंबईतल कॉलनी-चाळ ग्रूप मधलं त्याचं रक्त सळसळले , 'ओरडावं एकदा बस सुटताना ? मज्जा येईल! पण एरवी ट्रेकला ग्रुपमध्ये असताना गोष्ट वेगळी . तेव्हा सगळ्यांना अपेक्षित असतं आणि हमखास प्रतिसाद मिळतो.पण इकडे तर सगळे आधीच विवंचनेत त्यात हाय फाय ...ओरडलो आणि कोणीच साथ दिली नाही तर याहूम पोपट होईल.' त्याच्यातला कॉर्पोरेट आय टी वाला चरकला .
तेवढ्यात बस घरघरत सुरूच झाली. ड्रायवरने मिनिटभर इंजिन गरम केलं. इकडे त्याचा जीव वर खाली ...ओरडू की नको ? घ्यावी रिस्क ?? मारावी उडी ??? काय फरक पडतो पोपट झाला तर ? आपल्याला तर आनंद होतोय ना घरी चालल्याचा , मग का ठेवायचा तो दाबून ? पण यातले काही चेहर तर दर शुक्रवारचे ठरलेले , एक तर त्याच्या खास आवडीचा , 'पोपट झाला तर पुढच्या शुक्रवारी लाज वाटणार ' त्याची तडफड चालू होती...
खड्ड-खाट ड्रायवरने पहिला गिअर टाकला ,बस दमात पुढे झेपावली आणि त्याची सगळी तडफड शांत झाली !
तो खच्चून ओरडला "गणपती बाप्पा " ..क्षण भर कोणालाच काही कळलं नाही आणि मग आख्खी बस ओरडली :
"मोरया " !!!
त्याच्या छातीत आनंद सरसरला आणि तो खुशीत ओला रस्ता बघू लागला
-नील आर्ते
Nilesh...mala watale tu ata paryant barech lekh lihile asashil...
ReplyDelete'पोपट झाला तर पुढच्या शुक्रवारी लाज वाटणार ' त्याची तडफड चालू होती... >> ही तडफ़ड लै वेळा होते आमची नीलभौ !पण माझी काही हिम्मत होत नाही. :( " दुनिया में सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग " आम्हाला जडलाय. परवा इथे बंगळुरूला मराठी पोरांनी दिड़ दिवसाचा गणपती बसवला होता. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी ४-५ लेझीम सुद्धा आणल्या होत्या. जाम इच्छा होती खेळायची, बरीच वर्षे झालीत खेळून. पण एक लेझिम २ मिनटांसाठी मागण्याची हिम्मत झाली नाही.नुसताच तडफ़डत राहिलो.
ReplyDeleteबॉस...
ReplyDeleteबहोत अच्छे!
धन्यवाद आल्हाद !
ReplyDeleteखरं तर या कमेंट्स बऱ्याच दिवसांनी लक्षात आल्या माझ्या !
संकेत एक लक्षात ठेव "निर्लज्जं सदा सुखी" :)
किंवा "नंगेसे खुदा भी बेजार" :D