Sunday, 6 November 2011

(गोष्टुली: ५) गच्ची

कोडच्या जंगलात तो हरवून गेला होता....आज कसंही करून बग फिक्स करायचा होता आणि सहज त्याचं लॅपटॉप च्या उजव्या तळाशी घड्याळाकडे लक्ष गेलं. आईच्या गावात... ४: १५ झाले होते!

त्याने धावत पळत लिफ्ट पकडली, 
लिफ्ट मिळून १३ व्या मजल्यावरच्या रिक्रिएशन रूममध्ये  येईपर्यंत ४: २० झालेच होते.
पण डान्स क्लासचं कोणीच पब्लिक अजून आलं नव्हतं...'आज क्लास कॅन्सल बहुतेक'!

त्याला हायसं वाटलं, 'म्हणजे चला आपली प्रॅक्टीस बुडाली नाही तर'!
कंपनीने एम्प्लॉयीजसाठी कंपनीतच हा डान्स क्लास चालू केल्यापासून त्याने एकदाही बुडवला नव्हता..
मिटींग्स, प्रेशर, डेड लाईन्स मध्ये दगदग व्हायची पण तो कसाबसा मॅनेज करत होता.

गच्चीला लागूनच रिक्रिएशन रूम होती, तिकडेच त्यांचा आठवड्यातून २ दिवस क्लास चालायचा.

आज कधी नव्हे तो गच्चीचा दरवाजा उघडाच होता ...तो सहजच पुढे गेला 
आपल्या कंपनीला एवढी सुंदर प्रशस्त गच्ची आहे हे त्याला माहीतच नव्हतं.... 
हिवाळ्यातली कलत्या दुपारची गोजीरवाणी उन्हं गच्चीभर पसरली होती आणि एवढ्या उंचावरून खाली अफाट पसरलेल पुणे दिसत होतं.

समोर चतु:शॄन्गीचा मोठ्ठा डोंगर...पावसाळा उशीरा सरल्याने हिरवी मखमल अजून कायम होती.
उजवीकडे मॅरीयट हॉटेलची सेवन स्टार बिल्डींग आणि त्यांचा ४ थ्या मजल्या वरचा स्विमिंग पूल...एखाद्या किमती खड्यासारखा तो निळाशार तुकडा चमकत होता.
डावीकडे थोडी पाठी वेताळ टेकडी, इकडूनही टेकडीवरचं छोटंसं चुनखडीच मंदीर आणि वॉक करणारी इवलुशी माणसं दिसत होती.

त्याने कठड्या वरून वाकून खाली पाहिलं...
त्याची नजर खाली गेली आणि त्याला ती प्राचीन कळ आली...
प्रत्येक मानवाला येणारी...उंचावरून बघताना! 
त्याच्या ओटीपोटातून चालू होऊन छातीत...तिथून  घशात आणि मग मेंदूत.
एकाच वेळी भीती आणि आकर्षण आणणारी!

खालची शिवाजी कॉलनीतली आंब्याची झाडं आणि छोटुलं जॉगर्स पार्क पण वरून मस्त दिसत होतं...जणू त्याला हात हलवत बोलावत होतं.
त्यानं हळूच आजूबाजूला पाहिलं...गच्चीवर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. 

हलकासा वारा वाहत होता, त्याचं सकाळपासून ताणलेला मन शांत होत गेलं.
कामाचं प्रेशर, डेड लाईन्स... 
जॉब जाण्याची भीती, कर्जाचे हप्ते...
'तिच्या'एवढा चांगला डान्स येत नाही म्हणून तिने केलेलं भांडण, ब्रेक-अप आणि तिची रोज संध्याकाळी येणारी दुखरी आठवण.....  
सगळा सगळा कोलाहल शांत झाला.....

खूप दिवस तो हे करण्यासाठी धीर गोळा करत होता. 
तो कठड्या पासून थोडा मागे झाला, 
त्याने मन एकाग्र केलं, स्टार्ट घेतला...दोन्ही हात पक्ष्यासारखे पसरले आणि उडी मारली!!!


गर्रकन पाठीवरून उलटा फिरून तो पायांवर थोडा अडखळत लॅन्ड झाला....
त्याला चक्क "हिप-हॉप" ची "बॅक फ्लिप" जंप जमली होती!

त्याच्या चेहेर्यावर विजयी हसू पसरलं आणि जगाशी लढायला तो नव्या उत्साहाने गच्चीवरून खाली उतरला!!!


-नील आर्ते
   






8 comments:

  1. साफ़ येडा आहेस. :)

    ReplyDelete
  2. Sagar, Heramb, Shraddha : Thnx mates :)

    ReplyDelete
  3. तुझ्याबरोबर मीपण उडी मारली कि रे........

    ......तुलातर हिप हॉप ची "बॅक फ्लिप" जमली .....

    पण मला डान्सपण येत नसल्याने मी तसाच हवेत लटकतोय ....

    ReplyDelete
  4. total mayadness , आवड्या

    ReplyDelete
  5. Replies
    1. Actually (tevhachi) BMC... Cognizantchya bajoochee :)

      Delete