Thursday, 5 December 2013

झगार्ड ५:

 रोबर एका आठवड्याने. वेळ रात्रीचे अकरा! ठिकाण हरिश्चंद्र गड!

 देशपांडे आणि उल्काताईनी दगडांच्या चुलीवर बनवलेली मस्त खिचडी खाऊन घेतली आणि ते दोघं गुहेबाहेर पडले. डिसेंबरची रात्र असूनही फारशी थंडी नव्हती तरी देशपांडेनी उल्काताईंना एक शाल घ्यायलाच लावली होती!
मधलाच वार असल्यामुळे ट्रेकर्सची गडबड नव्हती आणि समोरचा माळ मोकळा-ठक्क होता!
समोरच्या मंदिराचे कळस अंधारात अंधुक दिसत होते…मागे तारामतीचा डोंगर निश्चल उभा होता काळा सफारी घातलेल्या अबोल बॉडीगार्ड सारखा.
दोघं केव्ह बाहेर पडून माळाच्या दिशेन चालायला लागले आणि अचानक अंधारातून जोमन अवतीर्ण झाला.
उल्काताई जवळपास किंचाळल्याच होत्या पण देशपांडेनी त्यांना सावरलं.
'ओके उल्काताई ही तुमची कॅप्सुल आत्ता गिळून टाका, साधारण एका तासात तुम्ही रिलॅक्स्ड आणि आनन्दी झालात की झगार्ड ट्रिगर होईल. ती स्टेट तुमच्यासाठी सहा सात तास तरी राहील म्हणजे सकाळ पर्यंत'

'पण समजा अर्ध्या तासात मी घसरले आणि माझा पाय मुरगळला किंवा मला उचकी लागली तर तो क्षण ताणला जाईल म्हणजे मी सकाळ पर्यंत तळमळत किंवा उचक्या देत बसेन का?'
उल्काताईनी बराच वेळ त्यांना कुरतडणारी शंका विचारली.

जोमननं त्याचं ठेवणीतलं हसू काढत नकारार्थी मान हलवली,
"तसं कधीच होणार नाही कारण ही झगार्ड टेक्नॉलॉजी एखाद्या व्हॉल्वसारखी आहे म्हणजे तुमच्या मेंदूतल्या डोपामाईनच्या पातळीत वाढ झाली किंवा रिवार्ड सेंटर मध्ये हालचाल वाढली तरच ते ट्रिगर होईल, तुम्ही अस्वस्थ किंवा वेदनेत असलात तर ते ट्रिगर होणारच नाही… आणि तुमच्या डोक्यावर लावलेल्या या छोट्या चीप द्वारे आम्ही मॉनिटर करूच तुम्हाला… शिवाय…" जोमन थोडा अडखळला , "तुमच्या ट्युमरमुळे आम्ही विशेष काळजी घेतलीये आणि म्हणूनच मी स्वतःही हजर आहेच सो एन्जॉय, खगोल खात्याच्या परवाच्या रिपोर्टप्रमाणे साधारण बारा वाजता उल्कावर्षाव चालू होईल,
आम्ही तिकडे लांब टेण्ट लावलाय म्हणजे उगीच कबाब मे  हड्डी नको पण काहीही लागलं तर देशपांडे सर नुसता शाउट द्या!
आमची आक्खी टीम तुमचा झगार्ड मोमेंट जास्तीत जास्त सुंदर करण्यासाठी कटिबद्ध आहे!"
इथं तो फिल्मी  स्टायलीत कमरेत झुकला!
"चला नाऊ आय 'ल लिव्ह यु टू लव्ह बर्ड्स अलोन"

आणि तो आला तसाच अंतर्धान झाला!

उल्काताईनी कॅप्सुल गिळून टाकली मग ते दोघं आणखी थोडं पुढे माळावर चालत गेले आणि एक मोकळी जागा बघून दोघांनी बैठक मारली.

देशपांडेनी उल्काताईंना हलकेच कोपराने ढोसलं, 'वर बघ'.

आख्खं आकाश ताऱ्यांनी खचाखच भरलं होतं आणि स्वछ हवेमुळे की गडाच्या उंचीमुळे कोण जाणे पण आभाळाचा घुमट खूप खाली आल्यासारखा वाटत होता. जिकडे नजर पोचेल तिकडे तारे लखलखत होते.

उल्काताईनी अलगद देशपांडेंचा हात हातात घेतला , 'थॅन्क्स अशू!'
देशपांडेनी उल्काताईंच डोकं जवळ घेतलं आणि खोल हुंगलं… त्यांच्या रुपेरी रेशमी केसांना सुकवलेल्या संत्र्याच्या सालींचा आणि रिठा-शिकेकाइचा तो मंद चिरपरिचित  वास येत होता.
'आठवतंय तुला वांगणीच्या आकाशदर्शन कार्यक्रमातच पहिल्यांदा भेटलो होतो आणि सप्तर्षी कोणता यावरून आपलं जोरदार भांडण झालं होतं.'
'हो तू सप्तर्षी म्हणून काहीही दाखवत होतास, जाम भडकले होते मी तुझ्यावर… पण सांगू का तुझं नाव ऐकल्या ऐकल्या मला जाम आवडलं होतं, कधीच ऐकलं नव्हतं मी असं नाव "अशनी" !'

'आणि मालवणच्या तोंडवळी बीच वर झोपून तारे बघताना तू मला प्रपोज केलं होतंस'!
'आणि तू पोरीसारखा चक्क लाजला होतास'

'आणि हिमालयातला तो उल्कावर्षाव आठवतोय हनिमूनचा?'
'हो मग नंतर आतमध्ये मला किस करताना कंदील पाडून टेण्टला जवळ जवळ आग लावली होतीस'

"माहित नाही का ते अशू, पण लहानपणापासून ताऱ्यांनी लखलखणारं आकाश पाहीलं नं की मन शांत शांत होतं.  शांत आणि गार.  मग सगळे जगण्याचे उपद्व्याप लल्लू पप्पू वाटतात म्हणजे कितीही अफलातून टेन्शन असो या अथांग पोकळीपुढे ते छोटुसंच वाटतं, दुसर्या दिवशी सकाळी कोणताही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू असा विश्वास वाटतो.... तशी थोडी भीती वाटतेय मला परवाच्या ऑपरेशनची पण आत जायच्या आधी मी हे आकाश आठवीन ओके?"

अशनीनं उल्काला जवळ घेतलं, आणि वर बोट केलं:
उत्तरेकडून सणसणत एक तारा (खरं तर उल्का ) आला आणि तेजाळ शेपूट दाखवत नैऋत्येला अंतर्धान पावला.
उल्कानी एक फ्लायिंग कीस फेकला त्या आकाशस्थ उल्केकडे आणि खरा किस आपल्या नवऱ्याकडे…
तेवढ्यात अजून एक तारा पडला मग सटासट दोन लागोपाठ आले आणि  ते चक्क थोडे हिरवट रंगाचे होते… वितळवलेल्या पाचून्सारखे.…
आणि मग वर्षावच चालू झाला तेजाळ उल्कांचा त्यात काही पिवळ्या होत्या काही लायलॅक आणि मग तीन पाठोपाठ आल्या टरकॉइझ रंगाच्या…
आणि अशनीनं मोबाईलवर 'इनक्सस'चं 'आफ्टर-ग्लो' लावलं!

Touch me and I will follow in your afterglow
Heal me from all this sorrow
As I let you go I will find my way when I see your eyes
Now I'm living in your afterglow
…………

ते जीवाला गार गार करणारं खच्च भरलेलं आकाश, इकडून तिकडे सटासट पडणारे ते हिरे माणकांसारखे तारे… आणि 'आफ्टर-ग्लो' चे ते जीवघेणे सूर…उल्काला ह्या इतक्या आनंदाने घुसमटायलाच झालं!

Here I am, lost in the ashes of time, but who wants tomorrow?
In between the longing to hold you again
I'm caught in your shadow, I'm losing control
My mind drifts away, we only have today
…………

ती अशनीला बिलगली आणि तिच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला.

Bathed in blue, the walls of my memory divide the thorns from the roses
It's you who is closest

उपसंहार:
लोकसत्तेतील पाचव्या पानावरील २ बातम्या :

१. ढगाळ आकाशामुळे हौशी आकाश-निरीक्षकांची  निराशा :
 परवाचा दुर्मिळ असा लिओनिड तारका-पुंजातील उल्का वर्षाव महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे नीट दिसू शकला नाही. विशाखापट्टणम जवळील समुद्रात झालेल्या 'गाटुंमा' चक्रीवादळाचा हा परिणाम असून अजून दोन दिवस मुंबई, ठाणे, पुणे, नगर व बहुतांश इतर जिल्ह्यांत आकाश ढगाळच राहील.

२. मुंबई आय आय टीच्या थ्री डी होलोग्राफिक मॉडेलला प्रथम पारितोषिक:
कालच्या आय. आय. टी. टेक-फेस्टच्या "मय-सभा " इव्हेंट मध्ये मुंबई आय. आय. टी. टीमच्या "चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि उल्कावर्षाव" या प्रेझेन्टेशनला प्रथम पारितोषिक मिळाले असून
विजेत्या संघाला हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक थ्री डी इमेजिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळेल.
विजेत्या संघातील विद्यार्थ्यांची पूर्ण नावे पुढीलप्रमाणे :

          लेमी डाल्टन परेरा
          बल्लाळ सुनिता सोनावणे
          विभ्रम जोमन शेणॉय (संघनायक)

************************ समाप्त ************************

टीप : इंग्रजी गाण्याच्या ओळी INXS या रॉक बॅंडच्या AFTERGLOW या अप्रतिम गाण्यातील आहेत
-नील आर्ते

12 comments:

  1. Upasanhar... at a correct time! :)
    So the series goes on and it will be interesting to see what happens next!


    Going to listen INXS now! :D

    ReplyDelete
  2. NIL ! Kay Lihu....Dwidha Manastithi ?????? ! Keval Aprateem... Chhanach.!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thnx sanju ...hope Climbing references are fitting well !

      Delete
  3. झगार्ड कन्सेप्ट प्रचंड आवडला.... अप्रतिम!!!

    ReplyDelete
  4. झगार्ड कन्सेप्ट प्रचंड आवडला.... अप्रतिम!!!

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्स स्वप्नाली,
      आयुष्यात असे फ्रीझ करून ठेवण्यासारखे खूप सारे क्षण येत राहोत ... तुझ्या माझ्या सर्वांच्या :)

      ता. क.
      जमल्यास या वर्षीच्या दीपावली दिवाळी अंकातली माझी 'दोन डावे पाय' गोष्ट वाच.
      कशी वाटते ते कळव.

      Delete
  5. दीपावली दिवाळी अंकातली. Kuthala ank?

    ReplyDelete