Tuesday, 14 September 2021

लेखक महाशय

ऑक्टोबर-एंडच्या त्या निवांत दुपारी वरच्या फ्लॅट्समधल्या प्रि-दिवाळी शंकरपाळ्यांच्या तळणाच्या घमघमाटात सायकिऍट्रिस्टने आपल्या कॅडल-रोडवरच्या क्लिनिकचा दरवाजा उघडला आणि प्रसन्न हसून नवीन पेशंटला आत घेतलं. 

खरं तर पेशंटनी अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती पण लकीली दोन सिटींग्ज लागोपाठ कॅन्सल झाल्यामुळे त्याला फीट करता आलं सायकिऍट्रिस्टला. 

पेशंट आत आला. अगदीच निवांत दिसत होता.  

सायकिऍट्रिस्टचं प्रायमरी ऍनालिसिस मनातल्या मनात झरझर चालू झालं. 

शिडशिडीत गोरटेला, दात किंचित पुढे, पण एकंदरीत दिसायला छान, फिटींगचा ब्रँडेड (बहुतेक "रेअर रॅबिट") कोबाल्ट ब्लू शर्ट आणि सुंदर विटलेली गुडघ्यावर फाटलेली रिप्ड डिझेल "जीन्स"!

केस थोडे अस्ताव्यस्त, 

डोळे पाणीदार पण थोडे थकलेले किंवा नुकतेच जरुरीपेक्षा जास्त झोपून आल्यासारखे. 

हालचाली अगदीच संथ.

खूप खूप श्रीमंत किंवा खूप खूप दुःख भोगलेल्या माणसांना कुठेच पोचायची घाई नसते आणि हा बहुतेक दोन्ही होता. 

दोघांनी आपापल्या जागा घेतल्या. 

सायकिऍट्रिस्टनं काही मिन्टऺ अशीच जाऊ दिली. 

त्यांच्या व्यवसायात पॅसिव्ह असणं फार महत्त्वाचं होतं. 

पेशंटचं भडाभडा बोलणं बहुधा पहिल्या मिन्टालाच चालू व्हायचं. 

नॉर्मली पहिला शब्द सायकिऍट्रिस्ट दहा मिनटांनीच काढायचा. 

तोपर्यंत पेशंट भरपूर काही बोलून टाकायचा. 

आणि त्याला अजूनही भरपूर काही बोलायचं असलं तरी ते सगळं आधीच्याच दहा मिन्टाऺची रिडन्डन्ट पुनरावृत्ती असणार हे त्याला अनुभवाने माहित झालं होतं. 

आत्ताही... सायकिऍट्रिस्ट त्या व्हर्बल विरेचनाची वाट पहात राहिला... 

एक मिन्टऺ... दोन मिन्टऺ... तीन 

हे पेशंटसाहेब मात्र मस्त समोर बसून फक्त मंद मंद हसत होते. 

आता मात्र एक ढुशी द्यायलाच हवी,

"बोला साहेब आज क्लिनिकवर येऊन मला भेटावंसं वाटण्याचं काही खास कारण?

हाऊ कॅन हेल्प यु??"

मंद मंद हसणारा पेशंट आणि रुंद हसला. 

स्माईल छान होतं त्याचं. 

हसू डोळ्यांपर्यंत पोचून त्याचे पिंगट घारटेले डोळेही हसत होते. 

त्या पिंगट घाऱ्या नजरेवरून सायकिऍट्रिस्टला उगीचच सुहास शिरवळकरांचा "दारा बुलंद" आठवला.  

त्याची पिंगट घारी नजर, पिळदार बॉडी...

त्याचे ते बादल, शीतल, मधुर  वगैरे साथीदार... 

माल सुंदर बहीण सलोनी... 

जेसलमेरमधल्या त्या वेस्टर्न टेक्सासस्टाइल थरारक गन फाइट्स... 

एक गोळीचे सात तुकडे करून एकाच वेळी डागणारी सात नळ्यावाली दाराच्या शत्रूची बंदूक!  

सायकिऍट्रिस्ट हरवलाच दोन मिन्टऺ! 

पण त्याला इकडे आपण डॉक्टरच्या खुर्चीवर आहोत हे फायनली आठवलं आणि त्यानं पुन्हा जोर मारला. 

"साहेब कसं आहे ना बरेचदा आपला प्रॉब्लेम शेअर करण्यातूनच आपोआप सोल्यूशन मिळून जातं. 

किंवा कधीकधी तर शेअर करणं हेच सोल्यूशन असतं. 

ट्रस्ट मी. तुम्ही वाटल्यास मला तुमचा मित्र समजा ह्या सेशनपुरता तरी."

पेशंटनं ओठ मुडपले. त्यानं तोंड उघडून परत मिटल्यासारखं केलं. 

"शिवाय आपल्याला वेळेचंही  भान ठेवायला हवं. कारण पुढची अपॉइंटमेंट लवकरच येईल... सो... "

पेशंट अस्वस्थपणे चुळबुळत राहिला आणि काही क्षण आणि मग त्याचा निर्णय झाला. 

फायनली लीप ऑफ फेथ घेणाऱ्या बंजी-जंपरसारखा त्याचा चेहेरा वेडा वाकडा झाला क्षणभरच... 

आणि तो बोलू लागला,

"मी लेखक आहे आणि मी एकटा रहातो. 

गडगंज श्रीमंत नसलो तरी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी (अर्थात) वाड-वडिलांच्या पुण्याईने माझी तीन-चार घरं आहेत. 

सो मला उपजीविकेसाठी इतर काही धंदा / व्यवसाय करावा लागत नाही. 

आणि मी चक्क मराठी लेखनातूनही चिकार पैसे मिळवतो... 

वेट चुकलो थांबा! 

मिळवायचो  असं म्हणायला हवं टेक्निकली. 

तेच तर सगळं सांगायचंय तुम्हाला."

सायकिऍट्रिस्टनं सहज कॅज्युअली विचारलं, 

"मी वाचतो मराठी पुस्तकं बऱ्यापैकी. तुमचं नाव किंवा चेहेरा कधी कुठल्या पुस्तकावर पाहिल्यासारखं आठवत नाही."

पेशंट हसला, 

२.० हे माझंच टोपणनाव. 

सायकिऍट्रिस्ट उडालाच,

"अरे २.० नावाच्या लेखकाने मराठी साहित्यविश्वात प्रचंड खळबळ उडवली होती साधारण वर्षभरापर्यंत"

"गिल्टी ऍज चार्ज्ड... मीच तो", पेशंटने मान तुकवली. 

"मी रिबूट केलेल्या पात्रांपैकी तुमचे कोणी फेवरीट?"

"अर्थातच धारपांचे समर्थ. काय मस्त आजच्या युगात आणून बसवलंय तुम्ही त्यांना! भारी!!

खरंच तुम्हीच २.० ?"

सायकिऍट्रिस्ट एखाद्या लहान मुलासारखा एक्साईट झाला होता. 

त्याचवेळी त्याच्या मेंदूच्या सायकिऍट्रिस्ट भागानं शंका काढली, "स्वतः सायकिऍट्रिस्टनं असं पोरकट व्हल्नरेबल दिसून चालेल का?"

आणि त्याच्या सायकिऍट्रिस्ट भागानंच उत्तर दिलं की, "अशी थोडी व्हल्नरेबिलिटी शेअर केल्याने पेशंट जास्त चांगला कनेक्ट होईल सो आगे बढो बिंधास."

"मलाही धमाल आली समर्थांचा रिबूट लिहिताना. 

त्या रिबूटमध्ये मी त्याच्या असिस्टंट आप्पाच्या जागी मुलगी घातली ऍप्पी नावाची त्यावरूनही बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. 

पण मी स्वतःसुद्धा खूप एंजॉय केले आधीआधीचे काही भाग."

"शिवाय आजच्या जगातला बिटकॉईन्समध्ये उलाढाल करणारा झोलर फिरोज इराणी, बलोचिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणारा कॅप्टन दीप... भारी सर भारी एकदम", 

आता ही सायकिऍट्रिस्टची पोज-बीज नव्हती खरंच मनापासून एक्साईट झाला होता तो. 

"थँक्स पण तीच तर गोची सांगायचीय तुम्हाला. 

तर लहानपणापासून ह्या सगळ्या नायकांची आणि लेखकांची पुस्तकं वाचत मोठा झालेलो. 

अर्थात सत्तर-ऐंशी च्या दशकात ह्या पुस्तकांकडे जरा आठ्या पाडूनच पाह्यलं जायचं. 

'पिवळी पुस्तकं', वाचक-रंजक, कमी दर्जाचं साहित्य म्हणून त्याला हिणवलं जायचं. 

पण गेली काही वर्षं मात्र सीन थोडा पलटला. 

दोन शतकांच्या सांध्यावरच्या काही रसिक पत्रकार, ब्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सर्सनी ह्या उपेक्षित कथा कादंबऱ्यांना मनापासून नावाजलं. 

आणि अचानक पुन्हा ह्या सगळ्या पात्रांना आणि लेखकांना (मरणोत्तर) एक्झॉटिक पण सत्पात्री नवा फॅन-बेस मिळाला. 

आणि तेव्हाच मला ही कल्पना सुचली. 

माझी स्वतःची अशी काही आवडती पात्रं आजच्या काळात रिबूट करायचं ठरवलं. 

मग काय फटाफट त्या लेखकांच्या कुटुंबीयांना भेटून बाकायदा हक्क घेतले त्या पात्रांचे आणि माझ्या सुपीक डोक्याने त्यांच्यावर पुन्हा कथा पाडायला सुरुवात केली."

सायकिऍट्रिस्टनी हसून मान डोलावली. 

"मी लोकांसमोर कधीच आलो नाही. ह्या सगळ्या रिबूट्ससाठी मी २.० हे टोपणनाव घेतलं. ते गिमिकसुद्धा हिट झालं. 

बिटकॉईन्सवाला सातोशी नाकोमोटो, किंवा मास्कधारी डी. जे. "मृतमूषक" (DEADMAU5) सारखंच हा लेखक आहे कसा आननी ह्याचे लोक तर्क-वितर्क करत राहिले.

आणि हे सगळं यश अंमळ माझ्या डोक्यातच गेलं.  

चक्क मराठी लेखनातून एवढे पैसे मिळतायत हे अप्रूप मला स्वतःलाच पचता पचेना. 

सोशल मीडियावर तर हैदोस घातला मी. 

#कोकरू_लेखक हा माझा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला. 

दिवाळी अंकातल्या एका कथेचे शेंगदाण्यांएवढंच मानधन मिळवणाऱ्या किंवा बरेचदा नुसत्या कौतुकावारी कथा छापायला धडपडणाऱ्या,

पुस्तक काढण्यासाठी एखाद्या बेरकी प्रकाशकाला पोरांच्या तोंडचा घास काढून लाखभर रुपये हसत हसत देणाऱ्या,   

पु ल, विश्वास नांगरे पाटील आणि मोरोपंतांच्या नकली ओळी फॉरवर्ड करून स्वतःला लेखक समजत खुष होणाऱ्या 

असंख्य बापड्या लेखकांची मी यथेच्छ चेष्टा केली. 

बेनामीचं चिलखत असल्यामुळे काही वेळा क्रूरसुद्धा झालो.

पण लाथेचा प्रसाद देणाऱ्या पॉप्युलर मौनी बाबासारख्याच ह्या सगळ्या लीला मला आणखीच एक्झॉटिक करत गेल्या.

हे असं अभूतपूर्व यश मी काही वर्षं एन्जॉय केलं... 

आणि मग मी उताराला लागलो. 

एकाहून एक सरस कथा-कादंबऱ्या दिल्यानंतर हळूहळू पाट्या टाकायला लागलो. 

असं का होतंय मलाही कळेना. 

कदाचित ही सगळी त्या लेखकांची पूर्वपुण्याई आहे आणि माझं काँट्रीब्युशन काहीच नाही असं मला वाटत होतं का?

ह्यात क्रिएटिव्हिटीपेक्षा कारागिरीच जास्त आहे असं होतं का?

कोण जाणे?

खरं तर आत्ताचा माझा फिरोज इराणी ब्लॅक-वेबमध्ये ऑनलाईन पोकर खेळतो,

समर्थांचे अमानवी शत्रू वर्महोलमधून येतात आणि कॅप्टन दीपचा हिरव्या डोळ्यांचा शत्रू अलीबाबा आयसिस-k ला जाऊन मिळतो. 

हे सर्व मी खूप मनापासून लिहिलं आणि एंजॉयही केलं. 

पण मग अचानक अशी गुंतवळ का?

का बिचाऱ्या कोकरू-लेखकांना हसल्यामुळे "कर्मा" नावाच्या कुत्रीने माझ्या ढुंगणाचा चावा घेतला होता?

का हा रायटर्स ब्लॉक होता?

कोण जाणे. 

हळूहळू पण निश्चित मला काही सुचायचं बंद झालं.   

लिहिणं अर्थातच थांबलं. 

खाणं-पिणं आणि शांत जगत रहाणं हाच माझा दिनक्रम झाला. 

वर्षभर असंच गेलं आणि एके दिवशी चमत्कार झाला... सॉरी आय मीन रात्री.  

आता माझी झोप तशी चांगलीच गाढ असते. 

त्यात मी पैसा राखलेला एकटा जीव सदाशिव म्हणजे बायकोचं घोरणं, सकाळचा अलार्म, कामाचे फोन अशी काहीच डिस्ट्रॅक्शन्स नाहीत. 

सो एखादा नेटफ्लिक्सचा एपिसोड किंवा थोडं किंडल टाकून बारा वाजता झोपलो की थेट साडेनवाला उठतो मी.

त्या दिवशीही असाच मस्त झोपून उठलो मी. 

दारावरचा पेपर घ्यायला हॉलमध्ये आलो. 

डोकं मस्त छानपैकी रिकामं लेखन-संन्यास घेऊनही बरेच महिने झालेले... 

तरीही मी सहज म्हणून माझ्या लिहिण्याच्या टेबलाकडे नजर टाकली. 

धुळीचा पातळ थर जमलेल्या टेबलावर कागदांची एक चळत बरेच दिवस पडून होती. 

खिडकीतून आलेला एक कवडसा चळतीवर फोकस करत होता. 

आणि त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं. 

मी आपलं सहजच उचलून चाळलं आणि थरारलो. 

हा चक्क फास्टर फेणेचा रिबूट होता. 

म्हणजे अमेय वाघच्या पिक्चरसारखा नव्हे वेगळाच. 

म्हणजे बनेश (फास्टर) फेणेचं मामांच्याच मुलीशी 'माली'शी लग्न झालंय. 

डेड-एण्ड जॉबमध्ये अडकलेल्या बन्याचा दारू पिऊन सुजलेला काका झालाय 

आणि माली मामेभावाशीच लग्न करून एवढ्या लवकर संसारात पडल्यामुळे हळहळत रिझेन्ट करतेय असं काहीतरी. 

बनेशच्या त्या खिन्न लूजर आयुष्यात त्याला परत त्याचा सळसळणारा फास्टर फेणे कसा सापडतो ह्याची प्रचंड सुरस, नाट्यमय तरीही मानवी नातेसंबंधांचे बोचकारणारे पापुद्रे उलगडून दाखवणारी लघुकादंबरी रेडी होती त्या पानांत. 

आता खरं तर फास्टर फेणेचे राईट्स पण नव्हते माझ्याकडे पण ही गोष्ट प्रसिध्द व्हायलाच हवी होती. 

मी लगेच माझ्या वकीलाला फोन केला आणि पुढच्याच महिन्यात पुस्तक बाजारात आलं सुद्धा. 

प्र चं ड हा शब्द अपुरेल असा रिस्पॉन्स आला. आय वॉज बॅक इन द गेम!

खरंतर कोणी माझ्यासाठी आख्खा ड्राफ्टच एका रात्रीत लिहून ठेवतंय हे अभद्र होतं. 

पण तेव्हा मात्र शंका कुशंका न काढता मी माझ्या दैवाचे आभार मानले. 

कोणी लिहलं ते कळेलच जातो कुठे च्यायला. 

पण नंतर हे वारंवार होऊ लागलं. 

महिन्यातून एक दोनदा मला छान छान ड्राफ्ट मिळू लागले. 

शैली माझीच होती पण क्रिएटिव्हिटी भन्नाट होती ह्या चोरट्या लेखकाची. 

आणि अक्षर... आहाहा 

त्याच्या वेलांट्यांवरून घसरावं, "प" ला पयोधरासारखं लुचावं आणि "व" च्या पोटात गुदगुल्या कराव्यात असं देखणं सुंदर मायाळू अक्षर. 

माझं स्वतःचं अक्षर म्हणजे अगदी कोंबडीचे पाय मलाच कित्येकदा लागत नाही थोड्या वेळाने. 

तर हा कोण बरं सुंदर अक्षरवाला, माझी शैली कोळून प्यायलेला, भन्नाट प्रतिभेचा इसम असावा जो हळूच रोज माझ्या फ्लॅटमध्ये येऊन अश्या तूफानी ष्टोऱ्या लिहून जातोय?

आणि तुफानी म्हणजे साक्षात तुफानी हां सर!

उदाहरणार्थ एक तर क्रॉसओव्हर कादंबरी होती ज्यात फिरोज इराणी मुजाहिदीन लोकांचा हवालाचा पैसा पकडण्यात कॅप्टन दीपला मदत करतो आणि नंतर अतिरेक्यांचे पन्नास कोटी रुपये घेऊन छू होतो वगैरे. 

फास्टर फेणे आणि मालीची मध्यम वयातली सेकंड इनींगही प्रचंड हिट झाली. 

लग्न होऊन वर्षानुवर्षं झालेलं, एकमेकांना बोचकारणारं, कचाकचा भांडणारं पण एकमेकांची प्रचंड सवय किंवा प्रेम किंवा दोन्ही असणारं डिस्फंक्शनल जोडपं लोकांनी डोक्यावर घेतलं. 

तर काही महिने असं होत राहिलं. 

मला लोक आता गमतीनं ३.० देखील म्हणू लागले. 

एका टीकाकाराने तर लिहिलं की मार्व्हलच्या ऍव्हेंजर्सचं मनोरंजन, श्याम मनोहरांची  व्हिम्झीकल  तर्कसंगती , लव्हक्राफ्टीयन वैश्विक भय आणि भारत सासणेंचा खिन्न मनस्क माहौल माझ्या एकाच कादंबरीत एकत्र दिसतो वगैरे... 

आता मात्र मला रहावेना. तिच्यामारी हे कोण लेखक महाशय? शोधलंच पाहिजे. 

मी पहिले छूट माझ्या बेडरूमच्या खिडक्या आतून गच्च बंद केल्या, दरवाजाही आतून लॉक करून चावी माझ्या उशीच्या खाली ठेवली आणि झोपलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जणू मला फाट्यावर मारायला नवा ड्राफ्ट तयार टेबलावर. 

ह्यावेळी तर चक्क स्पायडी आणि आयर्नमॅन एका गॅलॅक्सीवर चालणारा जुगार जिंकायला फिरोझ इराणीला घेऊन जातात असा डेडली प्लॉट होता पण आता मार्व्हलकडे राइट्स मागायला मी कुठे जाऊ?

आता मात्र बास्स! मी सरळ एक स्पाय कॅमेरा आणला आणि पांडुरंगाच्या डोळ्यात फीट केला. 

"पांडुरंग सांगवीकर" माझ्या लाडक्या मोठ्ठया टेडी बेअरचं नाव. त्याला बाजूला घेऊनच झोपतो मी. 

शिवाय नाईट लॅम्प चालू ठेवला म्हणजे कोण रात्री चुपकेसे येतो की येते ते कळेल, की धारपांच्या मितीतून 'तिसरं'च काहीतरी येतं ते तरी कळेल. 

पुढच्या काही रात्री अगदीच मोळ्या गेल्या. 

रेकॉर्डिंगमध्ये शांत गरगरणारा पंख आणि माझं मंदसप्तकातलं घोरणं एवढंच कॅप्चर झालं. 

सकाळीही काही नवीन ड्राफ्ट वगैरे अर्थातच नव्हतं. 

घाबरला वाटते... हेहेहे चुत्या!

मी मनातच त्याला हसून घेतलं. 

पण चौथ्या दिवशी मात्र टेबलावर ड्राफ्ट होता. 

 मी धडधडत्या उत्सुकतेने फुटेज चेक केलं. 

रात्री तीन वाजेपर्यंत तेच, मंद नाईटलॅम्प, गरगरणारा पंखा आणि डाराडूर मी. 

पण... 

तीन वाजून दोन  मिन्टांनी मात्र मी स्वतःच बेडवरून उठलो. 

आता मी बेडवर पूर्ण नंगूपंगू झोपतो. 

बऱ्याच बॅचलर लोकांना सवय असते तशी. 

तर मी तसाच नंगूपंगू चालायला लागलो. 

त्यातही पोट फारसं दिसत नसल्याचं पाहून मी स्वतःच थोडं छान वाटून घेतलं. 

डोळे मात्र मिटलेलेच बरं का!  

तसाच मी डेस्कपुढे बसलो आणि सरसर लिहायला लागलो. 

कुरूकुरू चालणारं पेन आणि डोळे मिटून मंद घोरणारा मी असं साधारण दीड तास चालत राह्यलं. 

मग अचानक मी पेन व्यवस्थित मिटून स्टँडवर ठेवलं, 

झोपेतच चालत बेडजवळ आलो, थोडीशी 'चिल्लर' पाडली,

आणि आडवा होऊन झोपून गेलो. 

हीच ती माझी अवार्ड विनर कादंबरी "छळनंग" जिच्यात पुरुषोत्तम बोरकरांचा 'मेड इन इंडिया'वाला पंजाबराव आणि नंदा खरेंच्या 'उद्या' मधला हिरो सुदीप खान्देशात एकत्र येतात आणि दडपशाहीविरुद्ध बंडाची सुरुवात करतात. 

एकंदर पुन्हा फॉर्मात आलो मी. 

माझं हे झोपेत असतानाच मराठी कथाविश्वातली अप्रतिम माणकं लिहिणं चालूच राहीलं आणखी काही महिने. 

आणि मग मात्र मला गिल्टी वाटून घ्यायचं की नाही असा प्रश्न पडू लागला. 

म्हणजे झोपेतल्या माझ्या लिखाणावर जागेपणीच्या मी पैसा, प्रसिद्धी आणि कौतुक मिळवलं तर ते नैतिक की चोरी?

आणि मुळात मला ह्या अशा सुसाट कथा जागेपणी का नव्हत्या सुचत? आं?? ..." 

काही सेकंद असेच गेले आणि मग गुंगलेल्या सायकिऍट्रिस्टची ट्यूब पेटली. 

पेशंटचा प्रश्न त्याला होता,

"अं हो... माझ्या मते तरी फारसा काही प्रॉब्लेम नाही दिसत मला ह्यात कारण झोपलेले तुम्ही हे तुम्हीच आहात ना. 

आणि सबकॉन्शस माईंड आपलं अक्षर बदलू शकतं काही केसेसमध्ये.

तुम्ही प्लीज कंटिन्यू करा भारी इंटरेस्टिंग आहे हे."

"हं SSS", पेशंट सुस्कारला. 

"ही दोन्ही पार्ट्यांना जिंकवणारी भागीदारी काही काळ सुखनैव चालू राहिली. पण नंतर मात्र सगळंच बदललं. हाच तो पॉईंट जिकडे मला तुमची खरंच गरज आहे." 

एके दिवशी शुभ्र पांढऱ्या कागदावर फक्त एकच ओळ होती. 

ची मा का य का मा ची

काही दिवसांनी नवीन ओळ:

टे प आ णा आ प टे

आणि अशा एकच एक ओळी येत राहिल्या. 

स र जा ता ना प्या ना ता जा र स

रा मा ला भा ला मा रा

तो क वी च क्का च वि क तो

वगैरे वगैरे... 

मग ही विलोमपदं (पॅलिन्ड्रोम्स ) थांबली आणि पुन्हा कागदाचे तावच्या ताव लिखाण मला मिळू लागलं. 

पण प्रचंड अश्लील आणि बीभत्स, काही आगा-पीछा नसलेलं. 

कधी नुसत्याच घाण घाण शिव्या. 

कधी विकृत लैंगिक वर्णनं ज्यात शरीराची सगळी छिद्रं आणि सगळे द्राव हजर होते.

ती पानं प्रकाशित करणं तर सोडाच मला स्वतःलाही वाचवेनात.

बरं सिक्युरिटी कॅमेऱ्यात झोपलेला मी, रादर झोपेत लिहिणारा मी मात्र तोच होतो. 

माझ्या लिहीतानाच्या अविर्भावात काहीच बदल नव्हता. 

नंतर नंतर फक्त असंबद्ध अक्षरं येऊ लागली. 

पण थोडं बारकाईनं पाहिल्यावर कळलं की ते आख्खंच्याआख्खं लिखाण वाचून रेकॉर्ड करून उलटं वाजवलं की

कसलेतरी भयकारी मंत्र ऐकू येत. 

मग नुसतेच काहीतरी विचित्र शब्द साधारण लव्हक्राफ्टच्या क्थुलू, नियालाथोटेप किंवा धारपांच्या गोग्रामच्या पठडीतले. 

किंवा नुसतीच अमानवी गुरगुरीची अक्षरं. 

कुठून कुठे येऊन पोचलो मी श्या!"

"म्हणजे थोडक्यात तुमचा रामगोपाल वर्मा झालाय", सायकिऍट्रिस्टला जोक करायचा मोह आवरला नाही. 

पण पेशंट हसायच्या मूडमध्ये नव्हता, 

"मी हे सगळं रिपेयर करण्याचाही प्रयत्न केला. 

माणूस कसा असतो बघा, हे अवचित आलेलं घबाड जेव्हा चांगलं चालत होतं तेव्हा मी थोडंसं उपेक्षेनीच बघायचो ह्या सगळ्याकडे. म्हणजे अगदी अलिप्त, निर्लेप वगैरे. स्वतःच्याच 'होम्स'ला मारणाऱ्या ऑर्थर कॉनन डॉयल सारखा.  

पण सकस लिहिणं बंद झाल्यावर मात्र मी प्रचंड मिस् करायला लागलो ते दर्जेदार ड्राफ्ट्स. 

असंच असतं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपणच हड-तूड केल्यामुळेच कायमचं फक ऑफ करून गेलेली पोरगी दूर गेल्यावर प्रचंड हॉट वाटायला लागते. हीच ती मांजर-मांजा थिअरी बहुतेक....  

एनीवेज...       

चांगली झोप लागली किंवा झोपताना चांगला मूड असेल तर असं काही वेडं-बिद्रं लिहायचं थांबेल आणि कदाचित परत मी चांगलं किंवा किंवा किमान बरं लिहू लागेन असं मला वाटलं.

मग मी बरेच काय काय उपाय केले,

कोणी सांगितलं म्हणून झोपायच्या आधी दाट दूध आणि जायफळ घातलेली फिक्कट म. म. व. कॉफी काय प्यायलो,

शीर्षासन काय केलं,

कुमार गंधर्व काय ऐकले,

गरम पाण्यात गुलाब पाकळ्या टाकून अंघोळ काय केली,

दिक्षित डाएट केलं, स्व-संमोहनपण ट्राय केलं.  

पण काही उपयोग झाला नाही लिखाणातले वेडाचार वाढलेच उलटे!

फक्त एक बदल झाला आता हे सगळं लिखाण हटकून प्रथम पुरुषी एक वचनी यायला लागलं.

आणखी काही महिने असंच चालू राहीलं...   

आणि एक दिवस अचानक हे सगळं थांबलं.    

नवीन ड्राफ्ट्स येईनात. 

मी दबकत दबकत विचार केला, संपलं हे सगळं प्रकरण! 

थोडा विषाद वाटला पण किंचित सुटल्यासारखंही वाटलं. 

आणि बऱ्याच दिवसांनंतर एका आठवड्यापूर्वी हे सगळं परत चालू झालं. 

 पण आता वेगळीच गंमत होतेय. 

रोजच्या रोज मी झोपेतून उठून लिहितानाच व्हिडिओ दिसतायत खरे, पण एकच एक सेम टू सेम कथा लिहिलेली मिळतेय मला.

काय कळेना.  

कदाचित माझ्या अबोध मनाला ही डेस्परेटली पब्लीश व्हावी असं वाटत असेल म्हणून मी रोज तीच गोष्ट लिहितोय. 

मी आणलीय ती कथा माझ्याबरोबर. 

तुम्ही बघणार का?

कदाचित तुम्हाला काही टोटल लागेल?

सायकिऍट्रिस्ट तरारला, "हो नक्कीच वाचून बघूया आपण. कदाचित काही इंटरप्रिटेशन्स मिळतेल. काय होतंय ते कदाचित कळेलही."

पेशंटनी सुबक लिहिलेल्या कागदांची चळत सायकिऍट्रिस्टपुढे अलगद ठेवली. 

सायकिऍट्रिस्टनं पहिलं पान उघडलं आणि तो चमकला. 

त्यानं पहिला पॅरा वाचला, पहिलं पान वाचलं... 

फटाफट पानं चाळत शेवटचं पान उघडलं. 

शेवटचा आणि पहिला पॅरा एक्झॅक्टली सेम होता. 

ऑक्टोबर-एंडच्या त्या निवांत दुपारी वरच्या फ्लॅट्समधल्या प्रि-दिवाळी शंकरपाळ्यांच्या तळणाच्या घमघमाटात सायकिऍट्रिस्टने आपल्या कॅडल-रोडवरच्या क्लिनिकचा दरवाजा उघडला आणि प्रसन्न हसून नवीन पेशंटला आत घेतलं. 

   

---------------------------------------------- समाप्त ----------------------------------------------

निखिल क्षिरसागर ह्याच्या 'द रायटर' ह्या कथेचे स्वैर रूपांतर. 

मूळ इंग्रजी कथासंग्रहाची लिंक: https://www.amazon.in/dp/B0978LHHF9     

          

 


 


 


 
 


 

 
  
 

No comments:

Post a Comment