Thursday, 31 August 2017

डोळे 'भरून'... (भाग ४)

दोघं 'रॉकस्टार'मध्ये पोचले.
शौर्यची खूप आवडती जागा.
कामा रोडवरच्या आतल्या शांत गल्लीत एका रॉकवेड्या पारसी बाबानं चालू केलेली.
मोठ्या मोठ्या हाईपवाल्या रॉक कॅफेंपेक्षा कैकपट अधिक निवांत, सुंदर... आणि चांगलं म्युझिक वाजवणारी.

आल्या आल्या शौर्यनं डोळे भरून त्याच्या आवडत्या फोटोकडे बघितलं.
समोरच लावलेलं ते जेम्स हेटफील्डचं मोठ्ठ पोस्टर... मेटालिका या त्याच्या आवडत्या बॅण्डचा लीड सिंगर.
बहुतेक 'व्हिप्लाश' वाजवतानाचा.
त्याचं ते देखणं पाय फाकवून उभं रहाणं...
आडवी धरलेली गिटार...
मनगटातलं काळं रिस्टबॅन्ड...
कपाळावर आलेले लांब सोनेरी केस...
गलमिश्या...
आणि किंचाळणाऱ्या तोंडातून दिसणारे ते जगप्रसिद्ध उभट भयसुंदर दात.




शौर्य नेहमीसारखा हरखून काही क्षण बघत राहिला आणि त्याला ती दिसली.
पोस्टर्सच्या बरोब्बर खालचं टेबल तिचं होतं.
जाडसर कुरळे केस...
मोठ्ठे मोठ्ठे काळेशार डोळे... काजळमाया करणारे.
नाकात सिल्व्हर रिंग... फुगीर ओठ.
छान हेल्दी रसरशीत... साईझ झिरो बिरोला फिंगर देणारी फिगर.

शौर्यचा टाईप होती ती... आदिलला कळलंच.
 "गो टॉक टू हर", तो पुटपुटला.

"नको आज नको", शौर्य बॅकफूटवर गेला.

"नाही आजच", त्यानं शौर्यचा हात पकडला आणि तो सरळ तिच्याकडे गेला.

"हाय!"

तिनं पुढ्यातल्या बिअरचा सिप घेऊन वर बघितलं... प्रश्नार्थक.

"मी आदिल, हा माझा दोस्त शौर्य. ही लाईक्स युअर स्टाईल."

"थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट, मेक्स माय सण्डे.", ती गोड हसून म्हणाली आणि पुढे फारसा रिस्पॉन्स न देता तिनं परत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं.

शौर्य, आदिलला परत त्यांच्या सीटकडे खेचायला लागला.

आदिलनं जाता जात शेवटचा प्रयत्न केला,
"तुला एक सांगू माझ्या मित्राचे उद्या डोळे जाणार आहेत, त्याच्या आधी त्याला तुझ्याबरोबर गप्पा मारायच्यात... फार नाही फक्त पंधरा मिनटं."

तिच्या काळ्याभोर डोळ्यांत सूक्ष्म राग तरळला,
"काहीही, खूप फिल्मी आणि चीजी आहे हे."

शौर्य पार ओशाळून गेला होता,
"सॉरी मॅम... वेडा आहे माझा मित्र... एन्जॉय युवर ड्रिंक."

आदिलनं खांदे उडवले, "ऍटलीस्ट वुई ट्राईड."

दोघं परत त्यांच्या टेबलवर आले.
तितक्यात आदिलला त्याच्या एकशेएक मैत्रिणींपैकी कोणाचातरी कॉल आला आणि तो फोनवर चिपकला.
शौर्य टिश्यू पेपरवर काहीतरी रेखाटत बसला.
त्याचं आवडतं डूडल: जेम्स हेटफील्डचं.



त्याच्या खांद्यावर हलकेच टकटक झाली.
तीच होती... काजळमाया... बाथरूमला चालली असावी बहुतेक,
"चांगलं काढलंयस स्केच... ऑलमोस्ट देअर."

शौर्य संकोचून उत्तरला,
"थँक्स."

"मेटालिका फॅन?"

"प्र SSS चंड."

"मी पण. फेवरेट गाणी?"

दोघंही एकदम उत्तरले,
"नथिंग एल्स मॅटर्स"

"ओरायन"
परत एकदम.

"एंटर सॅण्ड मॅन"
तिसऱ्यांदा.

तिच्या डोळ्यांत हसू फुलायला लागलं होतं हळूहळू...
आणि कॅफेच्या ज्यूकबॉक्सवर अवचित 'नथिंग एल्स मॅटर्स' लागलं.

क्रमशः



















      
  

No comments:

Post a Comment