शौर्य फ्लॅटच्या गॅलरीत आला... सहजच. त्यानं छातीभरून श्वास घेतला. मुंबईचा वास, मुंबईची हवा.
बाराव्या मजल्यावरून त्यानं डावीकडे नजर टाकली... कालीना युनिव्हर्सिटीचा अंमळ हिरवा पट्टा.आणखी लांबवर दिसणारा एअरपोर्टचा कंट्रोल-मनोरा. तो मनोरा नेहमी त्याला 'बुदबळा'तील वजिरासारखा वाटायचा. 'बुदबळं' त्याच्या आजीचा शब्द. भारी गोड वाटायचं त्याच्या कानांना ते.
आजीच्या आठवणीनं हलकेच हसत त्यानं नजर उजवीकडे फेकली.
बॅन्ड्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या रस्त्यापलीकडे तिवरांच्या झाडीचा छोटासा तुकडा अजून शाबूत होता.
त्यापलीकडे खाडी... पाणी... हलके झुळमूळ वाहत असलेलं पाणी!
आपल्या घरातून पाणी दिसावं अशी त्याची कैक वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती नवीन फ्लॅट घेतल्यावर.... आणि आत्ता लगेचच...
मनातनं ते विचार काढून टाकत गॅलरीतून त्यानं सरळ खाली बघितलं:
गव्हर्न्मेंट कॉलनी आणि भारतनगरच्या मधल्या पट्ट्यात पसरलेली ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी.
अधल्यामधल्या छपरांवर घातलेल्या त्या इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या ताडपत्र्या...
वरून दिसणारी अगणित छपरं, काही राखाडी काही इलेक्ट्रिक ब्लू आणि वरती केबलच्या थाळ्या.
ते ग्रे आणि ब्लू तुकड्यांचं विचित्र पॅटर्न तो बघत राहिला...
आणि एका राखाडी पत्र्यावर अवचित ती मुलगी आली.
चादरी वाळत घालायला... पावसाच्या ब्रेकमध्ये.
हार्डली चौदा-पंधरा वर्षांची असेल ती. शिडशिडीत, बहुतेक मुस्लिम.
तिनं जर्द निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता आणि फुश्चिया फिटेड लेगिंग्ज
निळा आणि फुश्चिया त्याचं आवडतं कॉम्बिनेशन, सुखविंदर आणि रेहमानसारखं.
इतक्यात अजून एक मुलगी छपरावर आली... तिच्या मदतीला... बहुतेक तिची लहान बहीण.
तिचं पण कॉम्बिनेशन छानच होतं: फिकट पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता आणि तशाच पेस्टल गुलाबी रंगाचा सैलसर पतियाळा.
पावसाळी हवेत राखाडी छपरावर लगबगीनं चादरी वाळवत घालणाऱ्या त्या मुलींचं कंपोझिशन...
निळं फुश्चिया हिरवं गुलाबी...
चंद्रमोहन कुलकर्णींच्या चित्रासारखं...
त्यानं डोळ्यांत भरून घेतलं आणि तो आत वळला.