Friday, 16 July 2021

मालफंक्शन

 'पूजा की थाली' सिरियलच्या हजाराव्या एपिसोडची पार्टी...

डिसेंबर महिन्यातला सुखद गारवा...
'मॅरियट-जुहू' च्या बाहेर एकामागोमाग एक गाड्या सुळ्ळकन लागत होत्या आणि तारे तारका आत शिरत होते.
सगळा पोर्च 'डिओर', 'शनेल', 'हर्मिस' ...आणि व्हॉट नॉट परफ्युम्सच्या वासानी प्रमत्त यौवनेसारखा घमघमत होता.

सगळ्यात आधी आली पी. के. टी. (पूजा की थाली) चा हिरो रचित सिन्हाची 'बीमर'.
आपल्या दोन्ही गालांवरच्या खळ्या फोटोग्राफर्सनी पुरेशा टिपल्यायत याची खात्री करून तो दोन्ही हातांनी विजयी बट्ट्या दाखवत आत घुसला.

त्याच्या पाठोपाठ पी. के. टी.ची व्हॅम्प सिम्रन शर्मा आली.
ऑडीतून उतरल्या उतरल्या तिनं सटासट पाठमोऱ्या पोझेस दिल्या.
खोल खोल उतरत्या बॅकलेस काळ्या गाऊन मधल्या संगमरवरी पाठीचे पुरेसे फोटो निघाल्यावर ती आत गेली.

तेवढ्यात काळीशार मर्स आली आणि फोटोग्राफर्स थोडे सैलावले.
सिरियलची हिरॉईन पूजाचं काम करणारी बरखा आतून उतरली... पांढऱ्या शुभ्र साडीत.
तिनंच होस्ट केली होती आजची पार्टी.
बरखाचा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा गोड चेहेरा, ऑन आणि ऑफ स्क्रीन असलेला 'संस्कारी' ट्रॅक रेकॉर्ड,
आणि अंमळ बोअरिंगच पर्सनल लाईफ (शून्य बॉयफ्रेंड्स) यामुळे पापाराझ्झी फारसे मागे लागायचे नाहीत तिच्या.
हिरॉईन ती असली तरी आजकाल सिम्रनचीच जास्त हवा होती खरं तर.
फोटोग्राफर्सनी कर्तव्यभावनेनं तिचे दोन चार फोटो क्लिक केले...
तिनं पोर्चमध्येच उभं राहून स्वतःच्याच पार्टीला उशिरा पोचल्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली...
आणि अचानक धुवाधार पाऊस सुरू झाला...
फोटोग्राफर्स आपले महागडे कॅमेरे झाकायला धडपडू लागले...
बरखा आत धावायला लागली... पण तिचा पदर कारच्या दारात अडकला होता...
तो सोडवायच्या प्रयत्नात ती चिंब भिजली...
इतक्यात एका फोटोग्राफरचं लक्ष तिच्या शुभ्र भिजक्या ब्लाऊजकडे गेलं...
त्याचे डोळे विस्फारले...
आणि मग शंभर हजारो लाखो फ्लॅश लखलखत राहिले.


एका आठवड्यानंतर 
----------------------------------------------------------------------------------------
बरखा थोडी चमकली...
समोर देवी नव्हती. दुसरीच कोणतरी पाठवली होती टाइम्सनं इंटरव्ह्यू घ्यायला.
नयी चावल दिसत होती.
"हाय मॅम मी शुची."
नयी चावलनं विश केलं पण खुर्चीतून उठण्याबिठण्याचे कष्ट-बिष्ट घेतले नाहीत.
शाळकरी मुलीसारखा आवाज होता तिचा आणि बांधासुद्धा!
खुर्चीत बसलेल्या तिचे पाय जमिनीवर पोचत नव्हते.
बरखानं मनातल्या मनात या टिंगूला हसून घेतलं...
आणि "हाय" बोलत खोटं हसू तिच्याकडे फेकलं.
"देवी?"

"अरे मॅम तिला चिकन गुनिया झालाय.
त्यामुळे सध्या बॉलीवूड सेक्शन मी संभाळतेय.
तुमची कमेंट हवी होती मागच्या आठवड्यातल्या वॉर्डरोब मालफंक्शन विषयी."

बरखा कोरड्या आवाजात उत्तरली,
"मी ऑलरेडी ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय आणि नवीन सांगण्यासारखं काही नाहीये माझ्याकडे."

"हो मॅम ते स्टेटमेंट आहे माझ्याकडे,
जे झालं ते दुर्दैवी होतं पण असा अवकाळी पाऊस येईल याची कोणालाच कल्पना नव्हती नाहीतर मी पांढरी साडी नेसलेच नसते. 
शिवाय जिम येऊन वरून घाईघाईत फंक्शनसाठी कपडे बदलले त्यामुळे इनर्स राहून गेले ... 
आता कृपया आपण सगळेच हा एक छोटासा अपघात समजून मूव्ह ऑन होऊया ...
वगैरे वगैरे"

"गुड मग झालं तर... मी निघू? मला वेळ होतोय. पण तू चहा घेतल्याशिवाय जाऊ नकोस हं!"
बरखा जायला वळली.

"मॅम एकच मिनिट... तुमचं अभिनंदन करायचं होतं कालच बातमी आऊट झालीय
शिवम संदालीच्या  'मिट्टीकी कार' या प्रचंड अँबीशियस आणि सेन्शुअस प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला आधुनिक वसंतसेनेची भूमिका मिळालीय.
खरं तर तीन सुपरस्टार अभिनेत्रींची नावं या रेसमध्ये होती... पण शेवटी तुम्ही फायनल झालात...
कसं वाटतंय?"

"ऑफकोर्स छान वाटतंय शिवम संदाली सारख्या ब्रिलियंट माणसाबरोबर काम करणं म्हणजे 'ड्रीम कम ट्रू' आहे."

"पण मॅम शिवम मागे एकदा म्हणाले होते ना, "बरखा खूप सुंदर आहे पण सोज्वळ आणि तीच तिची मर्यादा आहे... ती सीता, पार्वती, शालीन सून अशा भूमिकांतच बरीये. " इत्यादी इत्यादी. मग आता कसं काय हे एकदम हृदय परिवर्तन वगैरे?"

"वरच्याची कृपा", बरखानी वर बघून हात जोडले.

"वरच्याची म्हणजे तुम्हाला पावसाची म्हणायचंय का?"

बरखा चमकली!
"काय बडबडतेयस तू... इंटरव्ह्यू संपलाय बाय अँड हॅव अ गुड डे."

शुची हलकेच हसली,
"मॅम शेवटचा प्रश्न प्रॉमिस!... तो क्लाउड फिजिसीस्ट वरुण पावसकर तुमचा सावत्र भाऊ आहे ना?"

तरातरा चाललेली बरखा गप्पकन थांबली.

शुचीनी बोलणं पुढे रेटलं,
"म्हणजे गम्मत काये माहितीये का? मी नं खरं तर सायन्स सेक्शन कव्हर करते टाइम्सचं आता जस्ट देवीच्या बदली आले तात्पुरती."
मी रिसर्च करतेय खरं तर बिग डेटा आणि को-रिलेशनमध्ये . पण हे वर्षभर फ्री लान्स जर्नालिझम पण करतेय. तेवढीच स्टुडंट लोन फेडायला मदत!
तर साधारण महिन्याभरापूर्वी मी वरुणचं आर्टिकल वाचलं होतं 'कृत्रिम पावसाविषयी'
इंटरेस्टिंग काम करतोय तो.
मुख्य म्हणजे दोन दिशांनी त्याचं संशोधन चाललंय
एक तर समुद्राचं पाणी मायक्रोवेव्हजनी गरम करून वाफेचे ढग करायचे म्हणजे नैसर्गिक रेन-सायकल वर अवलंबून न रहाता कधीही ढग बनवता येतील.
अगदी डिसेंबरमध्ये सुद्धा काय?"
शुचीनी खेळकरपणे डोळा मारला.

बरखाची एव्हाना मेणाची बाहुली झाली होती.

"आणि दुसरं म्हणजे वर्षावक्षेत्राचा फोकस:
म्हणजे असंख्य छोट्या छोट्या ड्रोन विमानांनी हवीयेत ती रसायनं फवारून आपल्याला हव्या त्या अचूक क्षेत्रात पाण्याचे ढग बनवायचे.
आणि फोकस्ड पाऊस पाडायचा पाच-सहा किलोमीटरच्या परिघात... फार नाही दहा मिनिटांसाठी.
उदाहरणार्थ फक्त जुहूमध्ये!
शुची आता फुल फॉर्ममध्ये आली होती,
'मला तेव्हाच भारी आवडलं होतं ते आर्टिकल आणि मग जेव्हा मागच्या आठवड्यात फक्त जुहूमध्ये पाऊस झाल्याची बातमी आली तेव्हा मी जस्ट सहज म्हणून परत ते आर्टिकल ब्राउझ केलं. आर्टिकलवरच्या फोटोतला वरुणचा आणि नेटवर व्हायरल झालेला तुझा चेहेरा मला भारी सिमिलर वाटला.
पण तुमची आडनावं वेगळी आहेत... ब्रदर फ्रॉम अनदर फादर?"
तिनं तर बरखाला मॅम बोलायचं पण सोडून दिलं होतं आता...
सटासट फैरी झाडत होती ती,
"शिवाय समुद्राच्याच पाण्याची वाफ करायचीय तर जुहू सोप्पं ना?
म्हणजे तुझ्या सगळ्या पार्ट्या फोर सीझन्स हॉटेलला होतात जे किनाऱ्यापासून थोडं आत आहे पण ही पार्टी मात्र एकदम सी साईडच्या मॅरीयटमध्ये.
भारी इंटरेस्टिंग आहे हे सगळं!"
एक्साइटमेन्टनी  शुचीचा उर धपापत होता.

बरखा वळून परत खुर्चीत बसली.
"यु कान्ट प्रूव्ह ऑल धिस"

"अवघड आहे पण अशक्य नाही... गुप्त असला तरी शेवटी सरकारी एक्सरसाइज आहे हा.
पाण्याची वाफ करणाऱ्या जहाजाला कोस्टगार्डची परमिशन लागणारच.
शिवाय ढग 'सीड' करणाऱ्या ड्रोन्सची सुद्धा एव्हिएशन डिपार्टमेंटकडे नक्की नोंद असणार.
पण मुद्दा तो नाहीये."

"मग काय आहे मुद्दा?"

"म्हणजे काय झालं आणि कसं झालं ते मी फिगर आऊट केला बरचसं... की बाबा तू कृत्रिम पावसाचा उपयोग तुझे भिजके ऍसेट्स दाखवायला केलास वगैरे... आणि हो दे आर व्हेरी नाईस ऍसेट्स बाय द वे!
पण का केलंस हे मला नीटसं नाही कळलं... म्हणजे शिवमच्या नजरेत यायसाठी केलंस बहुतेक.
पण असंच छान सेन्शुअस फोटो-शूट करून पर्सनली शिवमला पाठवला असतंस तरी चाललं असतं ना?
एवढा द्राविडी प्राणायाम कशासाठी?
हा एकच प्रश्न मला विचारायचा होता तुझ्या डोळ्यांत बघून."

शुचीचे लुकलुक काळे डोळे बरखाच्या मधाळ तपकिरी डोळ्यांना भिडले.
बरखाच्या डोक्यातला कसलातरी कल्लोळ हळूहळू शांत होत होता.
तिनं उजवा पाय डाव्या पायावर टाकला...
तिचं ते प्रसिद्ध सोज्वळ स्मित केलं ... जे शुचीला खरं तर ('पाऊस' प्रकरणानंतर) सेक्सी वाटलं.

"सोप्पं आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर!
साइन फ्रॉम दी युनिव्हर्स!"

शुचीला काही कळलं नाही.
"म्हणजे"

"काय आहे ना शिवम दिग्दर्शक म्हणून ब्रिलियंट आहेच पण तेव्हढाच हट्टी आणि तर्कट.
मी सोज्वळ भूमिकांनी टाईपकास्ट झालीये... मला सेन्शुअस रोल जमणार नाहीत हे त्याच्या मनानं पक्कं घेतलं होतं.
आणि मला वसंतसेनेचा रोल पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेचच होता.
हजार सेक्सी पोझेस देऊनसुद्धा तो कन्व्हिन्स झाला नसता.
पण ते दैवी कौल वगैरे प्रकार भारी मानतो तो. 
शाहरुख यश चोप्रा आणि गॅंगनी नं ते 'उपरवालेका का सिग्नल' वगैरे भारी सगळ्यांच्या डोक्यात भरवलंय.
तर अचानक आलेल्या पावसात मी "अपघाताने" वगैरे एक्स्पोज होणं हा त्याला निसर्गाचा कौल वाटणार...
तो हरखून जाणार...
हे मला चांगलं माहिती होतं.
आणि तसंच झालं.
आणि हो वरुण माझ्या आईच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा पण आम्ही सख्ख्या भावंडांपेक्षाही क्लोज आहोत.
वरुणची एक्सपरिमेन्ट जुहूला होणार होतीच.
मी फक्त त्यावेळी माझं फंक्शन प्लॅन केलं.
आय वॉज जस्ट अ पर्सन इन द राईट प्लेस अ‍ॅट द राईट टाइम."

"हम्म हा साईनवाला अँगल डोक्यात नाही आला माझ्या."
शुची उत्तरली.

"आला ही नसता कारण तुम्ही सायंटिस्ट लोक्स गरजेपेक्षा जास्त लॉजिक वापरता आणि आमचे कलाकार लोक्स गरजेपक्षा कमी.
आणि जे हे ओळखतात ते यशस्वी होतात माझ्यासारखे.
सो व्हॉट नेक्स्ट?
करणारायस तू मला एक्स्पोज?
'एक्स्पोजमागील कारस्थान एक्स्पोज ' "
बरखाला मथळ्याच्या कल्पनेनी हसू यायला लागलं.

"हम्म"
शुची थोडी विचारात पडली.
"माहित नाही... खरं सांगायचं तर तुझी बॉडी तुझे कर्व्ह्ज... दाखवायचे... किती दाखवायचे... की नाय दाखवायचे तुझा चॉईस. असा काय मोठा तू कोणाचा खून नाय केलायस.
'एव्हरीथिंग इज फेयर इन लव्ह अँड वॉर अँड गेटिंग रोल'" म्हणूयात हवंय तर.
या स्कॅण्डलचा चांगला बोनस मिळाला असता पण जाऊ दे... आय थिंक हा मॅटर विसरून जाऊयात आपण
चल निघते मी."

बरखानं जाणाऱ्या शुचीला हलकेच हात पकडून थांबवलं...
थोडं जवळ ओढलं...
आणि आपले 'लॅक्मे ऍबसोल्युट मॅट फुशिया शेड' लावलेले ओठ शुचीच्या अनावृत्त ओठांवर टेकवले.
शुचीचे डोळे विस्फारत गेले.
बरखानं हलकेच मान हलवली.
'मिट्टीकी कार' चं शूट तीन महिन्यांत संपलं की मी तुला अजून मोठं स्कँडल देईन.
माझा "कपाटातून बाहेर येणारा" इंटरव्ह्यू एक्सक्लुसिव्हली तू घेणार आहेस.
त्या बोनसनी तुझं स्टुडंट लोन फिटेल बहुतेक...
कॉल मी.

----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते


No comments:

Post a Comment