Friday, 29 November 2013

झगार्ड ३:

 त्यानं झटपट लॉग ऑफ केलं आणि तो निघाला. फक्त सहा वाजले होते. संध्याकाळचा गुलाबी प्रकाश हळूहळू जांभळा होत होता पण रस्त्यावर अजून बऱ्यापैकी उजेड होता. आज चक्क दिवसाउजेडी तो कामावरून सुटला होता.
धिस वॉज अ मोमेंट टु बी चेरीश्ड! तो समोरच्या मावशीच्या गाडीवर गेला आणि त्यानं स्टीलच्या ग्लासातनं पाणी घेऊन ती सोनेरी कॅप्सुल गिळून टाकली!
'मावशी एक वडा पाव आणि कटिंग द्या… थांबा वडे गरम काढताय ना दोन्ही एकदमच द्या मग!'

मावशींनी एक हिरवट पांढरा गोळा घेतला त्याला चण्याच्या पातळ पिठाची "शंभो" केली आणि तो अलगद कढईत सोडला… मग दुसरा… मग तिसरा… ….
ते चुर्र चुर्र करत, मस्तीखोर पोरांसारखे एकमेकांना इकडे तिकडे ढकलत कढईत सेटल झाले!
त्यांच्या आजूबाजूला ते फुर्र फुर्र करणारे तेलाचे बुडबुडे!
हळूहळू ते पिवळे गोळे सोनेरी झाले… मग मावशींनी अलगद तेल निथळलं आणि त्या सगळ्यांना एक पलटी दिली!
मग बस्स दोनच मिनटांत ते थाळीत पडले.
त्यानं त्याचा वडा कढईत  असतानाच हेरून ठेवला होता... चार वेडीवाकडी कुरकुरीत नाकं फुटलेला मॉडर्न-आर्ट  मधल्या चेहेऱ्यासारखा तो वडा! त्यानं त्याच्यावर बोट ठेवलं आणि मावशीनं हसून मान डोलावली.
तिची पातळ सुरी पावामधून हलेकच फिरली आणि पावाचे बुडाशी जोडलेले दोन भाग झाले, आधी चिंच-गुळाची गोड चटणी मग हिरवी ओली चटणी आणि वर भुरभूरवलेलं लाल तिखट!
पर्रर्र्रफेक्ट त्याला हवं तितकच कमी नाही की जास्त नाही…
मग कुरकुर नाकवाले वडेबुवा अलगद पावात घुसले!
मावशीनं तो वडापाव त्याला हॅन्डओव्हर करता करताच निन्जाच्या चपळाईनं दुसऱ्या हातानं कटिंग ओतली!
तिही त्यानं ताब्यात घेतली आणि एक दिलखुष नजर सभोवार फिरवली…
संध्याकाळची वेळ, लोकांची लगबग, समोरून चाललेल्या सिम्बायोसिसच्या दोन छान मुली… सगळं त्यानं डोळ्यात भरून घेतलं आणि वडापावचा एक लचका तोडला; तोंड थोडं उघडंच ठेवून त्यानं बटाट्याची वाफ बाहेर जाऊ दिली आणि मग गरमपणाचा अंदाज घेत हलकेच तो घास चावला… एका कुरकुरीत नाकासकट!
तोंडात घास न गिळता तसाच ठेवत त्यानं कटिंगचा घोट मारला आणि आलंवाला तो कमी गोड चहा घासाच्या आसपास आणि आत पसरला!
'हेवन जस्ट हेवन!'
त्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला आणि तो स्टूलावर बसत स्तब्ध झाला.

क्रमश:

Thursday, 28 November 2013

झगार्ड २:

  दोघांनी मिळून वाईनची अख्खी बाटली पार केली होती… आणि नंतर झक्कास जेवण! शेवटी तिरामिस्सुचा चमचा त्यानं तिला भरवला आणि गालावर हलकेच ओठ टेकत ती सोनेरी कॅप्सुल तिच्या ओलसर जिभेवर ठेवली.
'हे तुझं बर्थ डे प्रेझेंट!' तो डोळे मिचकावत बोलला.
'वाव्व झगार्ड!' ती चित्कारली. ,'पण टायमिंग जुळणार बरोबर? शिवाय कित्ती महाग असतं  ते?…एवढा खर्च करायची काय गरज होती रे??'
त्यानं तिला जवळ ओढली आणि तो तिच्या कानात पुटपुटला, 'तुझा  प्रॉब्लेम माहितीय काय आहे? तू खूप जास्त प्रश्न विचारतेस!'…. पुटपुटतानाच त्यानं तिच्या कानाची पाळी हलकेच चावायला सुरुवात केली होती.
ती सित्कारली आणि तिन त्याचं डोकं केस पकडून आपल्या वक्षात दाबलं!
त्यानं तिचा एक झकास कीस घेतला मग तिनं त्याचा… मग परत त्यानं, तिच्या नाकाचे, डोळ्यांचे, कानाचे… खालच्या ओठाचे, वरच्या ओठाचे, वक्षांचे आणि बेंबीचे, मांड्यांचे  आणि मांड्यांमधले शंभर हजार एक लाख किसेस!!!

हलकेच त्यांनी एकमेकांचे कपडे उतरवले… तिनं त्याची आवडती फुश्चिया कलरची ब्रा घातली होती आणि त्यानं तिची आवडती 'डिझेल'ची डार्क ग्रीन ब्रीफ!
बराच वेळ ते शोधत राहिले एकमेकांचे कोपरे,खळगे आणि उंचवटे…मांसल आणि उष्ण!
मग तो तिच्यात शिरला अन ती हलकेच कण्हली… तिचे डोळे जडावले होते… किती तरी वेळ दोघं लयीत हलत होती आणि मग तिच्या मांड्यात सुखाचा स्फोट झाला… मांड्यान्तून पोटात छातीत आणि मेंदूत!

शरीर ह ssssss लकं झालं आणि तिच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला.
ती स्तब्ध झाली होती… त्यानं हलकेच तिच्या कपाळाच चुंबन घेतलं, तिच्या अंगावर चादर ओढली आणि तिला कुशीत घेऊन तो झोपून गेला.

क्रमश:

Tuesday, 26 November 2013

झगार्ड १:

सुळक्याच्या तिसऱ्या लेजवर ते दोघं जेमतेम अ‍ॅन्कर होऊन उभे होते.
कसं वाटतंय? धनुषनं विचारलं.
'ऑसम', अभ्यंग उत्तरला पण कोरड्या पडलेल्या घशामुळे त्याचा आवाज थोडा चिरकलाच.

 'ओके शेवटचा पॅच हार्डली तीस फुटांचा आहे. ओव्हरहॅन्ग थोडासा तुझ्या अंगावर येईल पण तुला जुमार आहे त्यामुळे काळजी नको. वरती बंकू आहेच. ही  गोळी घेऊन टाक.', धनुषनं सोनेरी कॅप्सुल त्याच्या  हातावर ठेवली. 'एक वीस मिनिटांत तुझं झगार्ड येईल आणि ते साधारण तासभर टिकून राहील तो पर्यंत मी वर येईनच मग आपण रॅपल डाऊन करू. ठीकाय??

अभ्यंगनं गोळी गिळून टाकली. धनुषनं अभ्यंगचं अ‍ॅन्कर आणि जुमार चेक केल आणि त्याच्या पाठीवर हलकिशी थाप मारत तो म्हणाला, 'चल सुट'!

 अभ्यंगनं क्लाईम्बिंग चालू केलं. रॉकमध्ये तसे 'होल्ड' भरपूर होते. धनुष किंवा बंकू सारख्या क्लाईम्बिंग मधल्या किड्यांना "डांग्या" सुळका तसा सोपाच होता. पण अभ्यंग तसा नवखाच, त्याचं हृदय थाडथाड उडत होतं…सुळका सोपा होता पण एक्स्पोज भारी होता. बेसपासून तीनशे फूट तरी असावा तो.
खाली खोल हिवाळ्यातली पिवळी पडलेली कुरणं आणि चरणाऱ्या गायी दिसत होत्या.
भण्ण वारा आणि हाताला भिडणारा तो काळा कातळ…अचानक त्या काळ्या काळ्या सह्याद्रीच्या दगडूबद्दल त्याला माया दाटून आली आणि त्यानं बाहेर आलेल्या एका टेंगुळाचं  चक्क चुंबन घेतलं!
जुमार सरकवत अभ्यंग कष्टाने हाइट गेन करत होता. शेवटच्या ओव्हरहॅन्गला त्याची चांगलीच फाटली. घसा कोssssरडा पडला होता. हाता पायात पेटके येत होते… झालं शेवटचा ओपन-बुक सारखा दिसणारा रॉक पॅच पार केला की दहा फुटांवर समिट!
अभ्यंगनं एक मूव्ह घेऊन 'ओपन बुक' पार केलं, 'धनुषला आवडली असती ही मूव्ह!' तो स्वत:वरच खुशारला!
कडेवर दोन्ही तळवे रोवून त्यानं शरीर वर खेचलं… आधी डावा पाय मग उजवा पाय… तो शिखरावर पोचला होता! त्याचे पाय शिलाई-मशीन सारखे थडथडत होते… समीsssssट तो खुष होऊन ओरडला!
त्यानं चहुबाजूंना नजर टाकली… बंकू बाजूला बसून लिमलेटची गोळी चोखत होता. त्यानं थम्स अपची खूण अभ्यंगकडे फेकली. अभ्यंगनं त्याला उलटा फ्लाइंग-किस फेकला आणि तो दोन्ही पाय फाकवून अकिम्बो पोझिशन मध्ये उभा राहिला. अशा पोझ मध्ये आपण सुहास शिरवळकरांच्या 'दारा बुलंद' सारखे वाटतो असं त्याला उगीचच वाटायचं!

 त्यानं वेस्ट पाउच मधून ती सोनेरी कॅप्सुल काढली आणि पाण्याबरोबर गिळून टाकली. मग हलकेच चहुबाजूंना नजर टाकली… भण्ण वारा चालूच होता. चहूकडे जांभळे डोंगर निश्चल उभे होते. बाजूच्या दरीत एक गिधाड आपल्याच नादात घिरट्या घालत होतं… हिवाळ्यातल्या दुपारी ३ वाजता असते तशी सगळ्या उन्हावर एक धुरकट झिलई आली होती… आणि तो डोंगराचा, गवताचा, घाणेरीचा वेडावणारा गंध गच्च भरून राहिला होता…"याचसाठी केला होता अट्टाहास"!
त्याचं मन हळूहळू निवत गेलं… शां sssss त शांत झाला तो. आणि त्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला. 
 बंकूनं त्याला सावधपणे बसतं केलं आणि घड्याळाकडे नजर टाकली, तासभर तरी अभ्यंग असाच राहणार होता. 



क्रमश:

Tuesday, 17 September 2013

योद्धा

 पला राजेंद्रनाथ उर्फ पोपटलाल कुठल्यातरी पिक्चरमध्ये (गुमनाम बहुतेक) हिरॉइनीला ''भयानक सुंदर' म्हणतो तेव्हा गडगडून हसलेलो...  पण आज मात्र असं काही खरंच असतं याची खात्री पटायलोय!
 पाऊलवाटेवर चालता चालता त्याला जग्याने स्पॉट केलान… ह्या मालवणी लोकांची नजर म्हणजे…(मला आधी न दिसल्याबद्दल नेहमीप्रमाणे वैषम्य वगैरे वाटलेलं). 

 कसला देखणा होता तो! आफ्रिकन योद्ध्यासारखा… 
तस्साच कॅमाफ्लॉजमधे लपलेला… सावध तल्लख आणि रुथलेस. 
गोंडस वगैरे अजिबात नसेलला!
त्याचं ते मोहॉकवालं डोकं, रागीट डोळे आणि डोक्यावरचं पिवळं पाईपिंग… आम्ही खिळून राह्यलेलो!
आणि मग रागावून त्यानं डौलदार बॅक फ्लिप मारली आणि अजून आत लपला!

नाकतोडे-सिंग राजपूत, प्राण्यांच्या ३०० मध्ये तुम्हाला किंग लिओनिडसचा रोल दिला असता आपण… १०१ टक्के!!!





Sunday, 2 June 2013

क्रश्

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
 हेल्लू डोक्ट कशे हाये टुमी ? ! हा माजा पयला मेल हाये

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
हाय त्वरा बेटा कशी आहेस तू? तुझा पहिला-वहिला इ मेल मिळाला…सगळ्या 'टायपों' सकट  :) खूप गोड!
डोन्ट वरी प्रॅक्टिस चालू ठेव!

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
हाय डॉक्टर! कालच मी नवीन हेअर कट केला! फोटो अ‍ॅटॅच केलाय. हो अ‍ॅटॅचमेण्ट पण शिकलेय मी आता!
कशी दिसते सांगा?
आणि हो शुन्य टायपोज हां :)

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
व्हॉट कॅन आय से बच्चू ? यु आर फास्ट रनर अ‍ॅन्ड इव्हन फास्टर लर्नर!
फोटो आवडला… कपाळावरच्या झिपऱ्या मस्तच!
सकाळी पळायला जातेस का?

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
डॉक पळायला जातेच… बाय ऑल मीन्स!
काल मार्था आणि अबलख बरोबर शर्यत लावली होती. मी जिंकले हे सांगायला नकोच.
हरल्यावर दोघांची तोंडं घोड्यासारखी लांब झाली होती…  हाहाहाहा!
आणि माझं खि खी हसणं तर जले पे सुहागा!

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
तू सुधारणार नाहीस, इकडे भारतात एवढंसं बाळ असल्यापासून मस्ती करायचीस :)
आणि वेडूबाई 'जले पे नमक' म्हणायचंय का तुला? 'जले पे नमक' आणि 'सोने पे सुहागा' असतं कळलं?
असो… गेल्या वीक एण्डला मुंबई गोवा रोडवर कोलाडला रिव्हर राफ्टिंगला गेलो होतो त्याचे फोटो पाठवतोय.

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
डॉक, कसले हॅन्डसम दिसताय तुम्ही फोटोत.
तुम्ही अजून सिंगलच आहात ना? देवाचीच कृपा :) विंक विंक

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
गुड नाईट हॅन्डसम... स्वीट ड्रीम्स… मिस मी!

From Twara@Texas_Research_Centre.org.us:
तुम्ही रिप्लाय का नाही करत आहात?
मला रांचवर व्हिजीट करायला कधी येणार आहात?
मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचय… काहीतरी अमेझिंग…
पण इश्श मला बाई लाज वाटते ^_^

From Twara@Texas_Research_Centre.org.us:

तुम्ही रिप्लाय का नाही करत आहात?
आय हेट यु ….
पण तरी पण आय लव्ह यु!
पण आय हेट यु मोअर फॉर नॉट रिप्लायिंग :* :^* hugs n kisses !

From Dr_Arnab@Indian_Institute_Of_NeuroScience.org.in:
संयमा, 
तुझा फोन का लागत नाहीये? च्यायला मेजर गडबड झालीये इथे. त्वरा चक्क माझ्या प्रेमात पडलीय!
माणसांच्या मेंदूतल्या ग्लायल सेल्स घोड्यांच्या मेंदूत इंजेक्ट करून त्यांना बुद्धिमत्ता आणि 'स्व' ची जाणिव देण्याचा आपला पहिलावहिला प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी झालाय.   
आपल्या भारतीय + अमेरिकन जॉइन्ट व्हेन्चर टीमनं सहा महिन्यांपूर्वी हे ऑपरेशन केलं तेव्हा इतके याहूम रिझल्ट्स येतील असं मलाही वाटलं नव्हतं.  
त्वरा रोज झपाझप नव-नवीन गोष्टी शिकतेय… 
रांचवर तिच्यासाठी खास टेली-मेट्री  वापरून गवताचा साधारण बास्केट-बॉल कोर्ट च्या आकाराचा की बोर्ड सुद्धा बनवला गेलाय. 
साधारण २ * २  फुटाची एक-एक "की"; आणि दोनदा टापा आपटल्या की "की स्ट्रोक"!  
समोर सिनेमाच्या पडद्याएवढा मॉनिटर. तो वापरून ती मला रोज मेल करते. 
पण ते जाऊ दे… मुख्य लोचा म्हणजे तिच्या डोक्यातील लिम्बिक भागात गडबड झालीये बहुधा. 
आणि त्यामुळे ती चक्क माणसात आदर्श जोडीदार शोधू लागलीये. 
माझी तर ज्याम फाटलीय! दोन दिवस तिला रिप्लाय करायचं पण डेअरिंग होत नाहीये!  

From Dr_Sayyam@Institute_Of_Animal_Psychology.org.in:
अर्णब,
थोडं थंड घे… इतकं काही पॅनिक व्हायची गरज नाहीये रे! 
एक तर तूच भारतात  त्वरावर हे ऑपरेशन केलंस आणि तिला कॉन्शसनेस ('स्व ' ची जाणिव) दिलीस. 
म्हणजे एका अर्थी तू तिचा "कर्ता" च आहेस.  
आपण अमेरिकन्सना कबूल केल्याप्रमाणे ऑपरेशन नंतरची दोन-तीन वर्षं ती ऑब्झर्वेशन्ससाठी तिकडे रांच वर राहील पण तिच्या जन्मापासून ओळखणारा, तिच्या घराला, भारताला जोडणारा दुवा तूच आहेस. 
सो तुझ्याविषयी तिला जिव्हाळा वाटणं साहजिक आहे रे.


दुसरं म्हणजे  त्वरा आता २ वर्षाची आहे म्हणजे घोड्यांच्या मानाने टीन-एजरच. 
या वयात पोरं होतात थोडी ओढाळ आणि आत्ताचे टीन-एजर्स तर काय दोन दोन मिन्टाला "आय लव्ह यु" बोलतात आणि "हेट यु" तर दर १० सेकंदांना :)

थोडक्यात काय तर तू म्हातारा झालायास हाहाहाहाहा!

ता. क. 
माझा एक क्लिप्टोमॅनिअ‍ॅक लॅब्रॅडॉर पेशंट आहे; त्यानंच माझा फोन ढापून नेला होता म्हणून लागला नसेल. 
उद्यापासून लागेल… त्याची मालकिण परत आणून देणाराय  :)


From Twara@Texas_Research_Centre.org.us:
डॉक,
आता आणि नाही थांबू शकत मी… तुम्हाला सांगितलंच पाहिजे… मला बोलता येत असतं तर फोनच केला असता!
आज काहीतरी झालंय… कसं  सांगू… शी मला बाई लाज वाटते ^_^

अबलखने मला आज किस केलं!

म्हणजे आम्ही सकाळी रेस लावली होती आणि त्यानं चक्क मला हरवलं… मग आम्ही दोघं मस्ती करत खिंकाळत होतो, 
तो मला ढुश्या देत होता आणि अचानक ते झालं :)
त्याच्या मोठ्ठाल्या पाणीदार डोळ्यांत हरवत चाललेय मी डॉक!
आय अ‍ॅम इन लव्ह विथ अबलख!
त्याचा सेन्स ऑफ ह्युमर पण खूप मस्त आहे… किस करून वर मला म्हणतो कसा, "स्ट्रेट फ्रॉम दि हॉर्सेस माऊथ"!
खि खि खि खि!!



-नील आर्ते

क्रश्

Saturday, 12 January 2013

नजर हटी दुर्घटना घटी (?)

 क्खा दिवस आणि अक्खी संध्याकाळ ड्राईव्ह करून पश्मिनचं शरीर आंबून गेलं होतं. इतका वेळ त्यानं कटाक्षानं झोपेला दूर ठेवलं होतं पण आता मात्र रात्र झाली होती. त्याचं गात्र न गात्र थकलं होतं. लवणाऱ्या पापण्या मिटताना किंSSSSSचित जास्त वेळ घेत होत्या...मन हळूहळू निवांत होत होतं आणि दिवसभराच्या ड्राईव्हचा पिक्चर त्याच्या डोळ्यापुढून सरकत होता.

 एक्स्प्रेस-वे वरची ती काळी डौलदार ऑडी आणि त्यातल्या त्या स्टडनं बाहेर फेकलेली प्लास्टीकची बाटली...कार थांबवून तीच बाटली त्याच्या स्पाईक्स काढलेल्या डोक्यावर तीनदा टणाटणा आपटाविशी वाटली होती पश्मिनला. क्यू-सेवन चालवत होता पण झाटूची चिंधीगीरी काय सुधारत नव्हती.

'दादा-पादा' च्या नंबर प्लेट्सवाल्या गाड्या,
'बघतोस काय मुजरा' कर आणि 'नाद नाय करायचा' वाल्या माजोर्ड्या पाट्या...
कुठे कुठे 'झर्याची मैना' वाली गोंडस पाटी!

नीता फूड मॉल वरचा गोटी एवढा इवलुसा वडा (किंमत फक्त वीस रुपये).

असं काय काय आठवत राहिलं त्याला!

समोरून स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!

त्याची विचारांची वीण थोSSSडी सैल झाली...मग आणखीन थोडी:
रांचीच्या केसांचा तो वेडावणारा वास...नवीन कुठचातरी शाम्पू आणलाय वाटते तिनं...
हवा थोडी कमी वाटतेय का पुढच्या टायरमध्ये?...
नीता फूड मॉल वर चौकडी आतापासून...वीस रुपये?...चोर साले...
आपला लाल चौकडीचा शर्ट कुठे गेला काय माहित...
स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!...

त्याच्या पापण्या अलगद मिटल्या...एक सेकंद...दोन सेकंद...चार सेकंद
विचार अजून उसवले आणि मग विरायला लागले!
स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!

मग त्याच्या मेंदूचा कुठला तरी खट्याळ भाग अलगद कुजबूजला, "पश्मिSSSन राजाSS ड्राईव्ह करताना कोणी झोपतं का कधी वेडोबा?...खिक्क!!!"

आणि त्यानं राप्पकन डोळे उघडले, त्याची छाती थाडथाड उडत होती...डुलकी किती वेळ लागली होती कोण जाणे...पण वरती पंखा गरगरत होता!
रांचीनं त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांची 'च्युइंक-च्युक' आवाज करत झकास पापी घेतली आणि मिस्किलपणे विचारलं, "झोपेत पण स्टिअरिंग-व्हील सारखे हात काय फिरवत होतास रे?
पश्मि SSSन राजाSS झोपताना कोणी ड्राईव्ह करतं का कधी वेडोबा?...खिक्क !!!"


-नील आर्ते 

Thursday, 6 December 2012

ब. रा. गु. चो. ...च्या निमित्ताने

तुम्हाला कधी असं झालंय? म्हणजे आपण एखादा यम्मी पिक्चर (किंवा नाटक किंवा पुस्तक वगैरे) उगीचच वेळ काढूपणा करत ताजा ताजा गरम असताना बघत नाही.(पुणुलेच्या भाषेत मा sssssss ज)...
आणि मग सवडीने अवचित कधीतरी बघुन झाल्यावर वाटतं...अरे यार इतके दिवस आपण का टाइमपास करत होतो? कसे राहिलो याच्याशिवाय?? कसे जगत होतो?? इ. इ. 
(म्हणजे तसं रियलायझेशन मला अंमळ उशीरा ड्रायव्हिंग शिकल्यावरही झालं होतं आणि, तब्बल दहा वर्षांनी हॅरी पॉटर वाचल्यावर सुद्धा).

प्रत्येक गोष्टीचा टाईम यावा लागतो हेच खरं.

मुदलात 'माकडाच्या हाती शॅम्पेन' बघू बघू म्हणत राहून गेलेलं...
पण फायनली "बदाम राणी गुलाम चोर" बघितला आणि मी काय मिस करत होतो ते कळलं!

एकतर मला हटके नाववाल्या 'प्रोटॅगॉनिस्ट्स्'चं  भारी फॅसिनेशन...
आणि इकडे तर काय पुस्तक, पेन्सील, चाकू, माकड, काकडी वगैरे...हैदोसच सगळा!

त्यांची ती फाड-फाड विधानं, दुहेरी लेयर्स वर चालणारा प्लॉट, 
आणि रिलेशनशिप्सचा लख्ख आरसा दाखवणारे अफाट सीन्स...मस्तच.

बरेच जण म्हणतात त्या प्रमाणे ती डॉ. विवेक बेळेन्च्या नाटकाचीच मूळ जादू असेल कदाचित,
पण पुस्तक-पेन्सिल च्या रंगीत सीन मधले ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चाकू आणि माकड,
"ह्यो पायजे का तुला त्यो पायजे" चा साउंडट्रॅक इ. नक्कीच सिनेमाध्यमाचे बोनस!
शिवाय क्लोज-अप्स ची सोय असल्याने पुष्कर, उपेंद्र, मुक्ता, आनंद सगळ्यांनाच फटकेबाजीला फुल्ल स्कोप! 
उदाहरणार्थ पानवाल्याकडून मोड घेण्याचा सीन...तुफान!

एकंदरीत काय जलसाच...

मागे मी लेडी इन द वॉटर"...च्या निमित्ताने सिनेमावर न लिहीण्याविषयी बोललेलो,
पण 'पेन्सिल' बाइंनी म्हणूनच ठेवलयना, "मी भूतकाळात केलेल्या विधानांची कोणतीही जबाबदारी भविष्यात घेत नाही"
सो...साई सुट्ट्यो!!! :)

नोट्स टू मायसेल्फ: "काटकोन त्रिकोण" बघणे...प्रॉन्टो!
-नील आर्ते