Tuesday, 29 December 2015

हज्जम

श्वा पुणे स्टेशन शिवनेरी बस stand वर धावतच घुसला . शेवटची शिवनेरी उभी बघून त्याला हायसं वाटलं. स्साला त्याच्या प्रोग्राम मधला बग त्याला शेवटी ११ वाजता सापडला होता. लगेच software ची बिल्ड फायर
करून तो निघाला. तरी मगर -पट्ट्यावरून इथे येईपर्यंत १२ वाजलेच होते.


 stand वर इतक्या रात्रीही तुरळक रांग होती. शुक्रवार रात्र आणि गणपतीचे दिवस साहजिकच होतं ते.अश्वाने झटपट तिकीट घेतलं, पाण्याची इटुकली बाटली ताब्यात घेतली आणि तिकीटाकडे एक बेफिकीर नजर टाकली . बोअरिंग ८ नंबर होता पण व्हू केअर्स ?
 तो आरामात जाऊन १ नंबरच्या सीटवर बसला . ही त्याची तुफान आवडती सीट. व्होल्वो मधली दरवाज्याकडून पहिली सीट ! इतर पाठच्या सीट्स पेक्षा खूप प्रशस्त लेग स्पेस ,डावीकडे तिरपी उतरणारी मोठ्ठी काच आणि समोरचा भव्य विंड शिल्ड ....ओहोहोहो जस्ट हेवन !!!

 पण एक मोठ्ठा प्रॉब्लेम होता . या १ आणि २ नंबर सीट्स व्ही . आय . पी . साठी राखीव असत ; आमदारांसाठी म्हणे ..आता च्यायला कोणता आमदार बस मधून प्रवास करतो ? त्या बहुतेक मोकळ्याच असत आणि पुढे औंध वाकडला नॉर्मल प्रवाशांनीच भरत. पण पुणे स्टेशनवर मात्र अश्वाला त्या मागूनही मिळत नसत आणि अश्वाला तर १ नंबर सीटवर बसायचं व्यसन लागलं होतं...
 त्याचा गेम चालू झाला !
आपल्या बाबांची बस असल्यासारखा तो रुबाबात १ नंबर सीटवर पाय ताणून बसला.
तेवढ्यात बाकीची ५ - ६ माणसंही चढली आणि तिकीट चेकर माणसं मोजायला आत आला .
लगेच अश्वाने फोन उपसला आणि आणि त्याच्या खास कमावलेल्या आवाजात तो चालू झाला,"हां आबा कधीही या , आता प्रचाराची गडबड नाही ..गाडी पाठवू का न्यायला ?" फुल टू फेकाफेकी !
तिकीट चेकर अश्वाकडे वळला , " बघू सायब तिकीट तुमचं. " अश्वाने फोनवर प्रचंड गुंतल्यासारखं दाखवत तिकीट त्याच्या हातात दिलं खरं पण त्याच्या छातीत बाकबूक होत होतं.
चेकर क्षणभर थांबला , त्याने तिकीटाकडे एक ओझरती नजर टाकली आणि तिकीट अश्वाला परत देऊन तो पुढे सरकला .
अश्वाच्या छातीत आनंद शिरशिरला ! एकतर चेकरला तो खरंच कोणा आमदाराचा भाचा-फीचा वाटला होता किंवा त्याला अश्वाची प्लेन दया आली होती. काही का असेना पण त्याने अश्वाला एक नंबरवरून उठवायचे कष्ट घेतले नव्हते .
१ नंबर सीट आता आख्खी त्याची होती ...पूर्ण ३ तास आणि गर्दी कमी असल्यानं कदाचित २ नंबर सुद्धा !

सवयीनं अश्वाला हां गेम आणि त्यातला छोटासा थरार आवडायला लागला होता . त्यानं मिस्कील हसत खुशीत बबलला मेसेज केला "hajjam ;)" लगेच बबलचा मेसेज किणकिणला , ";) congrats baby ...muaaah"
साला मरते आपल्यावर अश्वा खुशारला.पुण्यात ५ दिवस बबल आणि वीक एन्डला मुंबईत टीना !
"अश्वा तेरी तो पांचो उंगलिया घी मे और सर कढाइमे है बॉस अश्वाचे मित्र म्हणायचे .
त्यानं लगेच बबलला रिप्लाय केला "baby miss u n ur lips :-* " .
लगे हाथ दुसरा मेसेज टीनाला पण करून टाकला "on ma way to Mumbai love ...c u tomorow ..all of u ;) "
स्वतःवरच खुश होत त्यानं बाहेर नजर टाकली. पावसाची रिपरिप चालू झाली होती. गणपती चालू झाले तरी पाऊस अजूनही फुल फॉर्म मध्ये होता. तितक्यात औंध-परिहार चौक आलंच. इतक्या रात्री stop वर बहुतेक कोणच नसणार होतं तरी ड्रायवरने कर्तव्य म्हणून बस स्लो केली आणि त्याला विंडोच्या काचेतून ती दिसली , कसली बॉम्ब होती !!!
 ती घाईघाईत बसमध्ये चढली तेवढा वेळ अश्वाला झाडी मारायला पुरेसा होता.
लीवाईस कर्व्ह डी स्लिम फीट जीन्स ....तिचे सगळे कर्व्हज दाखवत आपलं नाव सार्थ करत होती !
काळा हाल्टर नेकचा स्लीवलेस top , त्यातून दिसणारे ते गोरे गोरे मांसल दंड , अस्ताव्यस्त बन मध्ये बांधलेले हाय-लाईट केलेले केस आणि खांद्याला चक्क लुई व्हितोची डिझायनर bag !
'मोठी पार्टी असणार ' , अश्वा तरारला , 'हिला पटवायला धमाल येईल यार. ' त्याचा मेंदू सटसट काम करू लागला.

ती आत शिरता शिरता त्यानं सहज वाटेल अशी दोन नंबरवर ठेवलेली आपली bag उचलली , तिचे डोळे लकाकले , 'Can I seat here' ? , ती चिवचिवली . 'Shuaaaaa Ma'm Aaall yours pleeease' , (& me too हे मनात ) अश्वा चालू झाला ! गोड हसत ती बसली आणि 'डेविडऑफ गर्ल ' चा धुंद सुगंध दरवळला . २-३ मिनटे अशीच गेली ..."madam तुम्ही सीट बेल्ट नाही लावलाय " ! 'ओह्ह लावायलाच पायझे खा ? is it like mandatory ??' , ती आन्ग्लाळलेल्या मराठीत उत्तरली.
'Not Really पण लावावा माणसानं ..सेफ्टी फर्स्ट आणि देशाला तुमच्या माझ्यासारख्या स्मार्ट लोकांची गरज आहे यु नो !'
ती खळखळून हसली आणि त्याचा कलिजा खल्लास झाला ...तिचे ते दोन्ही वरच्या कोपऱ्यातले एक्स्ट्रा दात तिला अजूनच सेक्सी बनवत होते.
थोडा वेळ ऑक्वर्ड शांतता ! वाकड stop ला कोणी नव्हतंच. पुढच्या पाच मिन्टांत गाडी एक्स्प्रेस वे ला लागली.
शिवनेरी रिपरिप पावसात चकाकणारा रस्ता सण्ण सण्ण कापत होती.

टाईम फॉर नेक्स्ट मूव्ह ! अश्वान समोरच्या कप्प्यात ठेवलेला प्युअर मॅजिक बिस्किट्सचा पुडा
उघडला , एक बिस्किट तोंडात टाकल ...कुड्डुम् कुड्डुम...चॉकलेट बिस्किट आणि त्याच्या आतल
डार्क चॉकलेट!
त्याच्या तोंडात आनंदाचा एक छोटासा स्फोट झाला. त्यानं सुखाची परिसीमा गाठल्यासारखे डोळे अर्धवट मिटले. असे बोक्यासारखे अर्धवट डोळे मिटले की आपण जाम सेक्सी दिसतो असं त्याचं स्पष्ट मत होतं.
त्यानं पुडा तिच्याकडे केला , ती ऑक्वर्ड हसत 'नको' म्हणाली . 'अरे तुम्ही डायटिंग करताय का ? इतक्या काही जाड्या नाही आहात तुम्ही' तिची थोडी खेचायचा टाईम होता.
ती परत खळखळली आणि तिनं बिस्कीट घेतलं.मग काय बर्फ फोडायला अश्वाला फारसा वेळ लागला नाही.

सीट हज्जम झाल्यापासून आज सगळं कसं मनासारखं घडत होतं.१ नंबरची सीट , सण्ण सण्ण रस्ता कापणारी शिवनेरी आणि बाजूला दिलखुलास गप्पा मारणारी मस्स्त बेब , और क्या चाहिये लाईफमे 'हाथी घोडा' ??

बोलता बोलता त्याला कळलं की ती पण त्याच्याच सारखी डेथ मेटल , स्पीड मेटल म्युझिकची फॅन आहे."मग तर तू मेटालिकाचं 'कॉल ऑफ क्टुलू' ऐकलंच पाहिजेस " ,लगेच त्यानं आपला लेटेस्ट आय फोन उपसला. "ए तू पण ऐक ना " , ती किणकिणली. मस्तच !!! एक बोंडूक त्याच्या उजव्या कानात आणि एक तिच्या डाव्या. एका मागून एक गाणी चालू झाली आणि मग लागलं गॉड्स्मॅकच 'सेरेनीटी ' ! ते गूढरम्य ड्रम्स ..कुठच्या तरी खूप खिन्न प्राचीन विश्वात नेणारे , अशोक व्हटकरांच्या अथर्वीय जगात , किंवा नारायण धारपांच्या समर्थांबरोबर खोल तळघरात. अश्वानी हळूच एक नजर साईडवाईज टाकली. ती डोळे मिटून गाण्यात फुल घुसली होती. पास होणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात तिचे लालचुटुक ओठ चमकत होते.त्याने दुसरी नजर मागे टाकली. कुठे कुठे विखुरलेले चार पाच प्रवासी सगळेच झोपेत लुढकले होते.ड्रायवरपण बिचारा शहाणा होता पाठी बिठी बघत नव्हता . इमानदारीत गाडी पळवत होता.

त्यानं धाडस करून तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला अलगद जवळ ओढली , थोडी आणखी जवळ. तो तिच्या कानात काहीतरी कुजबुजला , काय ते त्यालाही माहित नव्हतं , त्याला तर तिच्या कानाची लुसलुशीत पाळी कुर्तडायची होती. ती हलकेच कण्हली. आता अश्वानी तिला फुल कॉन्फिडन्सनी जवळ खेचली आणि ती त्याला बिलगलीच. ती जणू ट्रान्समध्ये गेली होती. तिच्या गर्रम गालांचा त्याच्या हाताला होणार स्पर्श ! ३० सेकंदात मोठ्ठा बोगदा येणार होता. अश्वाने आपले ओठ हळूहळू तिच्या ओठांजवळ नेले. तिचा गर्रम श्वास त्याच्या ओठांवर रेंगाळला..जवळ अजून जवळ..बोगदा चालू झाला आणि त्यांचे ओठ भिडले..तो लुसलुशीत ओलसर स्पर्श गरम रस्श्यातील कोवळ्या मटणासारखा!

खोलखोल रुतणारा भण्ण बोगदा आणि त्याच्या छपरावरचे ते सोनेरी दिवे!
लांब काळा साप आणि त्याच्या पाठीवरची पिवळ्याधम्मक सोनेरी मण्यांची दुहेरी रांग!
लपेटल सापाने दोन्ही देहांना.
आणि तिचे ते सेक्सी एक्स्ट्रा दात अलगद बाहेर आले .
तिचे चमचमते हिरवे डोळे आणि लालचुटुक ओठांतून बाहेर आलेले ते पिवळट सुळे.
तिच्या तोंडाला येणारा तो दुर्गंध कचऱ्याच्या १० गाड्या एकदम गेल्यासारखा, पण गम्मत म्हणजे अश्वाला तो वास हवाहवासा वाटत होता...तिचा दुर्गंध, ते डोळे, ते सुळे सगळंच.
अश्वा सापाच्या तोंडातल्या उंदरासारखा मंत्रावला होता.

आता तिनं त्याला जवळ ओढला आणि ती खसपसली अस्सल मालवणीत , "उगी ऱ्हव तुझा रक्त पितंय"!
'कोण आहेस तू' ?, अश्वाने निस्त्राण स्वरात विचारलं .
"माका बरीच नावा आसत लावसट , खणुबाई, आणि प्राचीन संकृतात रक्त-लोभा".कुडाळ जवळच्या डोंगरात एका गुहेत मी ऱ्हव्तय.१०-१० वर्षांनी आमचा टाईम येता .. गणेश चतुर्थी नंतरच्या षष्ठीपासून पितृपक्षापरेंत प्वाटभर रक्त पिऊचा आणि पडून ऱ्हाउचा फूडची १० वर्षा. कुडाळसून आंबोली घाटातून कोल्हापुरात आणि थयसून सातारामार्गे रक्त पीत पीत पुण्याक ईलय आता मुंबैसून अशीच झाडा शोधात परत जातलय कोकण मार्गे माझ्या गुहेत.
ये हयसर प्राणनाथ "

 ती खुसूखुसू हसली आणि तिनं खस्स्कन सुळे अश्वाच्या मानेत खुपसले .

आहाह कसलं फिलिंग होतं ते समोरची काच , काळे डोंगर आणि धुवाधार पाउस सगळं विरघळल एकमेकांत आणि त्याचा झाला शाईचा एक मोठ्ठा डाग ...आधी काळा मग काळपट लाल आणि मग लालचुटुक !
तो डाग झपाट्यानं मोठ्ठा होत होता त्याच्या शरीरातील रक्तानं ..त्याला एकाच वेळी अफाट आनंद मिळत होता ऑर्गॅजम सारखा आणि तो प्रचंड निस्त्राण होत होता. कुठेतरी त्याच्या मनातला भाग क्षीण विरोध करत होता पण खणुबाई घुसत चालली होती त्याच्यात खोल खोल.शिवनेरी सटासट घाटातली वळणं घेत पळत होती.अजून एक २० सेकंद मग अश्वा वितळणार होता त्या अंधारात आणि मग शांत झोप ...कायमची.
 तेव्हढ्यात ठाण ठाण आवाज आला : "घालीन लोटांगण वंदिन चरण | डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ||"
बाहेर कुठे तरी एक्स्प्रेस वे जवळच्या घरात मनसोक्त आरती चालू होती.

"प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन | भावे ओवाळीन म्हणे नमा  "
ते मंगल अ‍ॅग्रेसिव्ह बीट्स..त्याचा विवेकाचा ठिपका थोडा मोठा झाला...अजून थोडा मोठा...आणि अश्वा सावरला !
प्रतिक्षिप्त क्रियेने त्याने तिला दूर ढकललं.त्याची मान प्रचंड ठणकत होती. बसनं आरतीचा स्पॉट पार केला होता आणि आरती झपाट्याने क्षीण होत होती.तितक्यात त्याला आठवलं फोनमध्ये "godsmack-serenity" च्या जस्ट आधीच "ghaleen lotangan" होतं. ही अश्वाची खूप आवडती आरती...सगळ्यात फास्ट आणि अ‍ॅग्रेसिव्ह , ऑल्मोस्ट स्पीड मेटल . अश्वाने झटकन प्रीव्हीयस साँगचं बटन दाबलं आणि खणुबाईचा चेहेरा वेदनेनं वेडा वाकडा झाला , ती धडपडत मागे झाली . तिचे केस आता वाखासारखे झाले होते , सेक्सी हात हडकुळे आणि हिरवट डोळे वेडसर !

"त्वमेव माता च पिता त्वमेव | त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव||"

इअर-फोन मधून तापलेल्या तेलासारखे ते स्वर तिच्या मेंदूत घुसले , ती घुसमटली , तिचा चेहेरा किंचाळत होता पण तोंडातून फक्त क्षीण घर्र घर्र आवाज निघाला. तिने इअर फोन उपसायचा प्रयत्न केला पण अश्वाने चपळाईने तिचाच हात तिच्या कानावर गच्च दाबून धरला . तिची ताकत क्षीण होत चालली होती .

अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी ||

आणि ती जागेवरच वितळत गेली.

हरे राम हरे राम  राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||

 २ नंबर सीटवर फक्त एक मोठ्ठा काळपट लाल भिजका डाग राहिला .
पुढच्या दोनच मिन्टांत गाडी खोपोली फूड मॉलला शिरली .
अश्वा अजूनही हपापत होता .
झोपेत लुढकलेली लोकं 'हलकं' व्हायला फटाफट खाली उतरली त्यात ती गायब झाल्याचं ड्रायवरला समजलं नाही बहुतेक.
अश्वाही उतरला ....गार वाऱ्यात त्याचं डोकं थोडं शांत झालं पण मान  'य' ठणकत होती आणि मोठ्ठ्या तापातून उतरल्यासारखा प्रचंड अशक्तपणा आला होता.
खणुबाई फूड मॉलला उतरून गेल्याचं ड्रायवरला पटेल असं कारण त्याला शोधायला लागणार होतं.

बरोब्बर एका आठवड्यानंतर :

 श्वा बस stand वर धावतच घुसला. शेवटची शिवनेरी लागलीच होती. तिकीट घेऊन तो झपाझप आत घुसला. त्याचा बोअरिंग २३ नंबर होता..१ नंबर सीट रिकामीच होती , पण तो इमानदारीत २३ नंबरवर जाऊन बसला . थकून त्यानं सीटवर मागे डोकं टेकवलं . हा वीक भलताच धावपळीचा गेला होता. मागच्या रविवारी टीनाला भेटून त्यानं तो अकाउंट कायमचा क्लोज केला होता . तिनी त्याला घाल घाल शिव्या घातल्या होत्या पण तिला उगाच आशेवर ठेवण्यात  पॉइन्ट नव्हता !

 तितक्यात बबलचा मेसेज आला , " बेबी सीट हज्जम झाली का ? लव्ह यू मिस यू ..मुआह !"
गेला आठवडाभर अश्वा विचार करत होता , त्याच्या छातीत खूप काहीतरी दाटून आलं आणि त्यानं  सट्टकन रिप्लाय केला :

"फक हज्जम बेब्स ...लाईफ इज शॉर्ट , विल यू मॅरी मी " ? 
आणि स्वतःशीच हसत तो सीटमध्ये सैल सैल होत गेला !!!

------------------- समाप्त -------------------

-नील आर्ते













































3 comments: