Sunday, 10 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ३

आज : १६ नोव्हेंबर

- नमस्कार, सर्वात आधी आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी. इन्स्पेक्टर संकेत चक्रदेव यांनी रात्री साडे बाराच्या सुमारास जबरदस्तीने आपल्या रेस्टहाऊस मध्ये घुसून झडती घेतल्याचा आरोप आमदार दादा शिर्के यांनी केला आहे. कोणताही वॉरंट नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता ही झडती घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण पाहू शकतो कशी सर्व समानाची उलथापालथ झालेली आहे. पाहूया या बाबत आमदार शिर्के काय म्हणतायत-

“काल रात्री याठिकानि जबरदस्तीने कोनतीही परवानगी नसताना, कोनताही पुरावा हाताशी नसताना डॉ. नाडकर्णी यांच्या खुन्यांचा शोध गेन्यासाटीमनून ही जी अंधाधुंद कारवाई करण्यात आली त्याचा मी निषेध करतो. -
इन्स्पेक्टर चक्रदेवांनी टी.व्ही. बंद केला. निलंबनाचं पत्र त्यांच्या समोर होतं. दहा वर्षांपूर्वी पोलिस दलात रुजू झाल्या नंतर आज पहिल्यांदा छत्तीसशे साठ दिवसांनंतर पहिल्यांदा ते शांतपणे आपल्या घरी बसलेले.
‘काहीच काम नाही. काहीच करण्यासारखं नाही. दहा वर्ष अविश्रांत धावपळ आणि आज शांsssत. काहीच काम नाही. काहीच नाही. डॉ. नाडकर्णींसारख्या माणसाचा खून होतो? तेही पुण्यात? तेही आपल्या शहरात? आत्ता सर्वात जास्त गरज आहे जास्तीत जास्त लोकांनी अस्वस्थ होण्याची,घराबाहेर पडण्याची, त्या खुन्यांना असतील तिथून शोधून काढण्याची आणि मी काय करतोय?शांSSSSत! आपल्या घरात बसून टीव्ही बघत शांSSSSत! काहीच काम नाही! काहीच नाही!आणि दादा शिर्के काय करतोय? तोही झोपलाय शांSSSSत मला घरी बसवून!
-ट्रिंग ट्रिंग-

‘हॅलो...’ चक्रदेव थंड आवाजात बोलले.
‘हॅलो साएब माफ करा... मी...’ रडवेला आवाज आला पलीकडून.
‘ठीक आहे सोडून दे.’
‘नाय सायब खरच आपली बातमी खोटी नाय होती... पन ते तितनं कदी निसटले... काय कळलच नाय’
‘महितेय रे राजा... तो शिर्के खुळा नाहीये... त्याला माहिती होतं मी तिथपर्यंत येणार ते. त्यामुळे त्याने आधीच त्यांना दुसरीकडे हलवल असणार. असुदे होत असं. थॅंक यू, गुड नाइट.’
चक्रदेवांनी फोन कट केला आणि सिगरेट पेटवली.
.......................................................
-ट्रिंग ट्रिंग-
“बोल बेटा”
“जय जय बाबा”
“जयजयकार! बोल. कया खबर?”
“तुमाला कळली अशेलच. नाडकर्नि आनि चक्रदेव दोन्नी आपल्या वाटेतन बाजूला. आनकिन काई अडचन आसली तर बोला!”
“आणि पोरी?”
“येकदम ठरल्यापरमान रेड्डी!”
“ठीक तर मग. मुहूर्त चुकवायचा नाही. भेटू उद्या.”
“जी बाबा.”
“जयजयकार!”
............................................................

· १७ नोव्हेंबर

- टिंग टोंग - टिंग टोंग -
बेलच्या आवाजाने चक्रदेवना जाग आली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण सोफ्यावरच झोपलो आहोत. जाग आली आणि सर्वप्रथम जाणीव झाली अवघडलेल्या मानेची. किती वेळ झाला कोण जाणे. नजर समोर घड्याळावर गेली. साडे चार? काल रात्रभर झोप नव्हती. सकाळपासूनही झोपेचं नाव नाही. मग कधीतरी दुपारी बाराच्या दरम्यान वाजता इथेच सोफ्यावर डोळा लागला असावा.
- टिंग टोंग - टिंग टोंग - टिंग टोंग –
चक्रदेव सोफ्यावरून उठले. दरवाजा उघडला. समोर प्रतिमा होती.
“आय अॅम सॉरी...” प्रतिमा. “हे आस काही_”
“इट्स ओके. बाय!” दरवाजा लावत चक्रदेव म्हणाले.
“प्लीज ऐकून घ्या मी_”
“मला कोणाची सिंपथि नकोय आत्ता. जा तू!”
“ती बातमी चुकीची नव्हती_”
“त्याने आत्ता काय फरक पडतो?”
“दादा शिर्केला महिती होतं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल आणि त्यालाही तेच हवं होतं.”
“त्याने आत्ता काय फरक पडतो?”
“तुम्हाला काय वाटत? ह्युमन ट्राफिकिंग सारख्या केसेस दाबणारा माणूस एवढी साधी गोष्ट करू शकत नाही?”
“त्याने काय फरक_”
“फरक असा पडतो की या केसवरून तुम्हाला त्याने जाणून बुजून बाजूला केलंय.”
“मग त्याची चौकशी करण पोलिसांच काम आहे आणि मला वाटत सदध्या मी त्यात नाहीये. सो,थॅंक यू. तुमच्या मदतीबद्दल खूप खूप आभार. पुन्हा कधी मदतीला नका येवू.”
थाडकन दार लावून चक्रदेव परतले. सगळ्यात आधी एका स्ट्रॉंग कॉफीची गरज होती. जागरण आणि त्यानंतरच्या झोपेमुळे डोक खूप जड झालं होत. दूध गरम करत ठेवून दोन डिस्पिरीन घेतल्या. मग जरा डोकं हळूहळू मार्गावर यायला लागलं. कालच्या घटनेनंतर अनपेक्षित धक्के मिळत होते त्या मनस्तापातून बाहेर पडायला वेळच मिळाला नव्हता. आत्ता थोडी झोप झाल्यावर नाही म्हटलं तरी जरा बरं वाटलं. कॉफी ढवळेपर्यन्त डोक्यात एकच विचार होता. ‘हा दादा शिर्के अचानक पिक्चरमध्ये आला कधी? आणि कसा काय? त्या प्रतिमाला खरंच आणखीन काही माहिती असेल? असली तरीही ती सांगणार नाही. तीनेच नसेल ना मला अडकावायला अंकुश शिर्केच्या सांगण्यावरून फोन केला? मरू दे! त्याचा विचार आता करण्यात काही अर्थ नाही. असलं तर नंतर बघता येईल. त्या तीन महिन्यांपूर्वीच्या ह्युमन ट्राफिकिंग केसचा तर इथे संबंध नसेल ना? कारण ती दादा शिर्केने दाबली हे जगजाहीर होतं.’
त्यांनी लगेच त्यांच्या खबर्‍याला फोन फिरवला.
“हॅलो? साहेब तुम्ही?” पलीकडून आवाज आला.
“का? मी फोन करेन अस वाटलं नव्हतं काय? सस्पेण्ड झालो तरो जीवंत आहे अजून.”
“नाय नाय साएब. बोला की काय काम काढलत?”
“ती तीन महिन्यापूर्वीची मुली विकणारी केस आठवते?”
“ती शिर्केची?”
“हो. पण त्यात शिर्के नव्हता आधी. त्याने नंतर येवून ती केस दाबली. त्या प्रकरणात मेन कोण होता माहितेय?”
“कोनाकोनाला अटक केली ती लिष्ट तुमच्याकड आसल की?_” त्याने पटकन जीभ चावली. “सॉरी सॉरी. चवकशी करून कळवू?”
“लवकर. त्याच नाव पत्ता खानदान सगळ्याची माहिती काढ.”
“बगतो आनि कळवतो.”
.....................................................
“दादा पोरी शेफ हाएत. कितीला हानायला सांगू?”
“सहा वाजता.”
“ओके. येकदम जाग्यावरच जाऊ दे का?”
“नको. नगरच्या फ्ल्याटवर ठेव मानावं. रात्री यायचं जाल की कळवतो.”
.....................................................
“हॅलो साएब. संजय मेमाने नाव त्याचं. नगरचाय. हानायचा का तेला उचलून?”
“नको. लक्ष ठेवायला सांग त्याचावर कायम. आपणच तिकडे जावू.”
तीन तासांनी संज्याच्या नगरच्या फ्ल्याटच्या दारावर टकटक झाली. तो नुकताच पोरींना त्यांच्या जागी पोहोचवून आलं होतं दमून भागून. एक मोट्ठ ओझं खांद्यावरच उतरलं होतं. आत्ता थोडा झोपायचा बेत होता त्याचा, तेवढ्यात दारावर कोण तडमडलं म्हणून चरफडत त्याने दार उघडलं.
“संजय मेमाणे?”
“मीच. काय काम आए?”
पुढच्या क्षणी तो जमिनीवर होता. डोकं प्रचंड कळ येऊन सुन्न झालं. नेमकं काय झालं ते कळायला त्याला दोन तीन क्षण जावे लागले. नंतर लक्षात आलं. कुणीतरी आपल्या गालावर एवढ्या जोराने मारलं की बाजूच्या भिंतीवर आपलं डोकं आपटून आपला तोल गेला. डोळ्यासमोर धुरकट दिसत होतं. मगाशी दाराबाहेर उभे असलेले तिघेजण यावेळी आत होते आणि दार बंद होतं. पुढे काय होईल याची कल्पना त्याला आलीच.
“काय... काय हवंय तुमाला?”
“पोरींना पळवून आणून विकायचा धंदा करतोस ना तू?”
“...”
“बोल पटकन” एक राकट आवाज आला आणि कुशीत एक लाथ सणकन बसली.
“होय होSSय करतोSSS!” कुशीवर वळून कळवळत संज्या म्हणाला.
“दादा शिर्केला ओळखतोस?”
“होय...”
“त्याचा नाडकर्णींच्या खुनाशी काय संबंध आहे?”
“नाही...”
“नाही?” लगोलग हॉकीस्टिकचे दोन चार वार पाठीत, पायावर झाले.
“खरं सांगतोSSS देवाचान खर सांगतोSSS मला खरच नाई माहितीSSS” आकांताने कळवळत संज्या म्हणाला.
“त्याने तुला गेल्यावेळी का सोडवला? तू त्याच्यासाठी काम करतो?”
“नाही... फक्त फक्त एकच केलय.”
“कधी?”
“सध्या तेच करत होतो. आत्ताच पोरी पोचवून आलोय त्याच्याकडे.”
“कोणासाठी? आज पार्टी आहे त्याच्याकडे?”
“नाही. माहीत नाही.”
“बोSSSल!” आणखीन थोडा मार.
“सांगतोSSS सांगतो.... बळी... बळी द्यायला...”
........................................................
क्रमश:

No comments:

Post a Comment