Wednesday, 6 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण २

‘त्या’ घटनेआधी ८ दिवस : ९ नोव्हेंबर २०१३

दादा शिर्केंचा फोन वाजला.
“जय जय बाबा!”
“जयजयकार!”
“काय आदेश?”
“काल माळावर एक ‘डाव' मोडला कळलं असेलच!”
“जी! आपण काय करायचं? फुडं ढकलूया?”
“मूSSSSर्ख! ही वेळ वर्षातून फक्त एकदा. तुमच्या समस्येसाठी फक्त आणि फक्त हीच वेळ योग्य आहे. सिंह राशी महत्वाची आहे. सिंहेचा उल्कापात चुकवून चालणार नाही. ही वेळ चुकली की मग एकदम पुढल्या वर्षी. त्यामुळे येत्या १८ तारखेला हे कार्य सिद्धीस गेलं तरच फलप्राप्ती होईल.”
“पन मग आपल्यावेळी पुन्हा कुनीतरी तडमडल म्हंजे?”
“कुणीतरी नाही! काही मत्वाच मट्रियल एकदम ताजं मिळवावं लागतं आणि ते फक्त आदिवासी पाड्याजवळच मिळतं. त्यामुळे कार्याची माहिती आपण सोडून फक्त तिथल्या लोकांनाच असते. आता आदिवासीतर स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये जावून सांगणार नाहीत. म्हणजे असं कोण आहे जे आदिवासी पाडयाबाहेरचं आहे मात्र त्याला पाड्यातली सगळी आतली बातमी असू शकते?”
................................................

· ‘त्या’ घटनेआधी ९ दिवस : ८ नोव्हेंबर २०१३

“दादा एक गडबड झालीय!” अंकुश शिर्के धापा टाकत बोलला.

“काय?” दादा शिर्के.
“पोलिस आपल्या गाडीच्या मागं लागलेयत.”
“अरे मग ठासा की पैशे, तोंड वर करून हितं काय आला?”
“नाय दादा, वरनं ऑर्डर सुटलीय.”
“तेचाSयला तरी सांगितलेलं मी संज्याला नाय झेपनार_”
“नाय दादा, तेची काय चूक नाय. म्हंजे आपल्या बाजून सगळं क्लेर हाय. ते काल आमदार जादवांच्या बंगल्यावर पार्टी जालती, तितं पोरी हानलेल्या. त्याची खबर गेली भायर. आता जालय आसं की आपली गाडी येरयात आली आन तेंची गाडी कवाच पोचली भायर. तेचा माग काडताना कुटनं तरी आपल्या गाडीची टीप भेटलीय. ते जादवांची समजून आपली गाडी सोत्तायत. तुमी बोलून घेता का यसपी शी. कारन_”
“नाय नाय नाय! त्ये तर अजिबात नाय शेकय. मी याचात कुटं दिस्ता ने. फूडल्या आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तारे. आता इतकी फिल्डिंग लावतोय. आत्ता कूट चान्स लागेल वाट्टय. आत्ता काय झालं तर सगळं फुकट जाईल.”
“दादा पण गाडी सापडली तर गेले दोन म्हईने केली तयारी फुकट जाईल ना?”
“गाडी कुटे आहे?”
“जुन्नर!”
“चार मेक्यानिक लावून गाडी खोलून टाका, पत्र्याचा कलर घालवन सगळं मट्रीयल स्क्रॅपमदे काडा. पाच सा पोरगे पाटव आणि त्या पोरींना बायकने भायर काड कळाल का?”
“जी दादा! आनी रेष्ट हावसला न्यू ना?”
“मरवतो का? शिवाजीनगरच्या फ्ल्याटवर घ्युन जा.”
“जी दादा!”
.................................................

· ‘त्या’ घटनेआधी ९ दिवस : ८ नोव्हेंबर २०१३

नमस्कार, सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. काल रात्री पुणे पोलिसांनी धडक मोहीम काढून एका भोंदू बाबाला अटक केली. तंत्र मंत्र करून नोकरीत यश मिळवून देईन असं सांगून त्याने एका तरुण दांपत्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. पुण्याबाहेरील जंगलात त्यांचे तंत्र मंत्र विधी चालू असतानाच पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या बाबतचं सविस्तर वृत्त जाणून घेऊया आमचे पुणे प्रतींनिधी अरविन्द जगताप यांच्याकडून_
.................................................

· ‘त्या’ घटनेआधी २० दिवस : २९ ऑक्टोबर २०१३

“किती मुली पायजेत?”
“पाच.”
“येज?”
“सोळा!”
“येक लाक हुतील.” ती निर्विकार चेहर्‍याने म्हणाली.
“ब्बस?”
“येक लाक पर हेड.”
“मी पण त्येच म्हंतू की. परत्येकीच्या मागं घरचेन्ला दोन लाक द्येनार.”
“त्ये काय ते माजं मी बगन. तुला पोरी दिल्याशी मतलब नं? माजा कमिशनवर का डाव तुजा?”
“त्ये येगळ. तेंना दोन लाक आनी तुला पाच येगळे.”
“यव्वडे पैशे उधळाय तुजाकडे आले कुटन?”
“तुला काय कराचं? मिळतय त्ये घे गुमान.”
“ए संज्या, सांग की. कुनाला ठकीवलं?”
“आता गबसतिका? पोरी धा तारकेला हजर पायजेत. शेकयेतो भायरच्या राज्यातल्या बग.”
“ते आताबी ऊबी करीन. सांग ना कुनाला कटवला?”
“तुजाकडच्या नकुत. येकदम फरेश पायाजेत.”
“होव् तुजा बापान ठिवल्या फरेश!”
“कुनी ठिवल्या नकूत. त्ये तू कुटनं बी पैदा कर माला काय म्हायत नाय. हा गे याड्वान्स. धा हायत. सवताच्या घशात नगं घालू, तेंच्या घरला पोच कर, मागनं कुनाची वरड नाय पायजे. तुजे पाच पोरी घेताना दीतू. पन कूट गेल्या कुनी नेल्या काई कळता ने. तुजा भर्वशावर हाय सगळं.”
“ब्बरं! बगती!” केसांचा शेंडा पाठीवर उडवून बॅग उचलत ती म्हणाली.
“हे बं थट्टेवरी न्यू नुको.” संज्या घामाने डबडबलेला. “एकदम शिरेस है परकार. लै मोठ्या पार्टीचं काम है. जरा कूट गडबड जाली तर आपली दोगांची हाडंपन नाय भेटनार कुनाला बगायला. त्यामुळं जरा लक्ष द्युन जपून काम कर.”
“चालतंय की.”
.......................................................

· ‘त्या’ घटनेआधी १० दिवस : ७ नोव्हेंबर २०१३

पाड्यावरच्या एका खोपीत डॉ. नाडकर्णी पाड्याला भेट द्यायला आलेल्या मंडळींसोबत गप्पा करत बसलेले. तेवढ्यात समोरून त्यांना पलीकडच्या पाड्यातला बारबा घामाघूम होवून येताना दिसला. धावतच आला असणार. सत्तरीला टेकलेला बारबा जवळ जवळ पाच किलोमीटर धावत येतो,नाडकर्णींना कौतुक वाटलं.
“या बारबा बसा.” पाण्याचा तांब्या सरकवत नाडकर्णी म्हणाले. “इतक्या दुपारचं का येण केलत?मी येणारच होतो संध्याकाळी.”
“कामच तसं हाय.” एक घोट घेवून आलेल्या पाहुण्यांकडे बघत बारबा म्हणाला. “पाड्यात लोक आजारी पडायला लागलेत अचानक.”
“कशानं?”
“साथ वाट्टिय साSSथ!”
“साथ? अचानक कुठनं आली?” नाडकर्णींचे डोळे रुंदावले.
“नदी पल्याडनं!”
“त्या माळावरल्या वडापलीकडून?”
“व्हयजी.”
“वैदू कुठला आलाय? तुमच्याच पाड्यावरला?”
“नाय! भायरचाय!”
“काय म्हणाले? पाड्यावरल कोण दगावणारे की?”
“नाय! पन भायर आसतीशी शेंका वाटते! लवकर करा कायतरी.”
“चल निघू लगेच!”
पाहुण्यांची परवानगी घेवून नाडकर्णी लगेच गाडीत बसले. आलेल्या पाहुण्यांकडे बघून बारबाने केलेल्या ओळखीच्या सांकेतिक संवादाचा अर्थ स्पष्ट होता.
अचानक आजारी : संशयास्पद हालचाली
साsथ : अघोरी कृत्य
कुठे? : नदीपलीकडच्या माळावर
वैदू : मांत्रिक
दगावणारे : फसलेले
कुठचे : पाड्याबाहेरचे
काहीतरी मंत्र तंत्र करून गंडा घालणारे मांत्रिक साधारण पाच सहा महिन्यानी जंगलात हजेरी लावून जायचे. त्याची खबर मिळायची तेव्हा तेव्हा पाड्यातली लोकं लावून त्यांचा बेत फसवायचा हे तंत्र बर्‍याचदा कामी यायचं. तंत्र मंत्र करणारे त्यांची सामुग्री बारबाच्या पाडया शेजारच्या जंगलातून नेतात आणि काही दुर्मिळ वस्तु असेल तर पड्यावरल्या कुणाकडुनतरी मिळवतात या सगळ्याची कानोकान खबर बारबाला असायची. पाड्यावरचे लोक खूप भोळे भाबडे असतात ते पटकन फसतात. त्यांना सोडवायच काम नाडकर्णीना करावं लागे. यावेळी मांत्रिक आणि त्याच्या जाळ्यात अडकलेले लोक दोन्ही अज्ञात आणि भर उन्हात न थांबता ५ किलोमीटर धावत आलेला बारबाचा चेहरा बघता काहीतरी मोठं कृत्य असणार हे नक्की होतं. नेहमीच त्यांना रंगेहात पकडता यायचं असं नाही, कारण पोलिसांना खबर लागलीय ही बातमी बर्‍याचदा त्यांच्याकडे पोहोचायची. यावेळी इन्स्पेक्टर नवीन होते. सध्यातरी विश्वासू वाटत होते. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायला हरकत नव्हती.
.......................................................

· ‘त्या’ घटनेपूर्वी १५ दिवस : २ नोव्हेंबर २०१३

इन्स्पेक्टर चक्रदेव डॉ. नाडकर्णींच्या घरी सहज भेटायला आलेले. डॉ. नाडकर्णी आदिवासींसाठी काम करत. वर्षातले सात आठ महीने तिथेच रहात. त्यामुळे ते पुण्यात आल्यावर चक्रदेवांनी ही भेट चुकवली नाही. मग किती तास चर्चा चालली आणि किती विषय फिरून आले याला गणतीच नाही.
“डॉक्टर खरतर मला कमाल वाटते या सुशिक्षित लोकांची. त्यांनीही या अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा?”
“हो, लोक ठेवतात. यात दोन प्रकारची माणसं येतात. एक म्हणजे ते लोक जरी शिक्षित असले तरी आजूबाजूला घडणार्‍या घटनांची कारणमीमांसा करण त्यांना जमत नाही. ते कितीही शिकले तरीही ते आपल्या परंपरागत दृष्टिकोनातून बाहेर येत नाहीत. त्यामुळे ‘अमुक ग्रंथात असं म्हटलेलं आहे, तमुक पुराणात असं सांगितलेलं आहे, ह्या देवाच्या त्या अवतारात असं घडलं होतं’ अशी वाक्य जोडली की ते लोक कशावरही विश्वास ठेवतील.”
“ते तर जगजाहीरच आहे. पण इतकं विज्ञान शिकूनही डॉक्टर, इंजिनियर लोक अशांना फसतात याची मला जास्त चीड येते.”
“अहो त्यांना फसवणतर त्याहून सोप्पं! कसं आहे, ही मंडळी डॉक्टर, वकील, इंजिनियर,प्राध्यापक अगदी ऑफिसर झाली- म्हणजे कागदोपत्री विज्ञान शिकलेली तर असतात पण समजून घेतलेली नसतात. त्यामुळे अशा अर्धवट विज्ञानामुळे त्यांचा असा समाज झालेला असतो की आपण सगळं विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासून बघतोय. आता ही गोष्ट या भोंदू लोकांच्या नेमकी लक्षात आलेली असल्यामुळे ते इथे नेमकी हुशारी करतात. जी गोष्ट समोरच्याच्या गळी उतरवायची असते, त्या गोष्टीच्या पुढे मागे विज्ञानाचे दाखले देतात, मोठमोठ्या शास्त्रज्ञांची अर्धवट, संदर्भ सोडून काढलेली विधानं सोबत जोडतात आणि ‘बघा, विज्ञानानेही हे मान्य केलय’असं म्हणत छातीठोकपणे आपली बाजू वैज्ञानिकदृष्ट्या कशी भक्कम आहे ते दाखवून देतात.‘इंटरनेटवर तपासून बघा’ असं वर सांगतात. त्यामुळे विज्ञानाचे दाखले दिलेत हे बघून तर मग सगळे डोळे झाकून विश्वास ठेवतात.”
इ. चक्रदेवांनी मान डोलावली. डॉ. नाडकर्णी पोट तिडकीने पुढे बोलत राहिले.
..........................................

· ‘त्या’ घटनेआधी २ महीने : १० सप्टेंबर २०१३

“तुम्हाला महितेय उल्कापात का होतो?”
“ते आकाशात मने खडक असतात, त्यांच्या जवळून पृथ्वी गेली की ते पृथ्वीवर पडतात.”
“मी तुम्हाला तो कसा होतो ते नाही विचारलं, तो का होतो ते विचारलं. महितेय?”
दादांनी नकरार्थी मान हलवली.
“तुम्हा शिकलेल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं की जे जे काही घडतं ते फक्त मानवी इच्छेनेच. त्यापलीकडे काही घडणारी शक्तिच अस्तीत्वात नाही. म्हणून तर आपल्याला उल्कांचं महत्व नाही कळत. आपल्याला वाटतं की त्या उगाचच पडतात. काही कारण नसताना.”
“म्हणजे? त्या स्वतःहून येतात?”
“नाही नाही, ते निर्जीव दगडच आहेत. पण तरीही त्या येतात. प्रश्न आहे, का?”
“का?”
“तुम्हाला असं नाही वाटत, म्हणजे फक्त एक शक्यता म्हणून की कदाचित त्यांना पृथ्वीवर कुणीतरी जाणून बुजून पाठवत असल तर?”
वहिनींचे डोळे विस्फरले, त्यांनी दादांकडे बघितलं. दादापण गोंधळलेले.
“कोण पाठवणार? एलियन?”
“कोण पाठवतं हा मुद्दा तूर्त बाजूला ठेवू. माझा प्रश्न आहे ‘का’ पाठवतं?”
“ब्बर! गृहीत धरू की कुणीतरी पाठवत असेलही. पण त्याचा आपल्याला काय उपयोग?”
“चांगला प्रश्न आहे! आता बघा आपली मुलं वर्ष दोन वर्षांची झाली की त्यांना खेळायला आपण ठोकळे देतो, त्यावर एका बाजूला ए, बी, सी, डी असते, एका बाजूला अ, आ, इ, ई असते, एका बाजूला चित्र असतात. त्यांना त्या आकृत्यांचा अर्थ कळत नाही म्हणून ती त्यांचं घर बनवतात. आता त्या मुलांना ती अक्षरं वाचता येत नाहीत म्हणून ती अक्षरं निरर्थक ठरतात का? त्याच अक्षरांवर तर त्यांचं सगळं पुढचं आयुष्य अवलंबून असतं.”
सगळेजण अवाक् झाले.
“पण जर ती उल्केवरची अक्षरं वाचताच आली नाहीत तर आपण त्यांचा वापर कसा करणार?”
एक मंद स्मित करून बाबा म्हणाले,“आपल्याला अक्षरं तोपर्यंतच वाचता येत नाहीत, जोपर्यंत ती वाचायला कुणी शिकवत नाही!”
...........................................................

· 'त्या' घटने आधी १५ दिवस : २ नोव्हेंबर २०१३

“शेकडो वर्ष संतांनी विरोध करूनही असले अघोरी उपाय लोक करतायतच ना? ते का? कारण याचा संबंध शिक्षणाशी नाही, विश्वासाशी आहे. आपल्या अडचणींमधून बाहेर येण्यासाठी प्रत्येकजणच शक्य तितके प्रामाणिक प्रयत्न करतो; नाही असं नाही. पण कधीकधी प्रयत्न संपतात किंवा संयम संपतो आणि तरीही समस्या समोर आ वासून उभी असते. अशावेळी मात्र त्या व्यक्तीचा प्रामाणिक तर्कनिष्ठ प्रयत्नांवरचा विश्वास डळमळू लागतो. मग लॉटरी, नवस वगैरेंकडे तो वळतो. अशावेळी त्याला धीराचे शब्दही नको असतात. त्याला हवा असतो तो फक्त त्याच्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग. मग तो जिथे दिसेल तिथे तो धाव घेतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. अमुक एक गोष्ट केल्याने माझी अडचण दूर होईल असा जर का त्या व्यक्तीचा ठाम विश्वास बसला असेल तर ती गोष्ट कितीही वेडेपणाची, त्या व्यक्तीच्या सद्सद्विवेकबुद्धीला न पटणारी किंवा अगदी गुन्हेगारी स्वरूपाचीही असेल, तरीही तो ती करतो कारण त्यातच त्याला त्याच्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसलेला असतो. सद्सद्विवेकबुद्धी नेहमी आपल्याला वास्तव दाखवते. जेव्हा ते वास्तव न आवडणारं असतं आणि आपण ते स्वीकारू इच्छित नाही. अशावेळी आपली नजर पळवाटा शोधू लागते आणि तिथेच अशा फसव्या आशा जन्म घेतात. मग त्या आशांना अतार्किक असला तरी चालतो पण एक आधार हवा असतो, आणि तो मिळाला की त्या वास्तव होवू शकतील असा विश्वास वाढू लागतो. हा विश्वास त्या व्यक्तीच्या विवेकावर मात करतो कारण त्यातून ‘त्याला’ हवं असलेलं उत्तर मिळत असतं. हा एका अर्थाने मानसिक आजारच आहे. एक प्रकारच डील्यूजन.”
नाडकर्णींनी मुद्दा संपवला. चक्रदेव हे ऐकून सुन्न झाले.
..............................................

· ‘त्या’ घटनेआधी २ महीने : १० सप्टेंबर

आमदार दादा शिर्के, त्यांची पत्नी आणि धाकटा भाऊ अंकुश शिर्के त्या चमत्कारी बाबाच्या पुढ्यात बसलेले. बाबा गंभीर आवाजात पुढे सांगतच होते.
“तो उल्केचा दगड सादसुदा नसतोय. त्याचात चमत्कारी पदार्थ असतात. ते पृथ्वीवर कुठेही नाही सापडत. आपल्या आयुष्यातल्या अडचनीला तोंड देता यावं म्हणूनच परमेश्वराने त्यांची योजना केलेली आहे. तुम्ही त्याला तुम्ही अल्ला म्हणा, देव म्हणा, जिजस म्हणा काइपण म्हणा. पण त्याने दिलेली शक्ति कधीच खोटी ठरत नाही. त्या परम प्रतापी परमेश्वरासमोर आपले डॉक्टर कुठे उभे राहणार? तो जर मनात आणील तर हयांच शास्त्र पालापाचोळ्यासारख उडवून लावेल. कित्येक असे असाध्य रोग आहेत ज्याच साधं निदान या डॉक्टरांना करता येत नाही, ते उपचार काय करणार?”
दादा शिर्केंच्या पत्नीने मनापासून मान हलवली.
“तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं सामर्थ्य असतं एका उल्केमध्ये, तिला फक्त एक क्षुद्र दगड समजून झिरकाडू नका. परमप्रतापी परमेश्वराचा प्रसाद आहे तो प्रसाssद आपल्याला दिलेला. तुमची समस्या साधी नाही. त्यासाठी उल्केच्या प्रसादाचीच आवश्यकता आहे. उल्कापाताच्या मध्यरात्री जेव्हा डोक्यावरच संपूर्ण आकाश उलकांनी भरून जाईल तेव्हा ते ईश्वरीतत्व सर्वात जास्त या पृथ्वीवर कार्यरत असतं. जसं एक चुंबक दुसर्‍या चुंबकाला ओढून घेतो तसच ही उल्का त्या आकाशस्थ उल्कांची शक्ति आपल्याकडे खेचून आणेल, जिच्यामुळे आपण हिच्यावर इलाज करू.”
“पण बाबा ती उल्का कुठून आणणार आम्ही?”
“ते मी बघतो.”
“ब्बरं! फक्त यवढच लागेल ना?”
“मूर्ख मुला! आग पेटवायची असेल तर आगच द्यावी लागते, विजेचा दिवा पेटवायला विजच द्यावी लागते, मग जीव निर्माण करायचा म्हणजे...”
..................................................
क्रमश:

No comments:

Post a Comment