Sunday 18 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ४)

ड्रायव्हर माझ्याकडे मान वळवून थोडा हसला त्यानं मानेच्या त्या जोडलेल्या वायरींवर टॉवेल टाकला आणि गाडी चालू केली.

"हे सगळं क्काय आहे?", मला रहावेना.

तो परत विचित्र हसला आणि म्हणाला,

"हॅलो, आय ऍम अल्फाज टायरवाला!"

"क्काय!", मी तीन ताड उडालोच.

आम्हा आयटीवाल्यांचा देव होता 'अल्फाज टायरवाला' एके काळी.

जॉब्स, झुकरबर्ग, लायनस टॉर्वल्ड, इलॉन मस्क या सगळ्यांच्या बरोबरीला झपाट्याने येणारं भारतीय नाव होतं ते काही वर्षांपूर्वी.
प्रचंड गरीबीतून झालेलं त्याचं शिक्षण, मुंबईत टॅक्सी चालवून प्रचन्ड धडपड करून त्यानं कॉम्प सायन्समध्ये केलेलं मास्टर्स...
आणि मग कमावलेलं प्रचंड यश...अमाप पैसा
त्याचं ते कार पार्किंगचं तुफान पॉप्युलर ऍप...
ड्रायव्हिंगचे इंटरॅक्टिव्ह गेम्स...
मशीन लर्निंग वरचे टेड-टॉक्स...
सगळं झपाट्याने आठवत गेलं मला.
येस्स अल्फाजच होता तो, आत्ता माझी ट्यूब पेटली.
त्याच्या आत्ताच्या खप्पड चेहेऱ्यामुळे आणि पांढऱ्या केसांमुळे ओळखू येत नव्हता तो.

मी पुन्हा एकदा नीट बघितलं.

"येस्स तोच मी अल्फाज!" अल्फाज अस्खलित मराठीत म्हणाला.

"पण तू म्हणजे तुम्ही... आणि ही टॅक्सी?", मी चाचरलो.

"लॉन्ग स्टोरी पण आपल्याकडे एव्हढा वेळ नाहीये.

पण असं समज की माझ्या ड्रायव्हरलेस कार्स आणि मशीन लर्निंगच्या प्रोजेक्टचाच हा फायनल टप्पा आहे."

मला आठवलं...
अल्फाजनं काही वर्षांपूर्वी ड्रायव्हरलेस कार्ससंबंधी काही प्रचन्ड सनसनाटी विधानं केली होती.
चक्क टेस्लाच्या इलॉन मस्कला मुर्खात वगैरे काढलं होतं.
पण अचानक तो गायबच झाला.
त्याच्या नावाची हवाही हळूहळू ओसरत गेली...
एक विरत चाललेली दंतकथा दॅट्स इट!

"तू अचानक ऑब्लिव्हियनमध्येच गेलास...", मी हळूच उत्तरलो, " त्या 'मस्क'बरोबरच्या ट्विटर-वॉरनंतर."

"हो कारण मी मेलो!"

मला पुन्हा एकदा गाडीतून पळून जायची उबळ आली, पण माझ्यातल्या 'टेकी'ला रहावेना...
शिवाय केतकीकडे लवकर पोचायचं होतंच... साला फोन पण लागत नव्हता तिचा, आईचा, कोणाचाच.

"वर्षभरापूर्वी कंपनीच्या मीटिंगमध्येच अचानक माझ्या तोंडातून फेस आला आणि मी चक्कर येऊन खाली पडलो"
अल्फाज सांगत होता,
"ऍडमिट झाल्यावर कळलं की माझ्या 'सर्कल ऑफ विलीस'ला...
जी आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी यंत्रणा असते तिला काहीतरी विचित्र इन्फेक्शन झालंय आणि ते झपाट्यानी पसरतंय.
डॉक्टरांनी मला दोन दिवस दिले होते.
नंतर कोमात गेलो असतो मी कायमचा... ब्रेन डेड... व्हेजिटेबल!
आणि मरण्याचं एवढं काय नाय खरं तर, सगळी धमाल करून झाली होती आयुष्यात.
पण माझा तो मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट... आम्हाला एक भन्नाट कल्पना सुचली होती... ती अर्धवट रहाणार याचंच दु:ख होतं."
"कसली कल्पना?"

एक प्रोग्रामर दुसऱ्या प्रोग्रामरला आपला भारी कोड ज्या वैश्विक उत्साहात एक्स्प्लेन करतो त्याच उत्साहात अल्फाज सांगू लागला,
"माझं आणि मस्कचं टेक्निकल भांडण याच मुद्द्यावर होतं.
सी... आपण काय करतो, ड्रायव्हरलेस कार्ससाठी ड्रायव्हरची नक्कल करणारं सॉफ्टवेअर लिहितो.
जितकी नक्कल चांगली तितके जास्त चांगले रिझल्ट्स बरोबर?"
अल्फाजनी बोलता बोलताच दोन ट्रकमधून सफाईदार गॅप काढला.
"... पण माय फ्रेंड!
आपण हे विसरतोय की एक अप्रतिम ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर ऑलरेडी आहेच आपल्याकडे. सो व्हाय रिइन्व्हेन्ट द व्हील?"

"मेंदू!", मी हळूच उत्तरलो.

"एक्झॅक्टली!", अल्फाजनं माझ्या मांडीवर थाप मारली... त्याच्या गारेगार हातानी.
"मी नेहमी म्हणायचो, एखाद्या कार ड्रायव्हरच्या मेंदूत शिरता आलं तर कसला भारी रियल टाइम डेटा मिळेल!
आणि खरं सांगायचं तर मी आजारी पडण्याआधी आमचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट पण रेडी होतं या आयडियाचं.
पण...
खऱ्या व्हॉलेंटीअरची परवानगी, आणि इतर हजार एथिकल प्रश्न होते त्यामुळे हे सगळं ऑन पेपरच राहिलं होतं.
आणि धाडकन माझं ते आजारपण आलं... मरणच खरं तर.
शेवटचे दोन दिवस होते माझ्याकडे ल्युसिडीटीचे, शहाणपणाचे.
आणि मी आणि माझ्या टीमनी निर्णय घेतला..."

तेवढ्यात ढॉम्म करून आवाज झाला आणि आमची गाडी पंक्चर झाली.

क्रमश:

No comments:

Post a Comment