Thursday 15 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग २)

इतक्यात आमच्या टॅक्सीवाल्याने खालील तीन गोष्टी केल्या:
१. गाडीला हलकासा गचका दिला आणि गाडी चक्क फ्लायओव्हरच्या बुटक्या डिव्हायडर वरून रॉंग साईडला नेली. (कशी काय कोण जाणे)
२. कचाकच ब्रेक मारत गाडीचा स्पीड कमी केला.
३. आडवी होऊन स्ट्रायकरसारखी सुसाट येणाऱ्या बाईकच्या पुढच्या टायरला हलका प्रेमळ डिच्चू दिला.

त्याने खालील तीन गोष्टी झाल्या:
१.रस्त्याच्या कठड्याकडे झपाट्याने घसरणारी बाईक उलटी फिरली.
२. तिचा घसरण्याचा वेग थोडा कमी झाला.
३. आणि बाईक स्वाराचं हेल्मेटविरहीत डोकं कठड्यापासून दोन इंचांवर थांबलं... न फुटता.


काहीसं असं:


आमच्या टॅक्सीवाल्यानं टॅक्सी थोडी पुढे थांबवली आणि रिअर व्ह्यू मिरर मधनं मागे बघितलं.
बाईकवाला निपचित पडला होता.
तीन चार गाड्या अशाच निर्लज्जपणे पाणी उडवत पुढे पास झाल्या. 

टॅक्सीवाल्याची कसलीतरी घालमेल चालू होती... 
इंजिन चालू होतं... 
गाडी न्यूट्रलवर... 
त्यानं माझ्याकडे बघितलं... 
फर्स्ट गिअर टाकला...  
परत बाइकवाल्याकडे बघितलं... 
निपचित. 

परत त्यानं शिवी हासडत न्यूट्रल टाकला... 
हँडब्रेक खेचला... आणि म्हणाला,
"आपको ये दिखना नही था लेकिन उस येडेकी हालत देखने पडेंगी"'

त्यानं हळूच मानेभोवतीचा फडका काढला... 
त्याच्या मानेतून चार प्लग सीटच्या हेडरेस्टमध्ये गेलेले होते. 
थोडेसे गाडीच्या स्पार्कप्लगसारखे दिसत होते ते... 
त्यानं एक एक प्लग उपसून काढला आणि मान मोकळी करत तो गाडीतून खाली उतरला. 
मी थिजून त्याच्या मानेतल्या चार रक्ताळलेल्या भोकांकडे बघत राहिलो...
आणि पाठोपाठ खाली उतरलो.

क्रमश:

2 comments: