Saturday 31 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ८)

अल्फाजनी मला हळूSSSच पायाने ढोसलं.

"पासवर्ड: नदियां२५०४", अल्फाज बोलला...

बस अगदी समोर आली टॅक्सीच्या...
हायबीम लाइटने पाठच्या दोघांचेही डोळे दिपले क्षणभर...

त्याचक्षणी अल्फाजने बारुआची बंदूक वळवली आणि अंजाला गोळी घातली...
सायलेन्सरचा दबका आवाज झाला आणि अंजानी मान टाकली,
पण बारुआची बंदुकीवरची पकड घट्ट होती...
आता बारुआ आणि अल्फाजची बंदुकीसाठी झटापट चालू झाली,
तेव्हढ्यात माझीही ट्यूब पेटली आणि मीही अल्फाजच्या मदतीला गेलो...

बारुआनी आम्ही दोघं त्याला भारी पडणार हे ओळखून टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि बाहेर उडी मारली...
जरा लांब कोपऱ्यात बारुआची पांढरी फॉर्च्युनर उभी होती तिच्या ड्रायव्हरने गडबड पाहून गाडी चालू केली.
आमच्या टॅक्सीवर गोळ्या तडतडल्या आणि अल्फाजनी सुद्धा वॉंवकन टॅक्सी चालू केली.
अल्फाजनं रप्पकन राईट मारला.
आरशात मला बारुआ फॉर्चुनरमध्ये बसताना दिसला आणि फॉर्च्युनर शिकारी कुत्र्यासारखी आमच्या मागे लागली.
समोरचा रस्ता मेट्रोच्या कामासाठी बंद केला होता आणि डावीकडे उंच फूटपाथ होता...
गाडी चढली नसती त्याच्यावर पण अल्फाजनी थाड्कन पत्रा मरून एक मेट्रोचा जाड पत्रा खाली पाडला आणि तिरक्या पडलेल्या पत्र्यावरून गाडी रोंरावत फूटपाथवर चढवली.
फॉर्च्युनर तिकडे झक मारत रिव्हर्स घेत होती.
अल्फाजनं थोड्या अंतरावर कडक मातीचा फूटपाथला चिकटलेला एक उतार हेरला आणि गाडी त्याच्यावरून सर्व्हिसरोडवर उतरवली. आता आम्ही हायवेला लागलो की सुटलो...
तेव्हढ्यात अल्फाजनी काच्चकन् ब्रेक मारला...

क्रमश:

No comments:

Post a Comment