Thursday 22 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ५)

अल्फाजनी चुकचुकत गाडी स्लो केली. 
नशीबानं समोरच एक ऑल-नाईट पंक्चरवाला होता.
अल्फाजनं परत त्याच्या मानेभोवतीच्या सगळ्या वायर्स काढल्या... (एकूण चार वायर्स होत्या मी मोजल्या.) 
आणि मग गाडी पंक्चरवाल्याकडे नेली. 
गुरगुटून मस्त झोपला होता तो, त्याला हलवून उठवला आम्ही. 
टायरमध्ये खिळा घुसला होता. 
पंक्चरवाला कामाला लागला...  

"चल भाई बुर्जी खाऊया, मार्शल अल्टिमेट बुर्जी बनवतो"
मला एकीकडे कधी एकदा घरी पोचतो असं झालेलं पण पंक्चर काढणं भाग होतं.
शिवाय वळणापलीकडच्या बुर्जीचा घमघमता वास इथपर्यंत येत होता.

मसालेदार वाफाळती बुर्जी, तव्यावर हलके परतलेले पाव आणि लाल तिखट भुरभुरवलेला बारीक चिरललेला कांदा...
पहिला घास तोंडात गेला आणि मला जाणवलं किती भूक लागलीय ते...
सकाळपासून कामाच्या नी मिटींग्जच्या गडबडीत काही खाताच आलं नव्हतं.
अल्फाजही एक एक घास... डोळे मिटून, मान डोलावत, प्रचंड एन्जॉय करत खात होता...
जणू शेवटचा घास असल्यासारखा.

"मग ह्या वायर्सनी तू टॅक्सीला जोडला गेलायस?"
मला पुन्हा राहवेना.

"होय म्हणजे तसाही मी ब्रेन डॅमेजनी मरणारच होतो...
मग मला ती गोष्ट आठवली...
सायनाईडची चव रेकॉर्ड करण्यासाठी जीव देणाऱ्या सायंटिस्टची...
आणि मी आणि माझ्या कोअर टीमनी निर्णय घेतला...
माझा मेंदू गाडीला इंटिग्रेट करायचा!
असं समज की मी आणि माझी ही टॅक्सी यांचं एक अद्वैत झालंय...
घोड्याचं धड आणि माणसाचं शरीर असलेल्या सेंटॉरसारखं.
या बाहेरच्या दोन वायर्स माझ्या हायब्रीड मेंदूला गाडीतून चार्ज देऊन जिवंत ठेवतायत .
आणि आतल्या दोन वायर्स गाडीतल्या प्रोसेसरवर रियल टाइम डेटा घेऊन तो क्लाउडवर अपलोड करतायत.
बिलिव्ह मी! भन्नाट डेटा मिळतोय आम्हाला.
पहिल्यांदा एक ड्रायव्हर कसा विचार करतो आणि गाडी त्याचं कसं ऐकते हे आम्हाला इतकं लख्ख कळतंय.
इट्स अमेझिंग! माझ्या शरीराच्या कणाकणात गाडी भिनलीये जणू...
तिचं नाव पण ठेवलंय मी: 'नदियां''
तशीच आहेत तिची वळसे -वळणं...
आणि...
ऍक्सिलरेटरची गुरगुर...
शॉकब्जची थरथर...
ब्रेकची घसट...
क्लचची उसळी...
मी फील करतोय.
निओला मॅट्रिक्स दिसतं,
किंवा सचिनला शोएब अख्तरचा बॉल फुटबॉलएवढा दिसतो,
किंवा कुमार गंधर्वांना ती अनवट रागाची वाट दिसते तसं!"
अल्फाजचे डोळे विलक्षण चमकत होते.

क्रमश:

No comments:

Post a Comment